प्रसिद्ध मॉडेल आणि बॉलिवूडची स्टाइल दिवा म्हणून ओळखली जाणारी मलाइका देतेय स्टाइल टिप्स खास व्हिवाच्या वाचकांसाठी.
मी ३३ वर्षांची असून माझी उंची ५ फूट २ इंच आणि वजन ५२ किलो आहे. मी अंगाने बारीक असले तरी माझे पोट थोडे पुढे आले आहे. खरे तर मला वेस्टर्न (पाश्चात्त्य) स्टाइलचे कपडे घालायला आवडतात, पण त्यात माझे मोठे पोट दिसून येते. हे टाळण्यासाठी, ड्रेसिंग स्टाइल्सबद्दल काही टिप्स मिळतील का?
आसावरी
हाय आसावरी,
वर्णनावरून तुझ्या उंचीसाठी तुझे वजन अगदी योग्य, आणि बांधा लहानखुरा, आटोपशीर असावा असे दिसते. गुड, त्यामुळे तुला मॅक्सी ड्रेसेस घालून बघायला काहीच हरकत नाही. हे ड्रेसेस स्लीव्हलेस प्रकारातही वापरले जातात. तेही तू घालू शकतेस. बहुधा हे ड्रेस छान फॉल असलेल्या कापडाचे असतात, सहाजिकच या सुळसुळीत (फ्लोई) प्रकारात, तुझ्या पोटाचा घेरही सहज लपून जाईल. तुझ्या उंचीला एकाच रंगातील दोन छटा असलेला (ओम्ब्रे कलर्ड ड्रेस) मॅक्सी ड्रेस टू गुड. या प्रकारचे ड्रेसेस लांब असतात आणि वेगवेगळ्या प्रकारे स्टाइलिंगसाठी वापरता येतात. उदाहरणार्थ या पायघोळ मॅक्सी ड्रेसवर स्वेटर किंवा श्रग घालता येईल. तू टी-शर्ट मॅक्सी (पायघोळ टी शर्टचा प्रकार) हा ड्रेस प्रकार घालून पाहा. या सर्व ड्रेसेसच्या साहाय्याने तू नवनवीन लुक्स मिळवू शकतेस.
 तू म्हणतेस तुला टय़ुनिक्स घालायला आवडतात. हे तर फारच छान. सध्या टय़ुनिक्समध्ये अनेक स्टायलिश प्रकार पाहायला मिळतात आणि तुला टय़ुनिक्स आवडत असतील तर तू शिफ्ट ड्रेस हा प्रकार नक्कीच वापरायला हवास. (शिफ्ट ड्रेस म्हणजे – गुडघ्यापर्यंतच्या लांबीचा वनपीस ड्रेस) ड्रेसचा हा प्रकार वापरायला फार छान, आरामदायी असतो. शिफ्ट ड्रेस शरीरालगत असतात पण तंग नसतात, सलसर फिटिंगचे असतात. आपल्याला मस्त ग्रेसफुल लुक मिळवून देतात आणि पोट दिसणार नाही, याचीही काळजी घेतात. यांवर वेजेस प्रकारातील हिल्स असलेली पादत्राणे घातलीस की तुला कम्प्लीट स्मार्ट लुक आलाच म्हणून समज. शिवाय यात तू ज्याबद्दल साशंक आहेस ते पोटही या ड्रेसेसमध्ये पूर्णपणे झाकले जाते.
तुला स्टायिलगसाठी वापरता येणारा आणखी एक ड्रेसचा प्रकार म्हणजे मॅक्सी स्कर्ट. हे स्कर्ट आपल्या उंचीप्रमाणे आणि सोयीनुसार कमी-जास्त उंचीवर आपण घालू शकतो. म्हणजे हायवेस्ट, मिडवेस्ट किंवा लोवेस्ट कसाही वापर करता येतो. आता तुझ्यासाठी, मिडवेस्ट स्कर्ट घालणे उत्तम. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मॅक्सी ड्रेस किंवा मॅक्सी स्कर्ट या प्रकारावर नेहमी उंच टाचांची पादत्राणे घालणे मस्ट आहे. यामुळे आपण आहोत त्यापेक्षा उंच भासतो आणि आपला बांधाही सुडौल दिसण्यास मदत होते.
आता स्टायिलग म्हटले की, अक्सेसरीजना विसरून कसे चालणार? तेव्हा बाजारात मिळणारे विविध प्रकारचे हेडबँड्स नक्की वापरून बघ. (हल्ली कपाळावर किंवा डोक्यावर चढवायच्या स्टायलिश हेड अक्सेसरीज आल्या आहेत. या अक्सेसरीजचा नक्की वापर कर. यामुळे तुला वेगळाच लुक मिळेल. तुझ्या ड्रेसचे कापड, पिंट्र आणि रंग यांना अनुरूप असे चमकदार ब्रेसलेट, शायनी नेकलेसही तुला वापरता येतील. तेव्हा यंग लेडी, तुझी फिगर फॅशन आणि स्टाइलसाठी अगदी योग्य आहे. सो गो अहेड आणि बी स्टायलिश.
मलाइका अरोरा खान
(अनुवाद – गीता सोनी)  
सौजन्य – द लेबल कॉर्प
http://www.thelabelcorp.com, http://www.theclosetlabel.com
आपल्या गर्ल्स गँगबरोबर सकाळी ब्रंचला जाणार आहात की रात्री पार्टीचा प्लॅन आहे? काय घालू, कसं दिसेल या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी स्टाइल दिवा मलाइका अरोरा-खान तुम्हाला मदत करेल. फॅशन, कपडे, हेअर, स्टाइलिंग याबाबतच्या तुमच्या शंकांना मलाइका या सदरामधून उत्तरं देईल. फॅशन आणि स्टाइलिंगविषयीचे आपले कोणतेही प्रश्न viva@expressindia.com  या इमेल आयडीवर बिनधास्त पाठवा. आपलं नाव, राहण्याचं ठिकाण यांसह प्रश्न पाठवा आणि सब्जेक्ट लाइनमध्ये स्टाइलिंग बाय मलाइका असं आवर्जून लिहा.

Story img Loader