चांगला होस्ट किंवा गेस्ट बनण्यासाठीचे डायनिंग एटिकेट शिकवणारे सदर. कॉन्टिनेंटल स्टाइल डायनिंगमध्ये काटा-चमचा हातात कसा धरावा, जेवण सुरू असताना आणि खाऊन झाल्यावर कटलरी कशी ठेवणं अपेक्षित असतं याविषयी..
पाश्चात्त्य पद्धतीचं जेवण दोन प्रकाराने खातात – कॉन्टिनेंटल स्टाइल आणि अमेरिकन स्टाइल. पदार्थ जरी तेच असले तरी खाण्याची पद्धत वेगळी असू शकते. कॉन्टिनेंटल स्टाइल म्हणजे मुख्यत: युरोपमध्ये वापरतात ती स्टाइल. या पद्धतीत ब्रेड आणि बटर प्लेट कटलरी सेटिंगच्या सर्वात बाहेरच्या – काटय़ाच्या बाजूला असते. त्यावरची बटर नाइफपण उभी ठेवलेली असते. ही झाली सेटिंगची गोष्ट.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कटलरीचा वापर
जेवताना कॉन्टिनेंटल स्टाइलमध्ये कटलरीचा वापर अशा प्रकारे होतो – डाव्या हातात काटा धरून तो, जो अन्नाचा तुकडा कापायचा असेल, त्यावर रोखून ठेवला जातो. काटय़ाच्या बाहेरच्या बाजूने सुरीने तो पदार्थ कापायचा असतो आणि काटय़ाच्या टोकांमध्ये तयार झालेला त्या पदार्थाचा छोटा तुकडा काटय़ाच्या साहाय्याने, डाव्या हातानेच उचलून तो खाल्ला जातो.
जेवण सुरू असताना, घास तोंडात घेतल्यावर, काटा आणि सुरी प्लेटमध्ये ठेवावी. काटा प्लेटच्या डाव्या बाजूला थोडा तिरका ठेवावा (8’O clock position) आणि सुरी उजव्या बाजूला थोडी तिरकी (4’O clock position) ठेवावी. सुरीच्या धारेची बाजू खाली असावी. याला Resting the cutlery असं म्हणतात. जेवताना कटलरी ‘रेस्ट’ करणं जरुरी असतं. हा वेटरसाठी एक प्रकारचा संकेतही असतो. याने वेटरला कळतं की, जेवण अजून चालू आहे आणि इतक्यात प्लेट उचलता येणार नाही.
जेवण संपल्याचंही सांकेतिकरीत्या सांगता येतं. कॉन्टिनेंटल स्टाइलमध्ये जेवण संपल्यावर काटा आणि सुरी प्लेटमध्ये, एकमेकांच्या शेजारी, उभे ठेवावे (6’ O clock position). काटा डाव्या बाजूला आणि त्याला चिकटून, उजव्या बाजूला शेजारी सुरी ठेवावी. सुरीची पात काटय़ाच्या दिशेने असावी. याला closing the cutlery म्हणतात. अशी कटलरीची पोझिशन पाहिली की वेटर प्लेट उचलतो, भले त्यात अजून अन्न उरलं असलं तरी!
फॉर्मल मेजावान्यांसाठी हे संकेत माहिती असणं गरजेचं आहे. कटलरी ठेवताना सांकेतिक गोंधळ होऊ नये हेच त्याच्या मागचं उद्दिष्ट.

– गौरी खेर

मराठीतील सर्व फाइन डाइन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Continental style eating