पिंपरी-चिंचवड करांसाठी खाऊची चौपाटी नवी नाही. इथला वडापाव आणि ब्रेड रोलचा आस्वाद घ्यायला झुंबड उडते तशी (आता) सीसीटीव्ही नियंत्रणाखाली असलेली ही अद्ययावत हातगाडी कुतूहलानं बघायलाही गर्दी जमते.
चौपाटी आणि तेही पुण्यात!! हे वाचून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटलं असेल, परंतु इथे चौपाटीचं समीकरण थोडं वेगळं आहे. (पुणं आहे, त्यामुळे वेगळं असणार हे गृहीतच आहे!) वास्तविक समुद्र आणि चौपाटी असं हे साधं समीकरण नसून फक्त चौपाटीवर मिळणारी भेळ, पाणीपुरी हे समीकरण इथं महत्त्वाचं आहे. याचा मथितार्थ इतकाच की, चौपाटी आणि खाऊ कट्टा असा हा सरळ साधा हिशोब आहे.
ही चौपाटी आहे पुण्याच्या जुळ्या शहरांत, पिंपरी-चिंचवडमध्ये. िपपरी-चिंचवडकरांसाठी काही नेहरूनगर परिसरातली चौपाटी नवीन नाही. सुमारे २५ वर्षांपूर्वी वडापावच्या गाडीने सुरू झालेल्या या खाऊ कट्टय़ाला आजूबाजूच्या डी. वाय. पाटील कॉलेज आणि इतर कॉलेजमधल्या तरुणाईनं प्रथम आपलंसं केलं. इथे राहणाऱ्या हॉस्टेलाइट्सने ही चौपाटी आजतागायत जगवली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
नेहरूनगरमध्ये एच. ए. (िहदुस्तान अँटिबायोटिक्स) ग्राऊंडजवळ ही खाऊची चौपाटी दिमाखात उभी आहे. आजूबाजूला असणारी भरपूर कॉलेजेस-शाळा-हॉस्टेल्स-पेइंग गेस्ट्स-ऑफिसेस यांमुळे चौपाटीचा फॅन क्लब तसा बराच मोठा आहे.!! सुरुवातीला पर्याय नाही किंवा सहज टाइमपास म्हणून खायला आलेली लोक नंतर इथे वरचेवर येऊ लागतात. चौपाटी तशी मर्यादित वेळेतच आणि मर्यादित जागेवर असते बरं का! म्हणजे साधारण संध्याकाळी ५ ते ९- ९.३० या वेळेतच तुम्हाला चौपाटीवरचे खाऊचे अड्डे दिसतील आणि अर्थातच गर्दीने तुडुंब भरलेले दिसतील. मुख्य म्हणजे इथे पाìकगची व्यवस्थित सोय (पुण्याच्या ‘यंगिस्तान’ला ‘व्यवस्थित’ या शब्दाची व्याख्या वेगळी सांगायला नको) आहे.
वडापाव-पावभाजी-मसालापाव-पॅटिस-रगडा पुरी-शेवपुरी-पाणीपुरी-भेळपुरी-कच्छी दाबेली-सॅन्डविचचे निरनिराळे प्रकार-डोशाची वाइड रेंज-विविध प्रकारची भजी (बटाटा-कांदा-पालक वगरे) तसंच स्पेशल अंडा भुर्जी-पाव असे अनेक पदार्थ इथे मिळतात. त्यांची चव चाखायला चौपाटी अक्षरश: गजबजून गेलेली असते. चौपाटीची खासियत म्हणाल तर ‘गणेश’चा ब्रेड रोल, पॅटिस, वडापाव तसंच ‘संदेश’चं मसाला मिल्क!
चौपाटीचा सगळ्यात जुना आणि पहिला खाऊ कट्टा म्हणजे ‘गणेश’चा वडापाव आणि तीच चव कायम राखत आजही ती अनेकांची ‘मोस्ट फेव्हरेट’ आहे. ही गाडी चक्क ‘सीसीटीव्ही’ नियंत्रणाखाली असून हात धुण्यासाठी बेसिन, तसंच पिण्याच्या पाण्याची सोयदेखील इथे आहे. ही भन्नाट गाडीसुद्धा कुतूहलाचाच विषय आहे. वडापाव खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल तर इथला ब्रेड रोल नक्की ट्राय करा.!!
एरव्ही दूध म्हटलं तर कां-कू करणारी मुलं इथे येऊन मात्र मसाला दूध विथ मलाई ऑर्डर करतात. बोर्नविटा मिल्क तसंच कॉफीसुद्धा इथे उपलब्ध आहे. रोज-रोज कोणी मसाला दूध पितं का, असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर आश्चर्यकारकरीत्या ‘हो’ आहे, हे इथं आल्यावर कळतं!!
चौपाटीवरचे सगळेच पदार्थ १०० रुपयांच्या आतमधले आहेत आणि तरुणाईपासून ते अगदी फॅमिलीसोबत येणाऱ्यांची गर्दी इथल्या चवीची साक्ष देते. तुम्ही हायजिन कॉन्शियस वगरे जरी असलात तरी इथे आल्यावर तुम्हाला हे पदार्थ चाखून पाहायची भुरळ पडली नाही तर नवलच.!! शेवटी आपण पोटासाठी खातो की जिभेसाठी ते महत्त्वाचं.!
खाऊचा कट्टा : खाऊची चौपाटी
पिंपरी-चिंचवड करांसाठी खाऊची चौपाटी नवी नाही. इथला वडापाव आणि ब्रेड रोलचा आस्वाद घ्यायला झुंबड उडते तशी (आता) सीसीटीव्ही नियंत्रणाखाली असलेली ही अद्ययावत हातगाडी कुतूहलानं बघायलाही गर्दी जमते.
आणखी वाचा
First published on: 03-01-2014 at 01:04 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Food chowpatty at pune