पुण्याच्या कॉलेजविश्वात महत्त्वाच्या ठरलेल्या फिरोदिया करंडक स्पर्धेची अंतिम फेरी उद्यापासून (१ मार्च) सुरू होणार आहे. हरहुन्नरी कलाकार फुलवणाऱ्या या वेगळ्या स्पर्धेविषयी..
‘पुण्यातल्या नाटय़स्पर्धा म्हटल्यावर डोळ्यासमोर काय उभं राहतं?’ अर्थातच पुरुषोत्तम-फिरोदिया! कुणीही पुण्यात शिकलेली व्यक्ती हेच उत्तर देईल. इतकं काय असतं त्या फिरोदिया करंडकात? सध्या पुण्याच्या कुठल्याही कॉलेजमधल्या आर्ट सर्कलला भेट दिली तर लक्षात येईल. फेब्रुवारी महिना लागतो तसा ‘फिरोदिया फीवर’ कॉलेजमधून दिसायला लागतो. ज्यांना या स्पर्धाविषयी माहिती नाही, त्यांच्यासाठी – फिरोदिया म्हणजे एक वेगळाच ग्रह. आणि ते करणारी माणसं वेगळ्या ग्रहावरची!
फिरोदिया आणि पुरुषोत्तम करंडक म्हणजे प्रत्येक कॉलेजला आपल्या शिरपेचात हवे असणारे मानाचे तुरे!! नाटकासोबातच अनेक नावीन्यपूर्ण व वेगवेगळ्या अॅक्टिव्हिटीज एका धाग्यात गुंफून सादर करणं हे फिरोदियाचं वेगळेपण! भाग घेणाऱ्या प्रत्येकासाठी ‘वन्स इन लाइफटाइम’ एक्सपिरिअन्स असणारा, यंगिस्तानातल्या नाटकवेडय़ांची जान असणारा, वेगवेगळे विषय-उत्तम लेखन आणि दिग्दर्शनाने नटलेला फिरोदिया करंडक म्हणजे अस्सल ‘मेड इन पुणे’ रेसिपी बरं का.!! खरं तर प्रत्येक कॉलेजची फिरोदियासाठी नाटक साकारायची प्रोसेस निराळीच, पण समान धागा सापडतो तो ‘बेस’च्या तयारीत! ‘फिरोदिया फॉरमॅट’मध्ये बसणारं नाटक शोधणं हीदेखील तारेवरची कसरतच असते. कथेची निवड करतानाही वेगवेगळ्या अॅक्टिव्हिटीजना असणारा वाव लक्षात घ्यावा लागतो, संहितेसाठी निरनिराळी पुस्तकं चाळली जातात व सर्वानुमते स्क्रिप्ट फायनल होतं आणि मग सुरू होतो त्या नाटकाचा टेक्निकल प्रवास.!!
‘उत्तमतेचा ध्यास आम्हाला’ म्हणत हटके काहीतरी करण्यातली मजा हळूहळू उलगडायला लागते. एस. पी. कॉलेजच्या अंकिताच्या मते, ‘फिरोदियाचा यूएसपी म्हणजे त्यातल्या अॅक्टिव्हिटीज! पण या अॅक्टिव्हिटीज करताना त्यांच्या बजेटचाही विचार करायला लागतो आणि यामध्ये आमचं कॉलेज आम्हाला पूर्ण सपोर्ट करत.’
‘फिरोदिया करंडकावर असणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वर्चस्वामागे त्यांच्याकडे असणारा टेक्नॉलॉजिकल सपोर्ट व मिळणाऱ्या बजेटचाही मोठा हातभार असतो. उपलब्ध बजेटमध्ये, उत्तमातली उत्तम कलाकृती साकारणं हे खरं तर टीमचं यश!’ असं फग्र्युसनच्या निखिलचं म्हणणं आहे. उपलब्ध बजेट, कॉलेजचा सपोर्ट, पॅ्रक्टिसला मिळणारी जागा आणि ‘लोगों की खोज’ या सगळ्यांपलीकडे जाऊन खरं तर महत्त्वाची असते ती.. क्रिएटिव्हिटी!!
