गरम-गार, तिखट-गोड, चटपटीत, चमचमीत असे सगळ्या चवींचे -सगळ्या प्रांतांचे पदार्थ मिळणारी एक खाऊची गल्ली पुण्यात ऐन सदाशिव पेठेत आहे. गरमागरम समोशापासून ते  थंडगार ‘कुका’ (खास ‘नवं-पुणेरी’ खासियत) अशी तुफान व्हरायटी इथे चाखायला मिळते.
पुण्यातल्या खाऊकट्टय़ांचा विषय निघाल्यावर ज्याशिवाय तुम्ही पुढे जाऊच शकत नाही, अशी एक खाऊगल्ली सदाशिव पेठेत आहे. ज्ञान प्रबोधिनीच्या अलीकडे सदाशिव पेठेत ही गल्ली आहे. प्रबोधिनीच्या कॉर्नरपासून या गल्लीची खाद्यभ्रमंती तुम्ही सुरू करू शकता. चालत जाणार असाल तर हरकत नाही. पण गाडीने (पुण्याच्या भाषेत गाडी म्हणजे मुख्यत: दुचाकी पण यात तीनचाकी, चारचाकी अगदी सायकलसुद्धा येते) जाणार असाल तर मात्र तारखेनुसार आणि सोसायटीच्या गेटवरच्या पाटय़ा व्यवस्थित वाचून गाडी पार्क करून मगच पुढे जा.. कारण तुम्ही सदाशिव पेठेत जाणार आहात! या परिसरात खाऊगल्लीच्या फॅन्सच्या गाडय़ा हमखास पकडता येतात, हे माहिती असल्याने पोलिसांची टोइंग व्हॅन नेहमी फिरत असते. पण एकदा ही खाबूगिरी सुरू केल्यानंतर जागेचा विसर पडतो हेही तितकंच खरंय बरं का..!!
सुरुवातीला रस्त्याच्या डाव्या बाजूला साऊथ इंडियन फूड जॉइंट्स आहेत. एक म्हणजे रस्त्यावर उभं ठाकलेलं दक्षिण दावणगिरी डोसा सेंटर.!! साधा डोसा, लोणी डोसापासून ते अगदी नूडल्स डोसा, चायनिज डोसा, चॉकलेट स्पंज डोसा, शेव कट डोसा असे अक्षरश: असंख्य डोशांचे प्रकार स्पेशल साऊथ इंडियन चटणीसोबत तुम्ही इथे चाखू शकता. या गाडीच्या मागेच बुटकी टेबल-बाकं टाकून बसायला छोटीशी जागा केली आहे. पण गर्दी इतकी असते की क्वचितच एखादा भाग्यवान तिथे निवांत बसून खाऊ शकेल. नाही तर प्लेट हातात घेऊन खाण्यातच तमाम खाद्यभक्त धन्यता मानतात. तुम्ही जर अगदीच हायजिन कॉन्शिअस वगरे असाल किंवा हातात प्लेट घेऊन खाणं जर तुम्हाला जमणार नसेल तर बाजूच्या बिल्डिंगमध्ये मानकर डोसा सेंटर नावाचं रेस्टॉरंट आहे. इथेसुद्धा तुम्ही व्हरायटी डोसे खाऊ शकता. शिवाय निवांत बसून आस्वाद घेऊ शकता.
पुढे गेल्यावर थिक चॉकलेट शेक, मसाला ताक, रोझ लस्सी, गुलकंद लस्सीअशा पाटय़ा आपलं स्वागत करतात आणि ही जागा म्हणजे रोहित मिल्क सेंटर. नॉर्मल हॉट कॉफी-हॉट चॉकलेटसोबतच जवळपास आंबा, सीताफळ, स्ट्रॉबेरी, चिक्कू यांचे अल्टिमेट मिल्कशेक मिळतात. वर्षभरात कधीही सदाशिव पेठेत चक्कर टाकलीत तरी या दुकानासमोर तुम्हाला हमखास गर्दी दिसेल!!
