|| हर्ष देसाई

मी २०१६ मध्ये माझं ‘उदरभरण’ नावाचं यूटय़ूब चॅनल सुरू केलं. त्याचबरोबर त्याच नावाने फेसबुक पेज सुरू केलं. माझ्या आईची आई सुगरण होती. तिच्यामुळे मी पाककृतींच्या राज्यात ओढला गेलो. लहानपणी तिला स्वयंपाक करताना पाहत रहायचो. ती उकडीचे मोदक वगैरे बनवतानाचा तिचा प्रसन्न चेहरा अजूनही आठवतोय. त्यानंतर आई मला आजी कशी स्वयंपाक करायची, त्याविषयी सांगायची. आजी जसं करायची तितकंसं आईला जमायचं नाही. आईची पद्धत वेगळी होती. याचदरम्यान माझं पाककृती करून बघणं, शिकणं सुरू होतं. मग मी स्वयंपाककलेकडे वळलो. मध्यंतरी माझ्या आयुष्यात एका वळणावर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातून मार्ग काढताना स्वयंपाककलेने माझ्या मनाला उभारी दिली. स्वयंपाककलेमुळेच मी त्या तणावपूर्ण परिस्थितीतून बाहेर येऊ  शकलो. तेव्हापासून तणावमुक्तीवर एक उत्तम पर्याय म्हणूनही स्वयंपाक कलेकडे पाहू लागलो.

मी सिव्हिल इंजिनीअर आहे. त्यामुळे कम्प्युटर आणि त्याच्या आधारे सोशल मीडियाचा वापर करून आपली वेगळी ओळख घडवण्यासाठी सोशल मीडियाचा अभ्यास केला. युटय़ूब पाककृतींचे व्हिडीओ पोस्ट करताना काय काय गोष्टी कराव्या लागतात, ते सगळं शिकून घेतलं. चॅनेल कसं सुरू करायचं. एडिटिंग कसं करायचं, युटय़ूब वापराची वैशिष्टय़े काय आहेत, हे सगळं शिकून घेतलं. माहिती गोळी केली. मग हळूहळू प्रगती करत गेलो.

माझी आई मालवणी आणि वडील गुजराती. आम्ही वसईला राहतो, त्यामुळे आमच्या घरात संमिश्र आणि समृद्ध खाद्यसंस्कृतीची मेजवानीच असते. सुरुवातीला मी मालवणी खाद्यसंस्कृती एक्स्प्लोअर केली. मालवणी पद्धतीचे आमटीचे विविध प्रकार, फिश करीज, ग्रेव्हीज वगैरे करून पाहिल्या. त्यातच मी पुढे शोध घेतला की खोबऱ्याचं वाटण वापरण्याऐवजी काही वेगळं वापरता येईल का, अशा पद्धतीने वेगवेगळ्या रेसिपीज एक्सप्लोअर करत गेलो. माझ्या युटय़ूब चॅनलवर ऑथेन्टिक महाराष्ट्रीयन कुजिनवर जास्त भर देतो. कारण ती त्या वेळेची गरज होती. २०१६ मध्ये तेव्हा फारच कमी अशा पद्धतीचं युटय़ूबवर पाहायला मिळायचं.

