आत्तापर्यंतच्या सदरांमध्ये आपण पाश्चात्त्य पद्धतीच्या भोजन सेवनास लागणाऱ्या सामग्रीविषयी माहिती घेतली. आता पाहू या ही सगळी सामग्री टेबलवर कशी मांडली जाते. मेन्यू कोणत्याही प्रकारचा असला तरी टेबलवर काही गोष्टींची जागा ठरलेली असते. मध्यभागी सेंटरपीस असतो. सेंटरपीस म्हणजे एखादी छोटीशी सुंदर पुष्परचना किंवा काचेच्या बोलमध्ये तरंगणारी फुलं किंवा फुलाच्या पाकळ्या आणि बरेचदा डिनरसाठी शोभिवंत मेणबत्ती ही! त्याच्या बाजूला क्रुएट सेट असतो. दुसरी वस्तू म्हणजे ग्लास – पाणी प्यायचा ग्लास जेवणाऱ्याच्या उजव्या बाजूला असतो. याची नोंद घ्यावी लागते. कारण भारतीय पद्धतीत तो डाव्या बाजूला असतो. तिसरी वस्तू, साईड प्लेट किंवा ब्रेड-बटर प्लेट. यावर एक छोटी सुरी (बटर नाइफ) उभी किंवा आडवी ठेवली जाते.
‘आ ला कार्ट’ मेन्यूसाठी साधारणत: एक काटा (डावीकडे) आणि एक चमचा (बहुधा सूप स्पून) आणि सुरी (उजवीकडे) असतात. बाकीच्या कटलरीची मांडणी आपण जे काही ऑर्डर करू त्यानंतर केली जाते. ‘ताब्ल दोत’ किंवा ‘सेट’ /‘फिक्स्ड प्राइस्ड’ मेन्यू असल्यास जेवढे कोर्सेस असतील तेवढय़ा सर्व कटलरीची मांडणी आधीच केली असते. ही मांडणी करताना कोर्सेसचा क्रम लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे सर्वात पहिला कोर्स खायला लागणारी कटलरी बाहेरच्या बाजूला मांडली जाते, दुसऱ्या कोर्सची कटलरी पहिल्या कोर्सच्या कटलरीच्या आतल्या बाजूला मांडली जाते. हा सर्व क्रम ‘आउट साईड टू इनसाईड’ असतो आणि त्याच्या मागचं कारणही अगदी लॉजिकल आहे. आतल्या कटलरीच्या मांडणीला धक्का न देता एकामागून एक कोर्सेस खाता आले पाहिजेत. टेबलवर काटा-सुऱ्यांचा ताफा बघून जर कोणता काटा आणि सुरी निवडावी असा प्रश्न पडला तर ‘आउट साईड टू इनसाईड’ लक्षात ठेवावे!
ग्लासेसची मांडणी सुऱ्यांच्या वरच्या बाजूला केली जाते. जी वाइन पहिली सव्र्ह होते, तिचा ग्लास सर्वात बाहेरच्या बाजूला असतो. त्यानंतर सव्र्ह होणाऱ्या वाइनचा ग्लास त्याच्या आतल्या बाजूला. पाण्याचा ग्लास सर्वात आतल्या सुरीच्या टोकाला ठेवला जातो. सर्वात आतल्या बाजूच्या कटलरीमध्ये कमीतकमी चौदा इंचाचं अंतर असतं. सेटिंग करताना आणि काही सव्र्ह व्हायच्या आधी, यात नॅपकीन फोल्ड ठेवली जाते. वरच्या बाजूला डेझर्ट कटलरी आडवी ठेवली जाते.