आजकाल फिटनेससाठी उपास करणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. फास्टिंग फॉर फिटनेस हे लॉजिक त्यांना जास्त मानवतं. झटपट वेटलॉससाठी उपासाचा मार्ग काहीजणी आचरतात. क्रॅश डाएट, इंटरमिटंट फास्टिंग हे शब्द हेल्थ कॉन्शस तरुणाईसाठी काही वेगळे राहिलेले नाहीत. काय आहे याचा अर्थ? ‘फास्टिंग फॉर फिटनेस’बाबत डाएटिशियन आणि न्यूट्रिशनस्टिचं म्हणणं काय आहे? फास्टिंगडाएटसाठी त्यांनी दिलेल्या काही टिप्स..
उपासाची परंपरा सगळ्या धर्मामध्ये आणि संस्कृतींमध्ये अगदी पूर्वापार चालत आली आहे. ठराविक कालावधीसाठी अगदी अल्पसा आहार घेणं किंवा जड पदार्थ दूर ठेवून पोटाला विश्रांती देणं हा उपासामागचा उद्देश. पचायला अगदी हलके पदार्थ आणि नैसर्गिक पदार्थ (कोणतीही प्रक्रिया न केलेले)खाल्ले तर त्या रुटीनची गणना उपास म्हणून करता येईल. फास्टिंग फॉर फिटनेस या संकल्पनेत काही नवीन फंडे आले आहेत. विशेषत पाश्चिमात्य देशात इंटरमिटंट फास्टिंग आणि क्रॅश डाएट सध्या चलतीत आहे.
न्यूट्रिशनिस्ट ज्योती सावंत म्हणतात, ‘उपासामुळे शरिराच्या काही क्रियांना विश्रांती मिळते. पचनक्रिया सुधारते. शरीर शुद्धीसाठी उपास उपयोगी पडतो. पण तो योग्य रितीने केलेला हवा. यालाच ऑटोलिसिस किंवा ऑटो डायजेशन म्हणतात. या प्रक्रियेत शरिरातल्या न वापरलेल्या फॅट्ची ऊर्जा वापरली जाते. विषद्रव्य किंवा टॉक्सिन्स साठून राहिलेले असतात ते या प्रक्रियेत बाहेर येतात. ही उपासामधली महत्त्वाची क्रिया असते.’

इंटरमिटंट फास्टिंग
हल्ली पाश्चिमात्य देशांमध्ये इंटरमिटंट फास्टिंगची संकल्पना चांगली मूळ धरू लागलीय. याचा अर्थ ठराविक काळाच्या उपासानंतर खायचं. इथे उपास म्हणजे फक्त पाणी किंवा लो कॅलरी ड्रिंक एवढंच अपेक्षित आहे. थोडक्यात जेवायची – खायची वेळ ठरवून घ्यायची आणि मधल्या वेळात उपास करायचा. इंटरमिटंट फास्टिंगचे वेगवेगळे प्रकार आहेत. काहीजण एकाआड एक दिवस जेवतात. फीस्ट डे आणि फास्ट डे असं त्यांचं रुटीन असतं. तर काहीजण ५  २ डाएट फॉलो करतात. म्हणजे आठवडय़ातून पाच दिवस व्यवस्थित जेवण करायचं आणि दोन दिवस पोटाला विश्रांती द्यायची. म्हणजेच लो कॅलरी फूड किंवा फक्त लिक्विड डाएट घ्यायचं. फिटनेस एक्सपर्ट लीनी फर्नाडिस म्हणतात, ‘इंटसमिटंट फास्टिंगची संकल्पना साधी आहे. यामुळं काही दिवस जास्त कॅलरीज पोटात जातात तर काही दिवस गरजेपेक्षा कमी. या टेक्निकमुळे ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत होते. फॅट्स कमी होतात आणि इन्शुलिन सेन्सिटीव्हिटी वाढते. या फायद्यामुळे अनेक लोक इंटरमिटंट फास्टिंगला आपल्या जीवनशैलीचा भाग बनवत आहेत.’

उपास आणि वेटलॉस
सेलिब्रिटी फिटनेस अँड न्यूट्रिशन एक्सपर्ट विनोद चन्ना म्हणतात, ‘उपासामुळे वजन घटतं खरं. पण असं वजन घटवण्यासाठी हा काही योग्य पर्याय नाही कारण थोडय़ाच कालावधीसाठी हा परिणाम राहतो. आपल्याला कायम टिकणारा पर्याय शोधायला हवा. उपासामुळे भराभर वजन घटतं. पण उपास करण्याचं थांबवल्यावर त्याच वेगानं वजन पुन्हा वाढतं. त्यामुळे सारखा उपास करणं टाळाच. आठवड्यातून एकदा उपास करणं चांगलं. पण त्यावेळी अनावश्यक उपासाचे पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. योगासनं आणि व्यायाम करण्याअगोदर दोन तास उपोषितच राहिलं पाहिजे.’
उपासापेक्षाही डाएटचा नियमित प्लॅन आवश्यक असल्याचं विनोद चन्ना यांचं मत आहे.

क्रॅश डाएट
क्रॅश डाएट म्हणजे अत्यल्प खाणं. दिवसाला एकच फळ आणि दूध किंवा दिवसभरात अर्धी पोळी असं क्रॅश डाएट वजन कमी करण्यासाठी काहीजण सुचवतात. पण असं क्रॅश डाएट धोकादायक असतं, असं विनोद चन्ना यांनी सांगितलं. ‘वजन आटोक्यात ठेवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी भरपूर व्यायाम आणि लो कॅलरी फूड हे उपाय आहेत. दिवसभरातून पाच वेळा खावं. फाईव्ह मील्स अ डे हा सगळ्याच फायदेशीर, थकवा न देणारा आणि दीर्घकाळ टिकणारा पर्याय आहे. अशा डाएटमुळं वजन आटोक्यात राहतं शिवाय त्वचा तुकतुकीत राहते. शरिराला आवश्यक घटक मिळत राहतात. त्यामुळे फाईव्ह मिल्स अ डे किंवा अल्टरनेट डाएट चांगलं’, असं ते सुचवतात.

फास्टिंग डाएटसाठी टिप्स
– भरपूर पाणी प्या
– फळं आणि ताज्या भाजांमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. फळं खाल्ल्यानं फ्री रॅडिकल्सपासून असणाारा धोका उद्भवत नाही.
– कॅफिन असणारी पेय म्हणजे चहा – कॉफी टाळा. कारण त्यामुळे तात्पुरती हुशारी वाटत असली तरी त्यामुळे डिहायड्रेशनची प्रक्रिया वेगानं होते आणि शरिरातली आवश्यक जीवनसत्त्व त्यावाटे निघून जातात.
– कृत्रिम आणि प्रोसेस्ड फूड खाणं टाळा
– खजूर, फळं, राजगिरा आवर्जून खा. पण उपासादरम्यान किंवा नंतर तळकट, तूपकट पदार्थ टाळा.

(फोटो सम्जुक्ता मोकाशी)

Story img Loader