आपल्या खाद्यसंस्कृतीवर तिथल्या प्रादेशिक वातावरणाचा प्रभाव असतो. कोकणामध्ये आंबटपणासाठी कोकम वापरतात. वसई आणि पालघरपर्यंतच्या पट्टय़ात आंबटपणासाठी चिंच वापरतात. नारळ थेट वापरण्यापेक्षा नारळाचं दूध (म्हणजेच नारळाचं शिरं) काढून वापरतात. थंडीमध्ये वसई आणि आसपासच्या भागात बोर्डीच्या जवळ वालाचं पीक घेतलं जातं, त्यामुळे इथल्या वालाच्या पाककृतीही प्रसिद्ध आहेत. वसईच्या आसपासच्या भागात ‘उबडहंडी’ नावाची एक पाककृती केली जाते. मातीच्या मडक्यात कडवे वाल, पावटे, रताळे, बटाटे, ओवा, तुरीचा दाणा, भांबुर्डीचा पाला, जाडं मीठ, आलं, मिरची किंवा मसाला वापरून व्हेज उबडहंडी केली जाते. शेतामध्ये खड्डा खोदतात आणि आगीवर शिजायला ठेवतात. अशाच प्रकारे नॉनव्हेजही करतात. पुढे गुजरातमध्ये ही पाककृती ‘उबाडियो’ नावाने ओळखली जाते. या पाककृतीवर उबडहंडीचा प्रभाव आहे. परंतु ती व्हेजच असते. गुजरातमध्येही थंडीमध्ये वालाचा सीझन असतो. इथे पाककृती शाकाहारी असतात. रायगड परिसरात ‘पोपटी’ हा प्रकार असतो, त्याच्या जवळ जाणारा हा प्रकार आहे, पण यातील मसाल्यांमध्ये फरक आहे. आपण वालाच्या बिरडय़ासाठी कडवे वाल वापरतो. तर गुजरातमध्ये सुरतपर्यंत प्रकार तोच आहे, पण त्यात पावटा वापरतात. गुजरातमध्ये आमचा देसाई समाज आहे. तर आमच्या समाजात देसाईवडे म्हणून एक पाककृती प्रसिद्ध आहे. यासाठी ज्वारी, बाजरी, तांदूळ, तुरीची डाळ हे सगळं भाजून त्याचं जाडसर पीठ केलं जातं. हे पीठ वडय़ासाठी भिजवताना त्यात चमचाभर आंबट दही किंवा त्याऐवजी चिंचही वापरली जाते. मग त्यामध्ये आलं, मिरची आणि मालवणी मसाला, हळद, मीठ वापरलं जातं. गुजरातमध्ये मालवणी मसाल्याऐवजी मिरची पावडर वापरली जाते. हे पीठ मळून दोन तास भिजवून ठेवायचं. मग त्याचे वडे करून तळायचे. देसाईवडय़ासाठी वापरल्या जाणाऱ्या पीठापासून इतरही काही पाककृती केल्या जातात. त्यात ‘पुडा’ नावाचा एक प्रकार केला जातो. यात भाजणीचं पीठ आणि आवडीनुसार विविध भाज्या, दही आणि मिरची पावडर वगैरे वापरून त्याचे पुडे करायचे. तसेच ‘डेब्रा’ नावाचा एक पदार्थ थंडीमध्ये गुजरातला केला जातो. गुजरातला वापी, सुरतच्या आसपासच्या परिसरातील पाककृती स्पायसी असतात. पण अहमदाबादकडे गेलात तर तिकडच्या पाककृतींमध्ये गूळ वापरतात. करण्याची पद्धत सारखीच असते, पण तिखटपणा कमी असतो. ‘डाळढोकळी’ ही पाककृती संपूर्ण गुजरातमध्ये केली जाते. आपल्याकडे महाराष्ट्रात त्याचपध्दतीची ‘वरणफळं’ ही पाककृती प्रसिद्ध आहे. या दोन्ही पाककृती जवळजवळ सारख्याच आहेत. आपल्याकडे महाराष्ट्रात सुरळीच्या वडय़ा केल्या जातात. हीच पाककृती गुजरातमध्ये ‘खांडवी’ हे नवं नाव धारण करते. या आपल्या पारंपरिक पाककृती आहेत. गुजरातमध्ये ‘दूधपाक’ म्हणून एक गोडाचा पदार्थ केला जातो. हा खिरीचाच एक प्रकार पण नाव वेगळं आहे. दुधामध्ये तांदूळ शिजवला जातो. त्यात सुकामेवा, साखर वगैरे घालून दूधपाक केला जातो.

दिवाळी पाडवा हे गुजराती लोकांचं नवीन वर्ष, त्याचबरोबर दसरा, दिवाळी, नवरात्र असे सगळे सण तिकडे थाटात साजरे केले जातात. सणासुदीच्या सेलिब्रेशनला जलेबी, फाफडा हे दोन पदार्थ तर असतातच.

गुजरातेतून पुन्हा वसईकडच्या परिसरात येताना काही मांसाहारी पदार्थांविषयी इथे सांगावसं वाटतंय. वालाच्या सीझनला सुके बोंबील आणि त्यात वाल, चिंच वगैरे घालून बोंबलाचं आंबट केलं जातं. ही प्रसिद्ध पाककृती आहे.

मी करून पाहिलेल्या सगळ्याच पाककृतींचं कौतुक झालं आहे. त्यातही खासकरून ओल्या बोंबलाचं कालवण या पाककृतीचं खूपच कौतुक झालं. ओले बोंबील साफ करून घ्यायचे. त्याचे तुकडे करायचे. मग एका भांडय़ात तेल टाकून लसणाच्या पाकळ्या ठेचून त्यात घालायच्या. त्यानंतर कढीपत्ता घालायचा. एका बाजूला चार-पाच टॉमेटोची प्युरी करून घ्यायची. ते घालून चांगलं परतवून काढायचं. या प्युरीला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं. मग त्यात मसाला घालायचं आणि बोंबलाचे तुकडे घालायचे. मीठ आणि कोकम घालून, थोडसं पाणी घालून ते शिजू द्यायचं. अशा पद्धतीने हे झटपट कालवण तयार होतं.

आईकडचा मालवणी खाद्यसंस्कृतीचा वारसा, वसईला राहत असल्यामुळे तिथल्या खाद्यसंस्कृतीचा प्रभाव आणि बाबांच्या मूळ घरी गुजरातमध्ये गेल्यावर तिथल्या पाककृतींचा खजिना या सगळ्याचा सुरेख मेळ माझ्या स्वयंपाककलेत साधला गेला आहे. त्यामुळे वसई ते गुजरात व्हाया खाद्यसंस्कृती अशा माझ्या प्रवासात खाद्यसंस्कृतीविषयी जाणून घेतानाच त्यात प्रयोग करून पाहणं मी सोडत नाही. माझ्या प्रोफेशनव्यतिरिक्त याच कलेच्या सहवासात मी रमलेला असतो.

शब्दांकन : भक्ती परब

viva@expressindia.com