प्रश्न : माझं वय २२ आहे. उंची ५ फूट ६ इंच आहे आणि वजन ६८ किलो आहे. लोकसत्ता ‘व्हिवा’मधल्या तुमच्या एका लेखात लिहिल्याप्रमाणे मी ओव्हरवेटही नाही आणि ओबेजही नाही. पण माझा प्रॉब्लेम वेगळाच आहे! माझ्या जन्मापासूनच माझ्या शरीराचा आकार थोडासा धिप्पाड किंवा थोराड म्हणता येईल असा आहे. म्हणजे उपमाच द्यायची तर बिपाशा बसूसारखा माझा बॉडीशेप दांडगा आहे. आणि त्याउलट, प्रियांका चोप्रासारखं सडपातळ किंवा शिडशिडीत दिसावं असं मला मनापासून वाटतं आणित्यासाठी मी खूप प्रयत्नही केले. पण माझा थोराडपणा कमी होत नाही. तुम्ही काही उपाय सांगाल का?
– साधना थत्ते, पनवेल.
उत्तर : तुम्ही खूप चांगला विषय सुचवलात! अगदी स्पष्ट सांगू, प्रियांका चोप्रासारखं शिडशिडीत आणि सडपातळ होणं तुम्हाला खरोखरंच कठीण आहे. याचं मूळ कारण म्हणजे तुमच्या शरीराची ठेवण टिपिकल ‘मेसोमॉर्फिक’ गटातली आहे, तर प्रियांका चोप्रा ‘एक्टोमॉर्फिक’ गटातली आहे. पण निराश होऊ नका, कारण तुमची ठेवण निसर्गानं ठरवलेली आहे, त्यात तुमचा काहीच दोष नाही.
आपली फिगर एखाद्या नटीसारखी कमनीय आणि आकर्षक असावी अशी स्वाभाविक इच्छा कुणाचीही असू शकेल आणि त्यात वावगं काहीच नाही. परंतु आपलं उद्दिष्ट ठरविताना निसर्गानं आपल्या शरीराला कुठल्या प्रकारची मूळ ठेवण दिली आहे हे जाणून घेणं आणि त्या मर्यादेबाहेर न जाता आपल्या आदर्श ठरविणं महत्त्वाचं आहे. निसर्ग आपल्या शरीराची ठेवण आणि आकार जन्मत:च ठरवतो. त्यामध्ये आनुवंशिकतेचाही मोठा सहभाग असतो. त्यामुळे कितीही प्रयत्न केले, कुठल्याही प्रकारचे व्यायाम केले तरी सहसा आपल्या मूळ ठेवणीत बदल करता येत नाही.
शास्त्रज्ञांनी मानवी शरीराची ठेवण, आकार आणि शारीरिक गुणधर्म यावर आधारित ढोबळ मानानं एकूण तीन गट केलेत. ढोबळ मानानं अशासाठी की काही व्यक्तिगत अपवाद वगळता बहुतेकजण खालील तीन गटांत येतात. तसंच खालीलपैकी कोणत्याही गटात येणाऱ्या व्यक्तीमध्ये त्या गटातील गुणधर्म कमीअधिक प्रमाणात असू शकतात. तुमच्या वर्णनावरून तुम्ही मेसोमॉर्फिक गटातल्या वाटता; त्यामुळे तुमच्या गटाच्या गुणधर्माच्या मर्यादा न ओलांडता तुम्ही तुमचे उद्दिष्ट ठरविलं पाहिजे.
एक्टोमॉर्फिक गट- या प्रकारच्या व्यक्ती बव्हंशी उंच आणि सडपातळ असतात. त्यांच्या पेल्व्हिस बोनची रुंदी नॉर्मली खांद्यापेक्षा जास्त असते. यांचे सांधे खूप लवचिक असतात, मात्र स्नायू खूप विकसित नसतात.
