प्रियंका वाघुले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अगदी शालेय जीवनापासून चित्रपट, मालिकांमधून घराघरांत पोहचलेला स्वप्निल जोशी हा कित्येक चित्रपटांमधून तरुण-तरुणींना भुरळ घालत आला आहे. पण ही भुरळ त्याच्या फिट लुकमुळे पडलेली नाही. तर त्याच्या गोड, प्रेमळ स्वभावाच्या व्यक्तिरेखांमुळे पडते हे त्यालाही पक्के माहिती आहे. मात्र असे असले तरी फिटनेसचे महत्त्व आपल्याला माहिती आहे आणि तो राखणे कोणत्याही कलाकाराला आवश्यकच असते, असं तो म्हणतो.

स्वप्निल जोशी हे नाव ऐकलं की अनेक मराठी चित्रपटांमधला प्रेमळ हिरो आठवतो. सध्या हा हिरो आपल्या फिटनेसच्या बाबतीत अतिशय मेहनत घेताना दिसतो आहे. मुळात सिक्स पॅक नसलेला आणि त्याची कधी आवडही नसलेला स्वप्निल फिटनेस म्हणजे सिक्स पॅक असणं, बारीक असणं हा गैरसमज असल्याचे म्हणतो. एखादी व्यक्ती बारीक आहे म्हणजे ती फिट हा लोकांचा गैरसमज आहे असं तो म्हणतो. आणि तो दूर होणे त्याला गरजेचे वाटते. कारण या समजामुळे लोक उगीच चुकीच्या किंवा अनावश्यक गोष्टींना बळी पडतात, असे त्याने सांगितले.

स्वत:च्या बाबतीत सिक्स पॅकची कधीही आवड नसलेला स्वप्निल सध्या मात्र जाणीवपूर्वक फिट राहण्यासाठी मेहनत घेत असल्याचे सांगतो. विविध भूमिकांसाठी वेळेनुसार वाढवलेले वजन पुन्हा कमी करण्याचे वेळेअभावी आपल्याकडून राहून जाते. आणि अचानक आपल्याला हळूहळू आपण फिट नसल्याची जाणीव होऊ  लागते. त्यामुळे वेळोवेळी आपण या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. माझीही हीच चूक झाली होती. आता मात्र आपल्या फिटनेसवरच लक्ष केंद्रित केले असल्याचे त्याने सांगितले.

आपल्या दोन्ही मुलांशी त्यांना हवा तसा त्यांचा बाबा वागू शकला, नाचू शकला. त्यातून मुलांना आणि स्वत:ला आनंद मिळणं, हा त्याच्यासाठी फिटनेसचा खरा अर्थ आहे, असे स्वप्निल सांगतो. त्यासाठी सध्या अशाच ‘मी पण सचिन’ चित्रपटामधील एका नवीन भूमिकेच्या निमित्ताने स्वप्निलने आपला फिटनेस वर्कआऊट आणखी वाढवला आहे. सतत तीन महिने फोकस राहून त्याने आपल्या कोचच्या मदतीने ते सांगतील त्यानुसार आहारावर आणि व्यायामावर लक्ष दिले आहे.

दिवसातील काही तास नियमितपणे जिममध्ये वर्कआऊट करताना त्यात कार्डिओ, फुल बॉडी असा वेगवेगळा व्यायाम प्रकार समाविष्ट असतो. आणि एकाच व्यायाम प्रकारावर फोकस न करता पूर्ण शरीरासाठी आवश्यक असलेले वेगवेगळे प्रकारचे व्यायाम करून शरीराला कार्यरत ठेवल्याचे तो सांगतो. सकाळी लवकर उठून व्यायाम करून थोडा आराम केल्यानंतर दुपारी पुन्हा तो क्रिकेट खेळण्यावर भर देतो. अशा प्रकारे व्यायाम करत असताना आपल्याला शिकवणारा कोच ही आपली खरी ताकद असते. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण मेहनत घायला हवी, असे तो म्हणतो.

इतरांप्रमाणे फिटनेसला वेळोवेळी महत्त्व दिले नसले तरी जेव्हा आपल्याला ही गोष्ट लक्षात येते तेव्हा मात्र आपण त्या गोष्टीकडे मनापासून लक्ष द्यायला हवे, असे स्वप्निल आवर्जून सांगतो.

viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fit actor article on swapnil joshi