मितेश रतिश जोशी
निर्बंधमुक्त गणेशोत्सव यंदाच्या वर्षी धूमधडाक्यात पार पडला. यंदा उत्सवात अनेक तरुण नव्याने गणेशोत्सव मंडळात कार्यकर्ते, स्वयंसेवकांच्या भूमिकेत तर दिसलेच, पण काही तरुण परिस्थितीचं भान राखत एकमेकांना साहाय्य करत सामाजिक जबाबदारी पार पाडतानाही दिसले. सामाजिक बांधिलकीतून त्यांनी गणेशोत्सवात केलेल्या कार्यात काय वेगळेपण यंदा पाहायला मिळालं याचा एक आढावा..
‘गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला..’, ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषात मुंबई- पुण्याबरोबरच महाराष्ट्रभरात गणरायांना निरोप दिला गेला. करोनाचे महासंकट टळल्यापासून पहिल्यांदाच कोणत्याही निर्बंधाशिवाय उत्साहात गणेशोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. गणेशाचं आगमन, पूजन आणि विसर्जनही दणक्यात पार पडलं. या दहा दिवसांच्या काळात अनेक तरुण-तरुणी वेगवेगळय़ा प्रकारे गणरायाच्या सेवेत रुजू झाले होते. त्यातीलच एक संदेश भिंगार्डे हा तरुण. सणांचा आनंद अंध मुलांनाही घेता यावा ही त्याची धडपड होती. या मुलांना एकत्र करून मुंबईतील प्रमुख गणेशोत्सव मंडळांना भेट देण्याचं काम संदेश आणि त्याच्या १७ स्वयंसेवकांनी केलं. गणेशोत्सव मंडळातील देखावे, तिथल्या मंडळांचा इतिहास समजावून सांगण्याचं काम संदेशने आपल्या सहकाऱ्यांबरोबर मिळून केलं. याविषयी संदेश सांगतो, ‘आम्ही ४ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता आमच्या १५ अंध मित्रांबरोबर गणेशोत्सव मंडळांना भेट द्यायला सज्ज झालो. प्रत्येक मंडळात अर्धा तास थांबून तिथला देखावा सगळय़ांना समजावून सांगितला जायचा. काही मंडळांत शक्य असेल तिथे स्पर्शाच्या माध्यमातून तो देखावा सगळय़ांना अनुभवायला मिळाला. त्याचबरोबर जुन्या व बहुचर्चित मंडळांचा इतिहास सांगून योग्य ती माहिती सर्व अंध मित्रांबरोबर शेअर करण्यात आली.’ एकूण ११ गणेशोत्सव मंडळांना भेट दिल्याची माहिती संदेशने दिली. अंध मित्र नेहमीच त्यांच्या कुटुंबीयांबरोबर किंवा एखाद्या अंध मित्राला सोबत घेऊन गणेशोत्सव मंडळांना भेट देतात, पण त्या वेळी त्यांना योग्यरीतीने माहिती मिळतेच असं नाही. ती माहिती सांगून त्यांच्या मनात देखावा उभं करण्याचं, खऱ्या अर्थाने गणेशोत्सवाच्या आनंदाची अनुभूती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम संदेश व त्याच्या साथीदारांनी केलं.
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या सहकार्याने अनेक तरुण स्वयंसेवकांनी यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत सेवा दिली. ट्रस्टच्या सिद्धार्थ गोडसे या तरुण कार्यकर्त्यांने याविषयीची माहिती देताना सांगितलं, मुंबई- पुण्यातील गणेशोत्सवाकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलेलं असतं. पुणे शहराला मुंबईसारखा विस्तीर्ण समुद्र लाभला नसल्याने गणेश विसर्जनाची खूप मोठी चिंता पुणेकरांना सतावत असते. महानगरपालिका ठिकठिकाणी हौदाची सोय करते, पण अनेकदा विसर्जनानंतरही मूर्तीचे काही अवशेष मागे राहतात. त्या हौदात पूर्णपणे विसर्जन न झालेल्या गणेशमूर्तीचं पुनर्विसर्जन करण्याची मोहीम शेकडो तरुण मुलांनी हाती घेतली. अनेक तरुण-तरुणींनी एकत्र येऊन अशा शेकडो गणेशमूर्तीचं पुनर्विसर्जन खडकवासला धरण क्षेत्रात केलं, असं त्याने सांगितलं.