यांना कमी रक्तदाबाचा विकार असण्याची शक्यता जास्त असते. विश्रांती काळातला त्यांचा पल्स रेट नेहमीपेक्षा थोडा अधिक असतो. त्यांच्या शरीरात रक्ताभिसरण थोडं हळू होतं आणि त्यामुळे अशा व्यक्ती लवकर दमतात. यांचे तळपाय आणि तळहात बऱ्याचदा थंड असतात. पटकन उठून उभे राहिलं तर यांना चक्कर आल्याचा भास होतो. अशा व्यक्ती सहसा स्थूल नसतात. मेसोमॉर्फिक गट- यांचं शरीर जन्मत:च मजबूत आणि राकट असतं. यांचे खांदे पेल्व्हिस बोनपेक्षा रुंद असतात. स्नायू बळकट असतात आणि रक्ताभिसरण उच्च दर्जाचं असतं. यांचा कमाल रक्तदाब आणि पल्स रेट इतरांपेक्षा कमी असतो. पण त्याचबरोबर विश्रांती काळातला त्यांचा पल्स रेटसुद्धा नेहमीपेक्षा थोडा जास्त असतो. यांना सहसा पचनाचे विकार किंवा सर्दी खोकल्याचा त्रास होत नाही. अशा व्यक्ती शरीराच्या मध्यभागात स्थूल होण्याचा संभव अधिक असतो.
एण्डोमॉर्फिक गट- या व्यक्तींच्या शरीरांत सर्वागावर फॅट साठविण्याची प्रवृत्ती जन्मत:च आढळते. यांच्या शरीराला एक प्रकारचा गोलाकार आकार असतो. खांदे आणि पेल्व्हिस बोनची रुंदी सहसा एकसारखी असते. यांचं वजन शरीराच्या अप्पर बॉडी आणि लोअर बॉडीमध्ये समान विभागलेलं असतं. वरील दोन्ही प्रकारच्या व्यक्तींपेक्षा यांची शारीरिक कष्टांची क्षमता कमी असते. यांची पचनक्रिया मंद असल्याने शरीरात सहजपणे फॅट साठत जाते.
काही अपवाद वगळता जगातल्या बहुतेक व्यक्ती या तीन गटांपैकी एकामध्ये येतात. या तिन्ही गटांमधले आकार आणि वैशिष्टय़े ही जन्मत:च मिळतात आणि नंतर वाढणाऱ्या जाडीशी या गटांचा विशेष संबंध नसतो. जाडी वाढण्यावरून अजून एक माहिती सांगते.
‘हार्मोनल इम्बॅलन्स’ हा शब्द तुम्ही बऱ्याचदा ऐकला असेल. हार्मोन्सच्या इम्बॅलन्समुळे शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी जाडी कमीजास्त प्रमाणात वाढते असं सिद्ध झालंय. शास्त्रज्ञांनी या संशोधनावरून जाडी वाढण्याचे चार प्रकार शोधून काढले. ‘ओव्हरी बॉडी टाइप’, ‘अॅड्रिनल बॉडी टाइप’, ‘थायरॉईड बॉडी टाइप’, ‘लिव्हर बॉडी टाइप’ या चार गटांबद्दल अधिक माहिती पाहू, पुन्हा केव्हातरी!
ही दीपावली तुम्हा सगळ्यांना आनंदाची, सुखस माधानाची आणि भरभराटीची जावो!
स्टे-फिट- बिपाशा की प्रियांका!
माझं वय २२ आहे. उंची ५ फूट ६ इंच आहे आणि वजन ६८ किलो आहे. लोकसत्ता ‘व्हिवा’मधल्या तुमच्या एका लेखात लिहिल्याप्रमाणे मी ओव्हरवेटही नाही आणि ओबेजही नाही. पण माझा प्रॉब्लेम वेगळाच आहे! माझ्या जन्मापासूनच माझ्या शरीराचा आकार थोडासा धिप्पाड किंवा थोराड म्हणता येईल असा आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 16-11-2012 at 06:37 IST
मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fitness like bipasha and priyanka