आमंत्रण पत्रिकेच्या खालच्या एका कोपऱ्यात R.S.V.P असं लिहिलेलं आढळतं. त्या खाली एक नाव आणि टेलिफोन नंबर अथवा ई -मेल आय.डी. दिला असतो. R.S.V.P चा फुलफॉर्म आहे  Répondez s’il vous plaît
या फ्रेंच वाक्याचा अर्थ आहे ‘कृपया उत्तर देणे’. म्हणजे आमंत्रण मिळाल्यावर २-३ दिवसांत आपण त्या समारंभाला उपस्थित राहणार का नाही हे त्या व्यक्तीला त्या नंबर अथवा ई-मेल आयडीवर कळविणे आवश्यक आहे. तसं केलं नाही तर ते उद्धटपणाचं लक्षण मानलं जाऊ शकतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीयांसाठी इथे सर्वात मोठा सांस्कृतिक फरक जाणवतो. आपल्याकडे आमंत्रण पत्र आलं की, त्या समारंभाला हजेरी लावायची की नाही हे आपण सहसा कळवत नाही. जोपर्यंत पाहुण्यांकडून ‘येता येणार नाही’ हे सांगितलं जात नाही, तोपर्यंत जेवढय़ांना आमंत्रण दिले आहे त्यातले ९५ टक्के तरी येतील असं यजमान गृहीत धरून चालतात. बुफे पद्धतीचं भोजन असल्यास थोडं अ‍ॅडजस्टही करता येतं. पण जेव्हा खूप पाहुणे या गोष्टीची दाखल घेत नाहीत आणि समारंभाला जात नाहीत, तेव्हा यजमानांचा अंदाज चुकून भरमसाट जेवण उरतं आणि वाया जातं. याशिवाय हमी दिलेल्या पाहुण्यांच्या आकडेवारीला धरूनच बिल भरावं लागतं. यात सर्वच बाजूंनी नुकसान होतं.

आमंत्रणाचं उत्तर दिलं की, ते सर्वासाठी सोपं जातं. फॉर्मल सिट-डाऊन सव्‍‌र्हिसमध्ये बुफे नसल्याने, प्रत्येक व्यक्तीला जेवताना बसायला जागा असते. त्यामुळे टेबल सेटिंग आणि आसनांची व्यवस्था नीट करता येते. ‘अरे वाह! बडय़ा हॉटेलात पार्टी आहे, तू पण चल’, असं जे आपल्याकडच्या समारंभात चालून जातं, तसं इथे करता येत नाही. इथे फक्त आमंत्रित आकडय़ांसाठीच जेवण बनवलं जातं आणि तेवढय़ाच लोकांची बसण्याची सोय केली जाते. जेवणाला सेटमेन्यू असल्याने भरमसाट अन्न वाया जायची शक्यता कमी असते. स्वत: आमंत्रित असून आयत्या वेळेला स्वत:चे पाहुणे नेऊन यजमानीणबाईंची पंचाईत करणं शिष्टाचारात बसत नाही. यालाच धरून आमंत्रिताने हे भान ठेवलं पाहिजे की, आधी जर नकार कळवला असेल तर समारंभाला आयत्या वेळी, यजमानीणबाईंना न कळवता जाऊ नये. आधी नकार आल्याने त्यांच्या आसनाची सोय आयत्या क्षणाला करणं कठीण होऊ शकतं.

भारतात R.S.V.P मध्ये व्हेज आणि नॉन-व्हेजचं ऑप्शन दिले जातं. ते निवडून मगच उत्तर पाठवावं. तसं न केल्यास आपल्या निवडीचं जेवण मिळण्याची हमी राहात नाही. बरेचदा, सव्‍‌र्हिसच्या सुलभतेसाठी आणि काहींच्या संवेदनक्षमता (sensibilities) दुखवू नयेत म्हणून, शाकाहारींना आणि मांसाहारींना वेगवेगळ्या टेबल्सवर बसवलं जातं. खाण्याच्या बाबतीत काही पथ्य असतील तर ते R.S.V.P.  मध्ये जरूर कळवावं. Regrets only म्हणजे आपण जाणार नसू तरच कळवणं गरजेचं असतं.

मराठीतील सर्व फाइन डाइन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Invitation card rsvp