पाश्चिमात्य फाइन डाइनमधले विविध कोर्स पाहिल्यानंतर आता त्यांच्या ब्रेकफस्टबद्दल जाणून घेऊ या. काँटिनेंटल, अमेरिकन आणि इंग्लिश हे ब्रेकफस्टचे प्रमुख प्रकार. त्यातल्या प्रसिद्ध इंग्लिश ब्रेकफस्टबद्दल आजच्या लेखात..
ब्रेकफस्ट लाइक अ किंग, लंच लाइक अ प्रिन्स अॅण्ड डाइन लाइक अ पॉपर’ या वाक्याचा पहिला भाग इंग्रज अगदी व्यवस्थित पाळतात! ब्रेकफस्ट हे इंग्रजांचं सर्वात मोठं खाणं असतं. अगदी राजेशाही थाटात चक्क ‘कोर्स बाय कोर्स’ नाश्ता केला जातो.
सर्वात पहिला कोर्स असतो फ्रूट्स किंवा फ्रूटज्यूस. ग्रेपफ्रूट हे सीट्रस जातीचं, थोडं कडवट चवीचं फळ ब्रेकफस्टला खायला पसंत करतात किंवा त्याचा ज्यूस पितात. ज्यांना ग्रेपफ्रूट आवडत नाही त्यांच्यासाठी ऑरेंज ज्यूस असतो. हलक्या साखरेच्या पाकात शिजवलेली प्रून्स किंवा इतर काही काही फळं (स्टय़ूड फ्रूट्स) पण या कोर्सचा भाग असू शकतात.
दुसरा कोर्स आहे सीरिअल्स ( cereals ). सर्वात नामांकित इंग्लिश सीरिअल आहे ‘पॉरीज’ – म्हणजेच ओट्सची लापशी, जी साखर घालून गरम दुधाबरोबर खाल्ली जाते. अर्थातच हे झालं हॉट सीरिअल. अमेरिकेसारखाच पॅकेज्ड सीरिअलचा सुळसुळाट इंग्लंडमध्येही झाल्याने, कॉर्नफ्लेक्स पण पॉप्युलर कोल्ड सीरिअल आहे.
तिसरा कोर्स आहे अंडी – जी ‘फ्राइड’, ‘स्क्रॅम्बल्ड’, किंवा ‘पोच्ड’ खाल्ली जातात. फ्राइड एग्ससोबत बेक्ड बीन्स, ग्रिल्ड टोमेटो आणि बेकन किंवा सॉसेजेस सव्र्ह करतात. उकडलेली असल्यास ती ‘सॉफ्ट बॉइल्ड’ असतात – म्हणजे आतलं बलक पातळच असतं. ही अंडी ‘एग कप’मध्ये सव्र्ह केली जातात आणि वरचा भाग चमच्याने फोडून खाल्ली जातात. याच्याबरोबर खायच्या टोस्टचे लांब तुकडे केले जातात, जे फोडलेल्या अंडय़ाच्या बलकात बुडवून खाल्ले जातात. गम्मत म्हणून या तुकडय़ांना ‘टोस्ट सोल्जर्स’ही म्हणतात!
चौथ्या कोर्समध्ये मासे असतात. ‘किप्पर्स’ नामक एक पदार्थ जो स्मोक्ड हेिरग माशापासून बनवतात. ‘केजरी’ (kedgeree) हा पदार्थ भात, मासे आणि मसाल्याची खिचडी असून त्याचा जन्म ब्रिटिशांच्या भारतीय वास्तव्यात कधी तरी झाला असा समज आहे! लिवर आणि किडनीसारखे मीट्सपण इंग्लिश ब्रेकफस्टचा भाग आहेत.
सर्वात शेवटी टोस्ट आणि मार्मलेड – म्हणजे चक्क संत्र्याचा जॅम. सीट्रस फळांच्यी जॅमला मार्मलेड म्हणतात आणि त्यांच्यातलं सर्वात फेमस आहे ऑरेंज मार्मलेड. कडवट संत्र्यांपासून बनविलेलं कडू-गोड मार्मलेड अतिशय चविष्ट असतं.
या नाश्त्याबरोबरच पेय म्हणजे अर्थातच चहा! उत्तम दर्जाच्या चहाच्या व्हरायटीझ पिणं ही इंग्रजांची खासियतच आहे. आपण पण तर त्यांच्याचमुळे चहा प्यायला लागलो. पण फरक इतकाच की आपल्याकडे तो ‘कडक’ पितात आणि ते थोडा हलका पितात. ‘कटिंग’ हा शब्द जरी इंग्रजी असला तरी त्यांना तो चहाच्या संदर्भात तर नक्कीच माहीत नसणार!