लक्झरी फूड्स उच्चभ्रूंच्या फाइन डाइन इव्हेंट्समध्ये आवर्जून समाविष्ट केली जातात. दुर्मीळ किंवा उत्पादन करायला किचकट आणि म्हणून महागडे असे काही खाद्यपदार्थ लक्झरी फूड म्हणून ओळखले जातात. त्यापैकीच एक स्मोक्ड सामनविषयी..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लक्झरी म्हणजे विलासी.. एक प्रकारचं सहजासहजी न मिळणारं ऐश्वर्य. सगळ्यांनाच ते मिळालं असतं तर त्यात लक्झरीयस असं काय राहिलं असतं? खाण्याच्या बाबतीतही असंच आहे. एखादी खायची गोष्ट जी दुर्मीळ असल्यामुळे मोजक्या लोकांनाच मिळते आणि मिळाली तरी प्रचंड महाग असते. काही गोष्टींची लागवड करून उत्पादन करता येतं, पण ते करणंही किचकट काम असतं. उदाहरणार्थ केशर. हजारो ‘क्रोकस’ फुलाचे पराग असलेलं केशर! काहींचं तर उत्पादन करताच येत नाही. निसर्ग देईल तवेढंच मिळतं आणि म्हणून ते महागही असतं. अशाच काही लक्झरी खाद्यपदार्थाची माहिती..

स्मोक्ड  सामन

मिळायला दुर्मीळ असा, अत्यंत चविष्ट असा हा मासा पाश्चात्त्य देशांमधल्या उच्चभ्रू मेजवान्यांमध्ये सव्‍‌र्ह केला जातो. अटलांटिक आणि प्रशांत महासागरात मिळणाऱ्या या माशाचं आता ‘फार्मिग’देखील केलं जातं. पण ‘वाइल्ड’, म्हणजे मुक्त समुद्रात पोहणाऱ्या माशाची चव वेगळी असते. सामन मासे नदीच्या पाण्यात जन्म घेतात आणि मोठे होताना महासागरात स्थलांतर करतात. महासागरात विहार केल्यानंतर अंडी घालायला आपल्या जन्मस्थळी सगळे सामन मासे परत येतात! माशाची चव अर्थातच गोडय़ा पाण्यातून खाऱ्या पाण्यात जाताना थोडी बदलते. सागरी सामन मासे अतिमासेमारीमुळे आता दुर्मीळ होत चालले आहेत. पूर्वी मुबलक मासे मिळाल्यावर ते टिकावेत म्हणून ‘स्मोकिंग’ ही एक पद्धत निवडली जायची. पाककलेत ‘स्मोकिंग’ म्हणजे ‘धूर’ देणे आणि हे करण्यातही कौशल्य लागतं. थोडक्यात सांगायचं तर हा प्रकार काहीसा असा आहे. सामनचा फिले (बिनकाटय़ाचा उभा तुकडा) समुद्री मीठ लावून काही तास ठेवला जातो. मिठामुळे त्यातलं सर्व पाणी निघून येतं आणि फिले थोडा कोरडा होतो. नंतर तो फिले आकडय़ात अडकवून स्मोकिंग चेंबरमध्ये उंच टांगला जातो. स्मोकिंग चेंबर म्हणजे एक मोठी उंच छताची खोली, ज्यात दुसऱ्या खोलीत असलेल्या जाळातला धूर सोडला जातो. कोणत्या झाडाचं लाकूड वापरून धूर दिला जातो यालाही खूप महत्त्व आहे आणि तसं मेन्यूमध्येही लिहिलं जातं. जाळाची आंच न लागल्याने मासा शिजत नाही आणि धुरातल्या अँटी बॅक्टेरियल गुणांमुळे कच्चा राहिला तरी खराब होत नाही. अर्थात, स्मोक्ड सामन नेहमी थंड तापमानात ठेवावा लागतो. सव्‍‌र्ह करताना फिलेच्या पातळ चकत्या केल्या जातात, ज्या अगदी मऊ, तलम, लुसलुशीत असतात. या चकत्यांवर लिंबू पिळून खातात. स्कॉटलंड, नॉर्वे, कॅनडा या देशांना लागून असलेल्या समुद्रातले सामन प्रसिद्ध आहेत आणि प्रत्येकाची आपली अशी एक विशिष्ट चव आहे.

डिझाइन : संदेश पाटील

मराठीतील सर्व फाइन डाइन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Luxury foods