अवघ्या चार दिवसांवर रंगपंचमी येऊन ठेपली आहे. आपल्याकडे प्रत्येक ऋतूची सुरुवात ही कोणत्या ना कोणत्या सणानेच होते आणि सण म्हटलं की सेलिब्रेशन आलंच आणि सेलिब्रेशन म्हणजे तरूणांसाठी पर्वणीच. आता उन्हाळ्याचंच बघा ना, स्टार्टिगलाच धमाल इव्हेंट असतो ‘रंगपंचमी’सारखा मग ‘सेलिब्रेशन तो बनता हैं यार!’ आजकाल आम्हाला या नॉनस्टॉप लाइफ रेसमधून थोडासा विसावा मिळतो तो या अशा रंगबिरंगी इव्हेंटमुळेच सांगत्येय निकीता म्हात्रे
‘‘अरे यार.. होळीचा काहीतरी प्लॅन ठरला आहे का?’’ ‘‘अरे रिसॉर्टवर जाऊ’’, ‘‘नको रे.. काय नेहमी नेहमी रिसॉर्टमध्ये, कुठेतरी पिकनिक स्पॉटला वगैरे जाऊ फिरायला’’, ‘‘अरे नको रे, रोज जॉबसाठी फिरतो ते काय कमी आहे, दुसरं काहीतरी बघा’’, ‘‘अजून उन्हाळा नाही सुरू झाला आणि आतापासूनच फार उकडायला लागलं आहे त्यामुळे रिसॉर्ट नाहीतर बीचच बरा. तेव्हा ठरवा आता लवकर; पण एकच दिवसाची पिकनिक हा.. मला जॉबला सुट्टी नाही’’, अशा काहीशा गप्पांना मधूनच नेहमीचे ऋतू आम्हाला गवसतात. रेसच्या घोडय़ासारखं आमचं आयुष्य, धकाधकीचं. त्यात आम्हाला सवय सिमेंट काँक्रीटच्या जंगलाची आणि मिनरल वॉटरची. त्यामुळे खरा निसर्ग कसा असेल, याचा अंदाजच काय तो आम्हाला ठाऊक, पण म्हणून आम्हाला निसर्गाची आवड नाही असे नाही हा..
तसं पाहिलं तर आपल्या प्रत्येक ऋतूची सुरुवात ही कोणत्या ना कोणत्या सणानेच होते आणि सण म्हटलं की सेलिब्रेशन आलंच आणि सेलिब्रेशन म्हणजे आमच्यासाठी पर्वणीच. आता उन्हाळ्याचंच बघा ना, स्टार्टिगलाच धमाल इव्हेंट असतो ‘रंगपंचमी’सारखा मग ‘सेलिब्रेशन तो बनता हैं यार!’ आजकाल आम्हाला या नॉनस्टॉप लाइफ रेसमधून थोडासा विसावा मिळतो तो या अशा इव्हेंटमुळेच.
खूप बिझी असलो तरी संवेदना जाग्याच असतात. प्रत्येक गोष्टीला समजून घेण्याची, पारखण्याची उत्सुकता असते. उन्हाळ्याचा तसा कंटाळाच येतो, सगळीकडे कोरडेपणा, उकाडा, घाम, तापलेलं वातावरण त्यामुळे सगळ्यांनाच उन्हाळा नकोसा वाटतो. आपल्या शहरातल्यांना प्रचंड उकाडय़ाशिवाय दुसरा काही त्रास नसतो. पाणी एखाद्या दिवशी कपात म्हणून येत नाही, पण दुसऱ्या दिवसापासून सगळं सुरळीत असतं. ना शेतीची चिंता ना झाडा-माडाची, पण गावात मात्र डोक्यावर तापणारा सूर्य सर्वच पोळून काढत असतो. एकीकडे शेतं, बागा, वाडय़ा जळून कोळसा होताहेत, तर दुसरीकडे पाणवठे सुकून कोरडे झाले आहेत, सर्वत्र दुष्काळी अवस्था नांदते आहे आणि या सर्वामुळे प्राण्यांची आणि माणसांची होणारी परवड बघवत नाही. जसजसा पारा वाढत जातो तशीतशी परिस्थिती अजूनच गंभीर होत जाते. मग मैलोन्मैल पाण्यासाठी पायपीट सुरू होते..
