नव्वदच्या दशकात एमपीथ्री या फॉरमॅटमध्ये गाण्याला बसविण्यासाठी अनेक प्रयोग सुरू होते. १९९७ साली पहिला यशस्वी एमपीथ्री प्लेअर बनविण्यात आला. त्या काळाच्या अलीकडे-पलीकडे एमपीथ्री फॉरमॅटमध्ये हजारो गाण्यांचा प्रसार झाला. म्यूझिक कंपन्यांमध्ये पॅकिंग करणाऱ्या आणि पायरसीशी ओळख झालेल्या काही मूठभर व्यक्तींनी इंटरनेटवरून जगभरामध्ये ताज्या गाण्यांना या फॉरमॅटमध्ये पोहोचविण्याचा कार्यक्रम आखला. हजारो डाऊनलोड साइट्स तयार झाल्या आणि गाण्याच्या पायरसीने त्याचे उपभोगमूल्य घसरत घसरत मोफत झाले. ‘स्टीफन वीट’ या पत्रकाराने या सगळ्या व्यवहाराला बारकाव्यासह ‘हाऊ म्यूझिक गॉट फ्री’ या पुस्तकामध्ये मांडले आहे. त्याने या क्षेत्रातील नावाजलेल्या गुन्हेगारांना बोलते करून या पुस्तकात मोठा दस्तऐवज उभा केला. त्यात एक गंमतशीर नोंद आहे. वयाच्या विसाव्या वर्षी म्यूझिक पायरसीमध्ये उतरलेली तरुण मंडळी नव्या कलाकारांची गाणी ऐकत ऐकत मोठी होत होती. सतत गाणी ऐकणाऱ्या या संगीतचोरांचा आपोआप कान तयार झाला आणि प्रत्येक कलाकाराच्या गाण्यांतील वैशिष्टय़ांपासून ट्रेण्ड्सबाबत एखाद्या संगीत पत्रकार, समीक्षकांइतकी त्यांची समज तयार झाली. कुणाचे गाणे कुणासारखे आहे, एखाद्या गाण्याची चाल आणि बीट्स दुसऱ्या कोणत्या गाण्यामध्ये वापरली गेली आहे, चलती असलेल्या गाण्याचे किंवा शैलीचे अनुकरण कसे केले जाते, याबाबत त्यांची खरीखुरी मते तयार व्हायला लागली. प्रत्येक कलाकाराचा अल्बम विक्रीपूर्वी या पायरसीजगतात जाऊ लागला आणि २००५ ते १० या काळामध्ये दोन कलाकारांपैकी समान शैली असलेल्या एखाद्या कलाकाराला हिट किंवा फ्लॉप करण्याच्या साऱ्या नाडय़ा पायरसीच्या जगाकडे आल्या. बियॉन्सेपासून रिहानापर्यंत अनेक कलाकारांना आणि त्यांच्या अल्बम्सना हिट करण्यामध्ये त्यांच्या गाण्याइतकाच या विचित्र यंत्रणेचा हात होता. लोक कोणत्या गाण्याला हिट करतील आणि आणि त्या प्रवाहाचे अनुकरण करणारी गाणी सातत्याने येऊनही श्रोत्यांना सातत्याने कसे चकवतील, याचा या यंत्रणेला अचूक अंदाज यायला लागला.

स्टीफन वीट याने आपल्या रंजक पुस्तकात संगीत अर्थकारणातील गमती मांडल्या आहेत. या आठवडय़ामध्ये बिलबोर्डच्या दोनशे गाण्यांच्या यादीत अचानक अरियाना ग्रान्दे या गायिकेच्या ‘स्वीटनर’ या अल्बमने पहिला क्रमांक पटकावला. स्टीफन वीटच्या पुस्तकातील पायरसी यंत्रणेतील संगीतज्ज्ञांच्या समीकरणांनुसार अरियाना ग्रान्दे हिच्या गाण्यांमध्ये सध्याच्या रॅप आणि रॅपस्टार्सचा प्रभाव तिला पहिल्या स्थानी नेणारा आहे. सध्या ज्या शैलीची चलती आहे, तिला आत्मसात करून ग्रान्दे हिने प्रचंड मोठी झेप घेतली आहे.

अरियाना ग्रान्दे ही वयाच्या तेराव्या वगैरे वर्षांपासून म्यूझिकल्समध्ये गाणारी अगदी कसलेल्या गळ्याची गायिका आहे. निकोलोडियन वाहिनीवरील मालिकेमध्ये अभिनयापासून प्रसिद्धी मिळवत तिने म्यूझिक अल्बम काढला. आंतरराष्ट्रीय संगीतपटलावर तिची ओळख तयार होऊ लागली. अल्पावधीत तिचे चाहते इतके वाढले की दोन वर्षांपूर्वी मॅन्चेस्टरमध्ये तिच्याच एका कन्सर्टमध्ये दहशत पसरविण्यासाठी अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट घडविला.

ग्रान्दे हिच्या अल्बममधील गाणी कार्डी बीपासून ते निकी मिनाजच्या आर अ‍ॅण्ड बी शैलीला आपल्या गाण्यात सामावून घेताना दिसतात. स्वीटनर हे संकरित गाणे ऐकल्यानंतर ही गंमत सहज लक्षात येते. फेराल विल्यम्स या कलाकाराचा गाणी लिखाणापासून ते संगीतात सहभाग असल्यामुळे कण्ट्री आणि अमेरिकी कृष्णवर्णीयांच्या संगीताचे एकत्रीकरण ग्रान्देच्या स्वीटनर या अल्बममध्ये आहे. बिलबोर्ड यादीच्या परिचितांना या गाण्याचा सध्याच्या उडत्या चालीच्या गाण्यांशी असलेला एकूण प्रभाव सहज लक्षात येण्यासारखा आहे. या अल्बममध्ये आर.ई.एम या नावाचे एक गीत आहे. (आर.ई.एम. या बॅण्डची गाणी ऐकलेल्यांना ते शीर्षकासह अधिक  कळणारे आहे.) अगदी अलीकडच्या काळापर्यंत गायक-गायिकांची स्वत:च्या गाण्याची खास ओळख असे. लेडी गागाचा बंडखोर इलेक्ट्रॉनिक्स बिट्समध्ये मुरलेला आवाज, टेलर स्वीफ्टची सोप्या कॉर्ड्सची पुनरावृत्ती असणाऱ्या हळुवार प्रेमकहाण्याच मांडण्याची पद्धत यांमुळे कोलाहलातही ऐकू आले तर गाणे कुणाचे हे ओळखायला वेळ लागायचा नाही. शकीराच्या गेल्या वर्षी आलेल्या अल्बमपासून ते ग्रान्दे हिच्या पहिल्या स्थानी पोहोचलेल्या ताज्या अल्बम्समध्ये विकते तेच कसे तयार केले जाते, याची झलक पाहायला मिळेल. टेलर स्वीफ्टनेही डेलिकेटमध्ये हाच मार्ग पत्करला आहे, तर अ‍ॅडम लेव्हिन, ड्रेक, खालीदसह सारे आघाडीचे कलाकार इतर कलाकारांसोबत गाणे तयार करीत आहेत. दोन भिन्न शैलीची गायकी एकाच गाण्यात आल्यानंतर सूरअनुभव पूर्णपणे बदलून जातो. सध्याच्या गाण्यांमधील प्रयोगांचा हा प्रवाह जाणून घ्यायलाच हवा असा आहे.

viva@expressindia.com

Story img Loader