||तेजश्री गायकवाड

समकालीन फॅशन, ट्रेण्ड्स, कला-तंत्रज्ञान यांचा प्रभाव एकंदरीतच डिझाइनिंगवरही होत असतो. आपली घरं-कार्यालये वा अन्य वास्तू यांचे इंटिरिअर डेकोरेशन असो किंवा होम डेकोरचे अन्य साहित्य, फर्निचर सगळ्यावरच त्याचा प्रभाव असतो, हे सगळ्यांनाच परिचित आहे. मात्र गेल्या काही वर्षांत होम डेकोर ब्रॅण्डमध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या गौरी खान यांनी या वेळी तत्त्वज्ञानाचा प्रभाव असलेले इंटिरिअर डिझाइन्स सादर केले. गेल्या काही वर्षांत एकूणच लक्झरीयस, श्रीमंती दिसेल, उच्च मूल्ये जपणारे डिझाइनिंग दिसेल आणि त्यातून काही अर्थसंगती साधता येईल, अशा प्रकारच्या डेकोर उत्पादनांची मागणी वाढत असल्याचे गौरी खान यांनी स्पष्ट केले.

‘एडी डिझाइन शो’ हा नामांकित शो मुंबईत पार पडला होता. या शोमध्ये अनेक नामवंत डेकोर ब्रॅण्ड्स, आर्ट गॅलरी, डिझाइनर स्टुडिओ अशांचा सहभाग होता. गौरी खान यांनी पहिल्यांदाच या शोमध्ये आपल्या होम डेकोर ब्रॅण्डचे कलेक्शन सादर केले. यानिमित्ताने बोलताना, केवळ इंटिरिअरवर लक्ष न देता त्याच्या क ॉन्सेप्ट डिझाइनिंगवर भर देणे गरजेचे आहे, कारण सध्या लोकांना घरातील फर्निचर असो वा अन्य वस्तू त्या एका विशिष्ट पद्धतीने डिझाइन केलेल्या, रंगसंगती असलेल्या अशा हव्या असतात. त्यामुळे इंटिरिअर डिझाइन करताना काही नवनवीन संकल्पनांचा विचार आवश्यक ठरतो. आम्ही या वेळी तत्त्वज्ञान हे आपल्या दैनंदिन आयुष्यात सगळ्याच ठिकाणी कशा पद्धतीने सहज प्रभाव टाकतं, हा विचार करून त्या पद्धतीने इंटिरिअर डिझाइन केले, असे गौरी यांनी सांगितले. हे डिझाइनिंग केवळ घरातील डेकोरसाठी नाही तर किरकोळ आऊटलेट्स, रेस्टॉरंट्स, स्पा अशा विविध ठिकाणी वापरता येते. स्थानिक कारागिरांची कुशलता, नवनवीन संकल्पना आणि भारतीय कलाकुसर, विचार यांच्यातून सादर झालेल्या क लेक्शनचे जागतिक स्तरावर ब्रॅण्डिंग अशा पद्धतीने आपण काम करत असल्याचेही तिने स्पष्ट केले.

बॉलीवूडचा बादशाह शाहरूख खान याची पत्नी एवढीच आपली ओळख मर्यादित न ठेवता होम डेकोर क्षेत्रात उद्योजिका म्हणून आपला ठसा उमटवणाऱ्या गौरी यांनी कुठल्याही क्षेत्रात पुढे जाण्यासाठी त्यात येऊ घातलेले बदल ओळखून त्यानुसार आपल्या उत्पादनात बदल करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. आपण नव्या दशकात प्रवेश करतो आहोत, त्यामुळे सगळ्याच क्षेत्रात काही ना काही बदल मोठय़ा प्रमाणात होणार आहेत आणि इंटिरिअर डिझाइनिंगचे क्षेत्रही त्याला अपवाद नाही, असे त्यांनी सांगितले. सध्या इंटिरिअरमध्ये अत्यंत उच्च दर्जाचे, शैलीचे आणि श्रीमंती थाट दाखवणाऱ्या डिझाइन्सना होम डेकोर आणि इंटिरिअर डिझाइनिंगमध्येही मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच जोडीला एकीकडे पर्यावरणपूरक उत्पादने, तसेच हाताने बनवलेल्या खास वस्तूंची मागणी वाढली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. उत्तम इंटिरिअर डिझाइनर होण्यासाठी सातत्याने डिझाइनिंग कलेतील बदल शिकून घेत राहायला हवेत, एकीकडे आपली कला अपडेट करणं जसं महत्त्वाचं आहे, तसंच वेगवेगळ्या ठिकाणचे प्रवास, वेगवेगळ्या विचारांच्या, स्तराच्या लोकांना भेटणे यातूनही आपले अनुभवविश्व समृद्ध होत जाते, कलाजाणिवा विस्तारतात, असं मतही गौरी खान यांनी व्यक्त केलं. सध्या लोकांचा डिझाइनर्सवर इतका विश्वास आहे की, ते आपली कल्पना सांगून त्यांचे घर अत्यंत विश्वासाने, मोकळेपणाने आपल्यावर सोपवतात. त्यामुळे त्यांना आवडेल, त्यांचे समाधान होईल, त्यांना आनंद देईल अशा पद्धतीचे डिझाइनिंग त्यांना देणे हे एक व्यावसायिक म्हणून आपले कर्तव्य आहे, असंही त्यांनी सांगितलं.

वैयक्तिक पातळीवर एक पत्नी, आई आणि उद्योजिका या तिन्ही भूमिका साकारणे हा आनंददायी अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले. फार तरुण वयात लग्न झाले. त्यामुळे लग्नानंतरही शाहरूख आणि मी.. आम्ही एकमेकांची वैयक्तिक जडणघडण, करिअरचा संघर्ष हे सगळं एकत्रितरीत्या अनुभवलं आहे. त्यामुळे या टप्प्यावरही आम्ही आमच्या प्रत्येक निर्णयात एकमेकांचा सल्ला घेतो. त्याला कलेची जाण असल्याने साहजिकच माझ्या व्यवसायात मला मदतच होते, असे सांगतानाच आज कुठल्याही क्षेत्रात, वयाच्या कुठल्याही टप्प्यावर स्त्रीला आपली करिअर उत्तम घडवता येऊ शकते आणि हा खूप मोठा, सुखावणारा बदल असल्याचे गौरी खान यांनी सांगितले.

viva@expressindia.com

Story img Loader