malikaप्रसिद्ध मॉडेल आणि बॉलीवूडची स्टाइल दिवा म्हणून ओळखली जाणारी मलाइका देतेय स्टाइल टिप्स खास व्हिवाच्या वाचकांसाठी.
हाय, मी दीप्ती, मी २१ वर्षांची असून कॉलेजमध्ये शिकतानाच नोकरीही करीत आहे. खरं तर मला जीन्स आणि शर्ट हा ड्रेसचा प्रकार आवडतो, मला आपल्याकडून स्टाइलिंग आणि मेकअपबद्दलच्या काही टिप्स मिळू शकतील का?
हॅलो दीप्ती,
तुझा ‘अर्निंग & लर्निंग’चा प्रयत्न वाचून आनंद वाटला. इतक्या व्यस्त दिनक्रमातही तुझी फॅशनेबल राहायची इच्छा आहे, ही फारच कौतुकाची गोष्ट आहे. लहान वयात, एकाच वेळी दोन जबाबदाऱ्या समर्थपणे पेलणाऱ्या तुझ्यासारख्या ‘मल्टिटास्कर’ युवतीला वेगवेगळ्या प्रकारचे, स्टाइलिश कपडे घालण्याची गरज भासत असणार. असे कोणकोणते ड्रेसचे प्रकार तुला योग्य दिसतील ते पाहू या.
कॉलेजमध्ये जाताना जीन्स आणि टीशर्ट हा ड्रेस घालता येईल. यावर ब्लेझर (जॅकीट) ही कॉलेजनंतरच्या कामाच्या तासांसाठी शानदार ड्रेसिंग स्टाइल करता येईल. नेहमीच्या काळ्या ब्लेझरपेक्षा रंगीत ब्लेझर किंवा फुला-फुलांचे पिंट्रेड ब्लेझर, तुझ्या नेहमीच्याच टीशर्ट आणि जीन्सला वेगळीच रंगत आणेल. एक लक्षात घे, आपल्या रोजच्या कपडय़ांमध्ये थोडासा बदल करूनही, मस्त स्टाइल होऊ शकते. अशा बदलांमुळे कामाच्या ठिकाणी हालचालीही सुकर होतात आणि आपला लुकही स्मार्ट होतो. तुला अंगासरशी बसणारे, फिटेड ब्लेझरही घालता येतील. यामुळे दोन फायदे होतील, फॅशनही होईल आणि कामाच्या ठिकाणी असलेल्या एसीच्या थंड हवेपासून संरक्षणही मिळेल. तुझ्याकडे आणखी एक पर्याय आहे तो म्हणजे शर्ट ड्रेस (गुडघ्यापर्यंत लांबीचे वनपीस ड्रेस, ते कंबरेजवळ घट्ट बसतात. हे ड्रेस स्लीव्हलेसही असू शकतात.) हा ड्रेस प्रकार तुझ्या वयाला अगदी शोभून दिसेल. कॉलेज आणि कामाच्या ठिकाणी घालायला योग्य आहेत. यातही अजून स्टाइलिश दिसायचे असेल तर या ड्रेसवर छान पांढऱ्या रंगातील स्निकर्स प्रकारची पादत्राणे घालता येतील. ही एक नवीनच स्टाइल होईल. कामाच्या ठिकाणी या शर्ट ड्रेसवर साधे वेजेस प्रकारचे शूज किंवा नाजूकसे सँडल घालता येतील.
आता मेकअपबद्दल बोलू या. ग्रेसफुल आणि आकर्षक दिसायचे असेल तर मेकअप नेहमी कमीत कमी ठेवायला हवा, यामुळे आपले नसíगक सौंदर्य खुलून दिसते. एक करता येईल, तू कॉलेजमध्ये गडद (फ्लुरो) रंगाचे लिपकलर ट्राय करू शकतेस. गडद गुलाबी किंवा पोवळी लाल रंगाच्या लिपकलरमध्ये तुझा मूळ त्वचारंग उठून दिसेल. संध्याकाळच्या कॉलेज, क्लासेस किंवा लेक्चर्ससाठी तू गडद लाल रंगही वापरायला हरकत नाही, पण कामाच्या ठिकाणी मात्र सौम्य, सोज्ज्वळ, हलक्या रंगसंगतीतील लिपकलर उठून दिसतील आणि कार्यालयीन वातावरणाला शोभूनही दिसतील.
आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वत:बद्दल आणि केलेल्या स्टाइल, फॅशनबद्दल मनात विश्वास बाळग, तर तो तुझ्या चेहऱ्यावर आणि हालचालीत दिसून येईल. हे सकारात्मक विचार आणि आत्मविश्वासच तुला स्टाइलिश दिसण्यास मदत करतील. तेव्हा दीप्ती, तुझ्या अभ्यासातील, कामातील प्रगतीसाठी आणि फॅशनेबल लुकसाठी खूप खूप शुभेच्छा.
मलाइका अरोरा खान
(अनुवाद : गीता सोनी)
सौजन्य – द लेबल कॉर्प
http://www.thelabelcorp.com, http://www.theclosetlabel.com  

आपल्या गर्ल्स गँगबरोबर सकाळी ब्रंचला जाणार आहात की रात्री पार्टीचा प्लॅन आहे? काय घालू, कसं दिसेल, या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी स्टाइल दिवा मलाइका अरोरा-खान तुम्हाला मदत करेल. फॅशन, कपडे, हेअर, स्टाइलिंग याबाबतच्या तुमच्या शंकांना मलाइका या सदरामधून उत्तरं देईल. फॅशन आणि स्टाइलिंगविषयीचे आपले कोणतेही प्रश्न viva@expressindia.com या ईमेल आयडीवर बिनधास्त पाठवा. आपलं नाव, राहण्याचं ठिकाण यांसह प्रश्न पाठवा आणि सब्जेक्ट लाइनमध्ये स्टाइलिंग बाय मलाइका असं आवर्जून लिहा.