विनोद चन्ना अनेक बॉलिवूड स्टार्सचे पर्सनल फिटनेस ट्रेनर आहेत. त्यांच्या क्लाएंट लिस्टमध्ये फिटनेससाठी प्रसिद्ध असलेला जॉन अब्राहमचं नाव आहे. याशिवाय शिल्पा शेट्टी, जेनेलिया डिसुझा याबरोबरच अनेक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व त्यांच्याकडे फिटनेसचा सल्ला घ्यायला येतात. फिटनेस फ्रीक युथसाठी त्यांचं हे नवं सदर आजपासून.
नवीन वर्षांपासून अनेक जणांनी नियमित व्यायाम करण्याचा संकल्प केला असेल. काही जणांनी त्यासाठी जीमसुद्धा जॉइन केली असेल. जीममध्ये प्रथमच जाणाऱ्यांना तिथली विविध मशिन्स, इक्विपमेंट्स पाहून नेहमी प्रश्न पडतो की सुरुवात कुठून करावी. बऱ्याच दिवसांनी जीममध्ये जाणाऱ्यांसाठीदेखील हा प्रश्न पडतो. फर्स्ट टाइम जीमर्ससाठीचं हे गाइड.
जीममध्ये वेगवेगळ्या प्रकारची वर्क आऊट्स केली जातात. आपला उद्देश काय यानुसार वर्क आऊट बदलतं. वर्क आऊटचे काही प्रमुख प्रकार –
१. वेट ट्रेनिंग – वेगवेगळी वजनं वापरून व्यायाम. मसल गेन करण्यासाठी याचा वापर होतो. वजन वाढवणं, बॉडी शेपमध्ये आणणं, शरीर कमावणं, बॉडी बिल्डिंग, मसल टोनिंग यासाठी वेट ट्रेनिंग असतं. मसल गेनमुळे आपल्या शरीराला शेप मिळतो, ताकद वाढते आणि टोनिंग होतं.
२. कार्डिओ वर्कआऊट – जॉगिंग, सायकलिंग, पोहणे, चालणे या सगळ्यांचा यामध्ये समावेश असतो. जीममध्ये ट्रेडमिल, सायकल अशा मशीनद्वारे कार्डिओची सुरुवात करता येते. यामध्ये वेगवेगळे डान्स टाइप्स, एरोबिक्स यांचाही समावेश असतो.
३. क्रॉस फिट ट्रेनिंग – हा प्रकार फोर्सफूल आणि फास्ट हालचालींचा असतो. वेगवेगळ्या मशीनद्वारे क्रॉस फिट ट्रेनिंग घेता येतं.
४. मिक्स्ड मार्शल आर्ट ट्रेनिंग – ताकद, चापल्य आणि  मजबुतीसाठी हे प्रकार शिकले जातात. यातून सेल्फ डिफेन्सचाही उद्देश साध्य होतो.
५. योगा – मानसिक स्वास्थ्य, लवचिकता हे उद्देश योगातून साध्य होतात. अंतर्गत आणि बाह्य़ शरीर व्यवस्था फिट ठेवण्यासाठी योगाचा उपयोग होतो.
फिटनेसची संकल्पनाच आरोग्यात आहे. कुणालाही फिट बनायचं असेल तर त्याच्यात ताकद हवी, स्टॅमिना हवा आणि लवचिकता हवी. पण फिटनेस बऱ्याच वेळा तुमच्या लाइफस्टाइलवरसुद्धा अवलंबून असतो. तुमचं दैनंदिन आयुष्य आरोग्यदायी जीवनशैलीला पूरक आहे का, यावर बरंच काही अवलंबून असतं. कॉलेजची किंवा शाळेची मुलं सतत अ‍ॅक्टिव्ह असतात. चालत असतात, पळत असतात, खेळत असतात आणि त्यांचं वयसुद्धा कमी असतं त्यामुळे त्यांच्यात स्ट्रेंथ आणि स्टॅमिना असणं स्वाभाविक आहे.
आयटी क्षेत्रात किंवा कुठल्याही बैठं काम असणाऱ्या इतर क्षेत्रात काम करणारी मंडळी १० ते १२ तास एका ठिकाणी बसून काम करतात. त्यांच्या आयुष्यात त्यांनी फिटनेससाठी वेगळे प्रयत्न केले नाहीत तर स्ट्रेंथ आणि फिटनेससाठी कामात रुटीन असं काहीच नसतं. त्यामुळे या क्षेत्रातल्या व्यायाम न करणाऱ्या मंडळींमध्ये स्ट्रेंथ आणि स्टॅमिना कमी आढळतो. त्यांच्या खाण्या- पिण्याच्या सवयीही वेगळ्या असतात. वेळेवर जेवण- खाणं होतंच असं नाही. बऱ्याच वेळा सहज उपलब्ध असणाऱ्या जंक फूडवर ते दिवस काढतात. त्यामुळे वजन वाढण्याची समस्या या लोकांमध्ये आढळते.
फिटनेस रुटीन
अशा बैठं काम असणाऱ्या लोकांनी वर्क आऊटला सुरुवात करताना वेट ट्रेनिंगला थेट सुरुवात करू नये. हळूहळू ते सुरू करावं. अशा लोकांसाठी वेट ट्रेनिंग – आठवडय़ातून २ ते ३ वेळाच त्यांनी वेट ट्रेनिंग करावं. दोन दिवस कार्डिओ आणि एक दिवस योगा. आपला स्टॅमिना वाढवूनसुद्धा स्ट्रेंथ वाढवता येते. त्यासाठी कार्डिओ वर्कआऊट आवश्य आहे. त्याबरोबर शरीरिक चापल्य वाढवण्यासाठी फंक्शनल ट्रेनिंग, क्रॉस फिट ट्रेनिंग किंवा मिक्स्ड मार्शल आर्ट ट्रेनिंगचाही विचार करता येईल.
लक्षात ठेवा – तुमचा वर्क- आऊट प्लॅन अशा हवा की फिटनेसची सगळी उद्दिष्ट साध्य होतील. स्ट्रेंथ, स्टॅमिना, लवचिकता आणि चापल्य हे सगळंच वाढवण्यासाठी रेग्युलर वर्कआऊटला पर्याय नाही.

Story img Loader