फिरोदियाच्या टीम मेंबर्सची संख्या मर्यादित असली तरी त्यांच्यातला प्रत्येक जण स्वत:ला ‘मल्टिटास्कर’ बनवतो. इथे येण्यापूर्वी सगळ्यांना सगळ्याच गोष्टी एकावेळी करता येत नसतात.
पण मग त्या जमाव्यात म्हणून एस.पी.सारखी कॉलेजेस करंडकाची तयारी बरीच आधी सुरू करतात. तर काही कॉलेजेस हवे तसे कलाकार मिळवण्यासाठी ऑडिशन्सचा मार्ग स्वीकारतात.
टीममधला प्रत्येक जण हा आपापल्या क्षेत्रात काहीतरी वेगळा करणारा असतो, परंतु टीममध्ये मात्र सगळ्यांमधला एक होऊन वावरतो.
प्रॅक्टिसमध्ये येणाऱ्या अडचणी आणि होणारे मतभेद क्षणात बाजूला सारले जातात, कारण या साऱ्या नाटकवेडय़ांना केवळ ‘फिरोदिया’च्या दिशेने घोडदौड करायची असते.
‘फिरोदिया’ करताना प्रत्येक जण एक माणूस म्हणूनही घडत असतो, स्वत:तल्या ‘क्रिटिक सेन्स’ जागा करून आपापल्या परफॉर्मन्सला जोखत असतो. या ग्रहावरच्या माणसांप्रमाणेच कॉलेजचे रिहर्सल हॉल, नाटकातल्या प्रॉपर्टीज, कॉलेज कॅन्टीन या निर्जीव वस्तूदेखील ‘फिरोदियामय’ होऊन जातात. करंडकाची तारीख जाहीर झाल्यानंतर उत्तररात्री रंगणाऱ्या नाटकाच्या तालमी आयुष्य भारून टाकतात. दिवसरात्र तालीम करून कंटाळा आला की, ही मंडळी निघतात भटकायला.. काही टीम्स तर रिफ्रेशमेंट ब्रेक म्हणून चक्क हॉलमध्ये वेडय़ासारखी नाचतात व ब्रेक संपताच तेवढय़ाच तत्परतेने व जबाबदारीने पुन्हा कामही सुरू करतात. इतका सगळा वेळ कॉलेजमध्ये घालवल्यावर कॉलेजविषयीचं प्रेम वाढलं नाही तरच नवल! आणि मग सुरू होते आपल्या कॉलेजकडे करंडक खेचण्याची स्पर्धा.!!
फिरोदियाची टीम, वेगवेगळे प्रयोग, आपल्या कॉलेजची स्क्रिप्ट, अशा एक ना अनेक कारणांनी फिरोदियाचं वारं कॉलेजभर वाहात असतं. आपलं कॉलेज पुढे चाललंय या आनंदातच काही जण समाधान मानतात, तर काहींच्या मनात असतं ‘आपण टीममध्ये नाही आहोत’ हे बोचरं शल्य!! जितकी चर्चा नाटय़स्पध्रेची होती तितकीच किंबहुना त्याहून अधिक होते ती कॉलेजमध्ये केल्या जाणाऱ्या राजकारणाची.!!
कधीतरी ही सगळी धडपड-धावपळ संपते, करंडक संपतो आणि आता पुढे काय, हा प्रश्न आ वासून उभा राहतो. त्या वेळेला आठवतं ते फिरोदिया नावाच्या जादूगाराने दिलेलं ‘लाइफटाइम फीिलग’. आव्वाज फक्त आमचाच. करंडक फक्त आमचाच अशा जल्लोषात आपल्या कॉलेजसाठी फिरोदिया करंडक आणावा असा प्रत्येक कॉलेजचं ‘अल्टिमेट गोल’ असतं. अखेरीस करंडक येतो तो एकाच कुठल्यातरी कॉलेजच्या वाटय़ाला, पण म्हणून बाकी टीम्स नाउमेद नाही होत, कारण सगळ्यांनीच या प्रोसेसमधून काहीतरी कमावलेलं असतं. शेवटी फिरोदिया करंडक हा एक प्रयत्न आहे आपली क्षितिजं विस्तारण्याचा आणि आपल्यातल्या कलाकाराला फुलवण्याचा.!!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा