प्रसिद्ध मॉडेल आणि बॉलिवूडची स्टाइल दिवा म्हणून ओळखली जाणारी मलाइका देतेय स्टाइल टिप्स खास व्हिवाच्या वाचकांसाठी.
हाय,
मी शीतल. मी औरंगाबादची राहणारी असून, माझे वय २४ वर्षे आहे. माझी उंची ४ फूट ९ इंच व वजन ४७ किलो आहे. मी रंगाने सावळी आहे. खरं तर मी फारशी फॅशन वगैरे फॉलो करत नाही, पण माझ्या अंगकाठीला योग्य दिसतील असे कपडे मला घालायला आवडतील. माझी उंची थोडी कमी आहे, तेव्हा माझ्या स्वत:च्या लग्नप्रसंगी, मला कोणते कपडे शोभून दिसतील? याबद्दल काही टिप्स मिळतील का?
हॅल्लो शीतल,
गुड, चांगला प्रश्न विचारलायस तू शीतल. मुख्य म्हणजे हेच तुझे योग्य वय आहे, स्टायलिंग फण्डाज जाणून घ्यायचे. काँग्रॅच्युलेशन्स जर तुझं लग्न ठरलं असेल तर. लग्नात कसं स्टाइलिंग करू, असं तू विचारलं आहेस. आधी आपण सकारात्मक बाबींबद्दल बोलू या. यू आर लकी, की तू रंगाने सावळी आहेस, त्यामुळे काही छान, छान कलर्सचे कपडे तू आरामात घालू शकतेस. उदाहरणार्थ गुलाबी रंगाच्या छटा, पोवळी (कोरल) तुझ्या त्वचेच्या रंगाला सूट करतील. तुझ्या वजन आणि उंचीच्या वर्णनावरून, तू बांध्याने लहानखुरी असावीस असे वाटते, पण हरकत नाही, एका अर्थी ते चांगलेच आहे, कारण तुझ्या लग्नप्रसंगी तुला हवे असतील त्या प्रकारचे कपडे तुला घालता येतील. आयुष्यातल्या खूप महत्त्वाच्या, आनंदाच्या आणि पुन्हा परत न येणाऱ्या, तुझ्या लग्नदिवशी तू मनासारखी नटून-थटून, सुंदर, शालीन दिसायला हवेस, नाही का?
आपण प्रसंगानुरूप कोणकोणते ड्रेसेस घालता येतील ते पाहू या. ‘संगीत’ समारंभासाठी किंवा त्यासारखा कुठला कार्यक्रम तुमच्याकडे असेल त्यासाठी नाजूक वर्क असलेला, पण वजनाला हलका असेल असा लेहंगा ड्रेस तुला ट्राय करता येईल. आता वेळ दुपारची असेल तर त्याप्रमाणे मंद रंगसंगतीतील अबोली (पीच), फिरोजी हिरवा (मिंट कलर) असा लेहंगा आणि गडद (लेहंग्याच्या रंगातील फ्लुरोसंट कलर) रंगाचा ब्लाउज यामध्ये तुझं रूप अगदी उठून दिसेल. पण यावर भरमसाट दागिने घालण्यापेक्षा, छोटासा एकपदरी सोन्याचा नेकलेस छान दिसेल. खरं तर तुझ्या रंगाला मोत्याचे दागिने फार छान, तेव्हा मोती आणि मंद रंगसंगतीचे कपडे, यात बघच तू कशी खुलून दिसशील.
आता रात्री असेल मुख्य लग्नप्रसंग किंवा लग्नाचा स्वागत समारंभ (रिसेप्शन), तेव्हासाठी पारंपरिक फेस्टिव्ह लाल किंवा गुलाबी नाही तर मोरचुदी निळा (पिकॉक ब्ल्यू) रंगातील कपडे उठून दिसतील. या सर्वावर सोन्याचे दागदागिने सुंदर दिसतीलच, पण जर तुला काही तरी नावीन्यपूर्ण दागिने घालायचे असतील तर ‘ब्लॅक डायमंड्स’ किंवा ‘प्लॅटिनम’ची ज्वेलरी एकदम ‘क्लासी, ग्रेसफुल’ दिसेल. हे सर्व झालं कपडय़ांबद्दल. पण त्या स्पेशल दिवसासाठी स्पेशल केशरचनाही तुझ्या लुकमध्ये वेगळाच दिमाख आणू शकते. तेव्हा खास लग्नी हेअरस्टाइल्स नक्की ट्राय कर. आणि मुख्य म्हणजे या कामासाठी उत्तम दर्जाचा हेअरस्टाइलिस्टच्या आत्तापासूनच शोधात राहा. सरतेशेवटी मेकअपबद्दल बोलायचं तर, हलकासाच मेकअप करणे योग्य ठरेल. यामुळे तुझ्या नैसर्गिक सौंदर्याला सोज्वळ झाक येईल. सो डीयर, गेट, सेट, गो फॉर युअर वेडिंग डे. तुला खूप खूप शुभेच्छा.
मलाइका अरोरा खान
(अनुवाद – गीता सोनी)
सौजन्य – द लेबल कॉर्प
http://www.thelabelcorp.com, http://www.theclosetlabel.com
आपल्या गर्ल्स गँगबरोबर सकाळी ब्रंचला जाणार आहात की रात्री पार्टीचा प्लॅन आहे? काय घालू, कसं दिसेल या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी स्टाइल दिवा मलाइका अरोरा-खान तुम्हाला मदत करेल. फॅशन, कपडे, हेअर, स्टाइलिंग याबाबतच्या तुमच्या शंकांना मलाइका या सदरामधून उत्तरं देईल. फॅशन आणि स्टाइलिंगविषयीचे आपले कोणतेही प्रश्न viva@expressindia.com या इमेल आयडीवर बिनधास्त पाठवा. आपलं नाव, राहण्याचं ठिकाण यांसह प्रश्न पाठवा आणि सब्जेक्ट लाइनमध्ये स्टाइलिंग बाय मलाइका असं आवर्जून लिहा.