फुटबॉल फॅन्समध्ये मुलींची संख्या बरीच आहे. मुलांइतकाच इंटरेस्ट घेऊन मुली सामने बघताहेत आणि आपापल्या आवडत्या टीमला, प्लेअरला सपोर्ट करीत आहेत. पण मुलींसाठी टीम जर्सीचा विचार केल्यास ठरावीक पॅटर्नच्या आणि ठरावीक साइजच्याच दिसतात. एखाद-दुसऱ्या टीमचा टी शर्ट मुलींसाठी उपलब्ध आहे. पण डोन्ट वरी! आम्ही घेऊन आलोय काही फिफा फॅशन ट्रिक्स.
ही कॉम्बिनेशन ट्राय करून तुम्ही तुमच्या टीमला सपोर्ट करू शकता आणि टीमच्या रंगसंगतीत मिसळून फिफामय वातावरणात एकरूप होऊ शकता. सध्या नेलआर्टच्या माध्यमातून विविध देशांचे फ्लॅग्ज तुमच्या नखावर उमटवण्याची फॅशन इन आहे.
आम्ही देतोय ती फिफा फॅशन त्या त्या देशाच्या रंगांवर आधारित आहे. तुम्ही तुमची कल्पकता वापरून या रंगसंगतीवर आधारित तुमची स्वत:ची युनिक फिफा फॅशन करू शकता. या फक्त गाइडलाइन्स..
जर्मनी (काळा, लाल, पिवळा)
या टीमला जर तुम्ही सपोर्ट करणार असाल तर ब्लॅक, रेड, यलो या रंगांचा वापर करायला हवा. ब्लॅक जीन्सवर रेड यलो शेड्सचा टॉप घालणं ही सगळ्यात सोपी फॅशन ट्रिक. पण आणखी ट्रेण्डी लूक हवा असेल तर लाल डेनिम्स वर यलो आणि ब्लॅक कॉम्बिनेशनचा टॉप आणि ब्लॅक अॅक्सेसरीज घालू शकता. यातल्या कोणत्याही एका रंगाचा स्कर्ट किवा वनपीस ट्राय करू शकता आणि वर उरलेल्या दोन रंगांच्या अॅक्सेसरीज वापरून बघा किंवा रेड यलो कॉम्बिनेशनवर ब्लॅक अम्ब्रॉयडरी असलेले कपडे तुम्ही निवडू शकता. तसंच ब्लॅक अॅक्सेसरीज आणि हॅट वापरू शकता. वनपीसवर ब्लॅक हिल सॅण्डल्स हिट वाटतील.
अर्जेटिना
(लाइट ब्लू आणि व्हाइट)
मेस्सीच्या प्रेमात असणाऱ्या तरुणींनी या टीमला सपोर्ट करणं स्वाभाविकच आहे. व्हाइट आणि ब्लू या रंगांमुळेच कूल आणि कॅजुअल लूक मिळतो. लाइट ब्लू जीन्सचा पर्याय असल्यानं अर्जेटिना फॅशन सगळ्यात सोपी. डंगरीजचा पर्याय तुम्ही ट्राय करू शकता. त्यावर व्हाइट वॉचेस परफेक्ट सूट होतील. स्लिंग बॅगस् इन आहेत सो या लूकसोबत त्या ट्रेण्डी वाटतील.
नेदरलॅण्ड्स (ऑरेंज)
या देशाचे सपोर्टर नेहमीच या केसरिया रंगात न्हाऊन निघाल्यासारखे दिसतात. ऑरेंज कलर व्हायब्रंट आहे आणि अॅक्सेसरीजमध्ये सगळ्यात हिट कलर आहे. हॉलंडच्या सपोर्ट्सना निऑन ऑरेंज स्लिंग बॅग्सचा पर्याय आहे. त्यामुळे या रंगाचा ड्रेस नको असेल तर ऑरेंज कलरचं कडं, नेकपीस आणि बॅग नक्कीच उठून दिसतील. नेलआर्टच्या माध्यमातूनसुद्धा फिफा फिवर पाहायला मिळतोय. वेगवेगळ्या टीमचे फ्लॅग्स नखांवर दिसून येतात.
ब्राझील
(हिरवा आणि पिवळा)
हिरवा आणि पिवळा हे ब्राझीलचे अधिकृत रंग असून या मिक्स कलरचा खास फिफा स्पेशल स्कार्फ बाजारात आला आहे. फ्लिपफ्लॉप अर्थात चपलेतही ब्राझील कलर्स आले आहेत. अशा चपला घातल्या तर त्यावर केप्रिज (पावसाळ्यात उत्तम म्हणून) आणि यलो टॉप..वर ग्रीन स्कार्फ घेऊन ब्राझील लूक तयार होऊ शकेल.
फ्रान्स (लाल, पांढरा, निळा)
फ्रान्स फॉलोअर्स म्हणजे थोडा बोल्ड लूक तर हवाच. रेड व्हाइट ब्लू असं कॉम्बिनेशन असल्यामुळे व्हाइट शॉर्ट्सवर रेड टी शर्ट किंवा क्रॉप टॉप आणि ब्लू जॅकेट असा लूक ट्रेण्डी वाटतो. व्हाइटवर रेड पोल्का डॉटची चलती आहे. शूज या लूकला स्पोर्टी फील देतात.