नाईट लाइफसाठी प्रसिद्ध असणारी मुंबई गणेशोत्सवाचे दहा दिवस लख्ख जागी असते. रात्री गणपतीचे देखावे पाहण्यासाठी होणारी गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी, प्रमुख व लोकप्रिय गणपतीचे दर्शन घेण्यासाठी होणाऱ्या गर्दीवर, खेचाखेचीवर बंधन ठेवण्यासाठी मुंबई पोलीस अहोरात्र तत्पर असतात. गणेशभक्तांच्या सुरक्षेसाठी तासन् तास उभ्या असणाऱ्या मुंबई पोलिसांच्या कार्याला सलाम म्हणून गणेशोत्सवाच्या रात्री बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस तसेच जवानांना चहा व बिस्किटांचं वाटप करण्यासाठी मुंबईतील तरुण- तरुणींच्या एका चमूने पुढाकार घेतला होता. ‘कप ऑफ स्माईल’ असे या चमूचे नाव असून रात्री ८ ते ११ वाजेपर्यंत पोलिसांना चहा- बिस्किट वाटपाची सेवा त्यांच्याकडून केली गेली. या उपक्रमाची माहिती सांगताना ज्ञानेश्वरी वेलणकर ही तरुणी म्हणाली, आपल्या आयुष्यातले आनंदाचे क्षण आपण पोलिसांच्या खांद्यावर जबाबदारी टाकून अनुभवत असतो. आपल्या कृतीतून कधी तरी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद यावा, या भावनेतून आमच्या उपक्रमाची सुरुवात झाली. कॉलेज, नोकरी, घरच्या जबाबदाऱ्या सांभाळताना धावपळीच्या या लाइफस्टाइलमध्ये मुंबईच्या रक्षणासाठी तत्पर असणाऱ्या पोलिसांसाठी काम करण्याची संधी एरवी सहज मिळत नाही. परंतु या उपक्रमामुळे गणरायाच्या भक्तांची काळजी घेणाऱ्या पोलिसांची काळजी घेण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. यंदाच्या वर्षी आम्ही विसर्जनाच्या मुख्य पाच दिवशी रात्री ८ ते ११ पर्यंत हजारो पोलीस बांधवांना चहा, बिस्किटं तसेच पाण्याचंही वाटप केलं असं तिने सांगितलं. गेल्या पाच वर्षांपासून आम्ही हा उपक्रम राबवत असल्यामुळे काही पोलीसमामा चेहऱ्यावरून ओळखीचे झाले आहेत, असं ती सांगते. जसं दरवर्षी त्या त्या मंडळातल्या गणपतीला पाहून भक्तांना समाधान मिळतं, तेच समाधान आम्हा तरुणांना त्यांना क्षणभर विश्रांती देऊन मिळतं असं ती सांगते.
यंदाचा गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा तर झालाच. पण त्याचबरोबर अनेक तरुण मुलांनी आपली सामाजिक जबाबदारी पार पाडण्याचासुद्धा प्रयत्न केला. मुंबईतील चौपाटय़ांवर गणरायाला निरोप देण्यासाठी गणेशभक्त मोठय़ा संख्येने दाखल होतात. पण विसर्जनानंतर या भागात घाणीचं साम्राज्य पसरलेलं असतं, हे दरवर्षीचं चित्र आहे. ओहोटीमुळे गणेशमूर्ती समुद्रकिनाऱ्यावर येऊन पडलेल्या दिसतात, पण यंदा अनेक सामाजिक संस्थांनी तरुणाईच्या सहकार्याने समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली. वेगवेगळय़ा संस्थांनी आयोजित केलेल्या साफसफाईच्या या कामांमध्ये हजारोंच्या संख्येने तरुण-तरुणी सहभागी झाले होते. वाळूत रुतलेले गणेशमूर्तीचे अवशेष तसंच निर्माल्य उचलून किनारा स्वच्छ करण्याचं काम या तरुणाईने केलं. केवळ मुंबईतच नाही तर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवरही ही मोहीम राबविण्यात आली होती. त्याचबरोबर विसर्जन मिरवणुकीत होणाऱ्या गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठीसुद्धा तरुणांचा चमू पुढे आलेला दिसला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला एकमेकांचे हात धरत मोठी साखळी करून गर्दीचं व्यवस्थापन करताना तरुणाई दिसत होती. या वर्षी निर्बंधमुक्त आणि अत्यंत उत्साहात, जल्लोषात गणेशोत्सव साजरा झाला. तरुणाईने उत्सव साजरा करताना जो जल्लोष दाखवला तितक्याच जबाबदारीच्या भावनेतून त्यांनी या उत्सवात सामाजिक कार्यातही पुढाकार घेतला. ऐन गणेशोत्सवात आणि त्यानंतरही कुठे काही बिघडू नये वा कोणावर उत्सवाच्या कामांचा ताण येत असेल तर त्यांचा ताण हलका करण्याचा प्रयत्न करत सामाजिक जबाबदारीची भावनाही त्याच असोशीने जपली. त्यामुळे उत्सवातला उत्साह आणि आनंद कायम राखता आला.
viva@expressindia.com