तुम्ही जर चटपटीत चाट वगरे शोधात असाल तर पांडुरंग भेळ हा पर्याय तुमच्यासाठी आहे. मसाला पुरी, शेवपुरीपासून ते अगदी नावीन्यपूर्ण अमेरिकन शेवपुरी, दही चिवडा असे चाट ऑप्शन तुम्हाला इथे उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे हे सगळे पदार्थ जैन प्रकारातदेखील इथे मिळतात.
तमाम पुणेकरांसाठी आता ‘अनारसे समोसेवाले’ हे नाव फारसं नवीन नाहीये. काही वर्षांपूर्वी समोसाची एक छोटीशी टपरी ‘जिवाला खा! जिवाला खा! जिवाला खा!’ म्हणत तमाम पुणेकरांच्या जिभेवर स्वार झाली. एका स्टुलावर ठेवलेल्या टोपलीत गरमागरम समोसे तेव्हा मिळायचे. आता काळानुरूप स्वत:ला बदलत ही टपरी दुकानात स्थिरावलीय. हिरव्या-गोड चटणीसोबत दिला जाणारा वडापाव, त्याचप्रमाणे गोड-तिखट चटणी समोसा आणि त्यावर शेव, चीज बाइट्स आणि सॉस एवढंच! पण प्रचंड गर्दी खेचणारे हेच पदार्थ इथलं वैशिष्टय़ आहे. गरमागरम समोसा खाऊन झाल्यानंतर काही थंड खायची इच्छा झाली तर समोरच आइसक्रीम मॅजिक कॅफे आहे. इथे तुम्हाला सर्व प्रकारच्या आइसक्रीम फ्लेवर्ससोबतच चॉकलेट शेक-कोल्ड कॉफी (विथ क्रश किंवा विथ क्रिम) असे अनेक ऑप्शन आहेत. त्याचप्रमाणे इथले डॉलर पिझ्झा-फ्रेंच फ्राइज आणि चॉकलेट बाइट्ससुद्धा ट्राय करू शकता.
खाद्यजगतातले बहुतेक सर्व खाद्यपदार्थ ही गल्ली सामावून घेते. केक्स आणि क्रीम्स नावाचं बर्गर-पेस्ट्री हाऊस इथे आहे. त्याचप्रमाणे सॅण्डविच आणि टोस्टचं जवळपास सर्व व्हरायटी देणारं कॉफी शॉप इथे आहे. पराठा-धपाटा आणि त्यांचे वेगवेगळे प्रकार इथे मिळतात. जर पोटभरीचं काही हवं असेल तर साईप्रसाद हा योग्य पर्याय आहे.
सॅण्डविच-टोस्ट वगरेंसोबतच इथे पावभाजी, फ्राइड राइस, मिसळ पाव, हाक्का नूडल्स तसंच व्हेज पुलावही मिळतो आणि पुण्यात शक्यतो सर्वच खाऊ अड्डय़ांवर उपलब्ध असणारं कोकम तसंच िलबू सरबत इथेही आहेच. कॅड-बी, कॅड-एम, कोल्ड कॉफी, कोल्ड चॉकलेट हे प्रकार काही आता यंगिस्तानला नवीन राहिले नाहीयेत. पण त्याचबरोबर पुणे स्पेशल ‘कुका’ नावाचा अफलातून पदार्थ मिळणारं ‘कॅफे क्रीम’ही इथे आहे. ‘कुका’ बरचसं कोल्ड कॉफीसारखं दिसतं पण दाट आणि चवीला भन्नाट असा हा पदार्थ नक्की ट्राय करण्यासारखा आहे. सध्या तरी तो आमच्या पुण्याचा स्पेशल आयटेम आहे. प्लेन कुका, कुका विथ क्रश, कुका विथ थंडर, कुका विथ नॅचरल थंडर, व्हाइट कुका, मोका कुका, आयरिश कुका, ब्लॅकफॉरेस्ट कुका अशा अनेक तोंडाला पाणी सुटणाऱ्या फ्लेवर्समध्ये कुका मिळतो. याशिवाय टोस्ट-पिझ्झा-बर्गर-कोल्ड कॉफी यांच्या व्हरायटीची मोठ्ठी रेंजच इथे आहे. त्यामुळे सदाशिव पेठेतून जात असाल तर तरुणाईच्या या हॉट फेव्हरेट खाऊगल्लीत चक्कर टाकाच..!!

Story img Loader