होरपळून टाकणारा हाच उन्हाळा निसर्गाच्या विविध पैलूंना समोर आणतो. घराबाहेरचा भरभरून मोहरलेला आंबा पाहिला की, आजीच्या कैरीच्या लोणच्याची आठवण होते. कोकिळेची हाक तर नेहमीचीच, पण दरमजल करीत आलेले फ्लेमिंगो गुलाबी रंगाची रांगोळी काढताहेत की काय, असा भास होतो. बागेतला बहरलेला विविध रंगांचा गुलाब जणू सर्वत्र रंगांची उधळणच करतो आहे, असे वाटते. मार्केटमध्ये आलेला कलिंगडांचा ढीग तापत्या उन्हातपण मनाला आणि शरीराला तृप्त करून जातो. ऑफिसच्या खिडक्यांच्या काचांतून येणारी संध्याकाळची सूर्याची किरणे दिवसभराचा सर्व ताप क्षीणवत मऊ उबदार दुलई अंगावर पांघरतात. मग एखाद्या बीचवर जावं आणि आश्चर्याने सूर्याला विचारावं, ‘अरे तू तोच ना जो सकाळपासून सगळं जग जाळायला निघाला आहेस.’ तिथेच वाळूमध्ये लोळताना बाबाची आठवण यावी आणि तो जसा बाहेरून रागीट आणि मनातून प्रेमळ वाटतो, तशी ही वाळू वरून तापलेली आणि आतून थंडगार लागावी. निसर्गाचा खरा आविष्कार तर या काँक्रीटच्या जंगलाबाहेर दिसतो. उन्हाळ्यात म्हणे वणवे पेटतात, सगळं रान खाऊन टाकतात, पण खरा वणवा तर गुलमोहराचा पेटतो, लाल, पिवळ्या फुलांचा ताटवा, असं वाटतं की, संपूर्ण जग आपल्यात व्यापून घेईल. शांत आणि तटस्थ अशा पिंपळाच्या खोडांच्या करामती काही औरच.. लहानपणी त्या खोडातच लपायची चांगली जागा असायची, रात्रीचा तो फार भयाण दिसे, पण तापत्या उन्हात त्याच खोडांमध्ये खूप थंडगार वाटे. शेताची एवढे माहिती नाही, पण बांधावरच्या नारळाची, फणसाची, आंबा, पेरू, काजू, चिकू, जाम, चिंचा आणि अशी बरीच फळ-झाडं हुंदडून झाल्यावर फार मजेशीर नाश्ता देत. डोक्यावर सूर्य जरी तापत असला तरी मातीत खेळताना तिचा गारवा फार सुखावतो. गावच्या घराच्या अंगणात झोपायचे आणि झाडावर घरटी बांधण्यासाठी आणि आपला जोडीदार मिळविण्यासाठी धडपडणाऱ्या वेगवेगळ्या पक्ष्यांना पाहायचे तर रात्रीच्या वेळी पोळून काळ्या पडलेल्या पण आता थंड झालेल्या आकाशाकडे पाहिले की, त्या चांदण्या जणू काहीतरी मॅजिक गेम खेळताहेत असं वाटते आणि ते पाहता पाहता डोळ्यांच्या पापण्या अलगद बंद होतात आणि आपण निद्राधीन होतो.
अशा या उन्हाळ्यात निसर्गाचे हे रूप पाहताना दुष्काळ, वणवे, सुकून कोरडे झालेले पाणवठे, ग्लोबल वॉर्मिग आणि त्यावर होणारी राजकारण्यांची, विचारवंतांची चर्चासत्रे यांना काहीच मोल उरत नाही. कारण वाईट नष्ट करणं आणि नव्या जोमाचं चांगलं विश्व बनविणं हेच त्याचं काम आहे आणि निसर्ग आपलं काम अविरतपणे चालूच ठेवतो. हा आता आपणच त्याच्या मुळावर उठलो असताना त्याने प्रतिवार करणे साहजिकच आहे आणि तो प्रतिवारही संतुलन बनवून ठेवण्यासाठीच असतो.