मितेश जोशी
चेहरा मराठी असला तरी हिंदी मालिका विश्वात सक्रिय असलेला आणि अभिनयाच्या जोरावर देशभर आपला चाहता वर्ग तयार करणारा बिनधास्त अभिनेता म्हणजे अक्षय केळकर. ‘मला शुद्ध शाकाहारी जेवायला आवडतं,’ असं सांगणाऱ्या अक्षयच्या खाबूगिरीच्या कल्पनाही वेगळय़ा आहेत.
अक्षय केळकर हा हिंदी मालिका विश्वातील एक लोकप्रिय कलाकार आहे. नाव व चेहरा जरी मराठमोळा असला तरी अक्षयने हिंदी विश्वात आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. मराठी ‘बिग बॉस’ सीझन चारचं विजेतेपद त्याने पटकावलं आणि मराठीतही तो घरोघरी परिचयाचा झाला. हिंदीमध्ये त्याने ‘नीमा डेन्झोंगपा’ आणि सोनी सब वाहिनीवरील ‘भाखरवडी’मध्ये काम केलं आहे. ‘बँग बँग’ या मराठी वेब मालिकेचाही तो भाग होता. ‘दोन कटिंग’ ही त्याची सर्वाधिक लोकप्रिय शॉर्ट फिल्म! मराठी चित्रपट ‘टकाटक २’मध्येही तो झळकला होता. तरुणाईत लोकप्रिय असलेल्या अक्षयच्या खाद्यसंकल्पनाही काहीशा वेगळय़ा आहेत.
अक्षयच्या दिवसाची सुरुवात चहा-बिस्किटने होते. चहा घेतल्याशिवाय कामच करता येत नाही, अशी बऱ्याच जणांची तक्रार असते. चहा प्यायल्याने मज्जासंस्थेला उत्तेजना मिळून शरीराचा थकवा दूर होतो व उत्साह वाढतो. हा चहाचा गुणधर्मच असल्याने त्याच्या दिवसाची सुरुवात चहानेच होते. चहाइतकाच आहारात भाकरी हवी याबद्दल तो आग्रही आहे. भाकरी खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. तुमच्या हृदयाच्या आणि मेंदूच्या कार्याला चालना मिळण्यासही मदत होते. शरीराला आवश्यक असणारे फायबर्स, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, काबरेहायड्रेट्स भाकरीचं सेवन केल्याने मिळतात. वाढत्या वयानुसार आरोग्याच्या समस्येत भर पडत असते, पण भाकरी खाल्ल्याने काही प्रमाणात शारीरिक समस्या कमी होऊ शकतात. त्यामुळे आहारात भाकरी असायलाच हवी हा त्याचा नियमवजा हट्ट आहे. अक्षयला स्वत:ला भाकरी खायला आवडते, तसंच भाकरी थापून मित्रांना खिलवायलाही भयंकर आवडते. भाकरीच्या जोडीला भाजी व सोलापुरी शेंगदाणा चटणी हवीच. रात्रीच्या आहारातही भाकरी-भाजी खाण्याचा त्याचा नियम आहे. सध्या आंब्याच्या सीझनमध्ये भाकरीची जागा पोळीने घेतली आहे. उन्हाळय़ात रोज न चुकता तो आमरस पोळी खातो. संध्याकाळी लागलेली किंचित भूक चहा-बिस्किटने शमवण्याचा प्रयत्न करणारा अक्षय रोज दोन कप चहा आणि दोन वेळेला भाकरी-भाजी असा आपला साधासोपा डाएट असल्याचं सांगतो.
अक्षय शुद्ध शाकाहारी आहे. त्याला मांसाहार अगदी अंडीही आवडत नाही. इटालियन, चायनीज कुझिनची किंवा साधी मॅगीचीही क्रेझ त्याला नाही. मसालेदार झणझणीत, तेलाचा तवंग असणारे, नाकातोंडातून धूर काढणारे तिखट पदार्थ त्याच्या ताटात दिसणार नाहीत. खाण्यावर इतकी बंधनं कशासाठी? असा प्रश्न त्याला विचारला असता अक्षय म्हणाला, ‘माझ्या मित्रांना ही बंधनं वाटतात. मी तसं म्हणणार नाही. मी डाएट, रोजच्या रोज व्यायाम असं काही करत नाही. वर्षभरात केवळ दोन ते तीन महिनेच मी व्यायाम करतो. तो व्यायाम मला पुढे काही महिने पुरतो, त्याचं कारण माझं खाण्यावर असलेलं नियंत्रण.. पास्ता, पिझ्झाला मी शिवतही नाही. याला बंधन म्हणण्यापेक्षा त्या माझ्या खाण्याच्या सवयी आहेत, असं म्हणणं योग्य ठरेल’. माझ्या माहितीतील पदार्थ वगळता मी नवनव्या पदार्थासाठी टेस्ट डेव्हलप केलेली नाही, असं सांगणारा अक्षय आपली उडी फक्त मराठमोळय़ा पदार्थावर असल्याचं स्पष्ट करतो. बाहेर जेवायला जाताना माझ्या मित्रांचे वांदे होतात, माझे अजिबात होत नाहीत हे सांगतानाच आपल्याला गोड खायला प्रचंड आवडत असल्याची कबुली त्याने दिली. ‘पुरणपोळी आणि उकडीचे सुंदर कळीदार मोदक मी मध्यरात्री उठूनही खाऊ शकतो. मी कॅफे कल्चरसुद्धा एक्सप्लोर करत नाही. एखाद्या कॅफेमध्ये गेलो तर तिथलं मेनूकार्ड बघून मी आजही भांबावून जातो,’ असं तो मोकळेपणाने सांगतो.
‘बिग बॉस’च्या घरात असताना कमीत कमी जिन्नसांमध्ये उत्तम खाबूगिरी करण्याचा टास्क सगळय़ाच स्पर्धकांना असायचा, असं सांगत त्याने घरातील खाण्याच्या गमतीजमती सांगितल्या. ‘बिग बॉस’च्या घरात मी एक गोष्ट शिकलो ती म्हणजे उपलब्ध जिन्नसांमध्येसुद्धा आपण उत्तम जेवण बनवू शकतो. तिकडे भाकरी नव्हती, त्यामुळे पोळी खाण्यावर जास्त भर असायचा. एकदा शिरा खाण्याचा मोह सर्वाना झाला होता, पण साजूक तूपच नव्हतं. साधा डालडाही नव्हता. अशा वेळी अमृताने तेलात बनवलेला शिराही चविष्ट झाला होता. तेलातही गोड पदार्थ चांगले होतात हे लक्षात आल्यावर आम्ही एकदा तेलामध्येच खीरही बनवली होती. जेव्हा आई मला आतमध्ये भेटायला आली तेव्हा तिने आठवणीने मला आवडणारे बेसनाचे लाडू बनवून आणले होते. महेश मांजरेकरही मधूनमधून उकडीचे मोदक आत पाठवायचे. खाण्यातून आनंद मिळतो तो हा असा मिळतो, असं तो म्हणतो. ‘बिग बॉस’मध्ये कोणाच्या हातचे पदार्थ आवडायचे? असा प्रश्न विचारला असता अक्षयने राखी सावंत खूप उत्तम सुगरण असल्याचं सांगितलं. ‘तिने एकदा सगळय़ांसाठी चिकन बनवलं होतं. मी चिकन खात नाही हे तिच्या लक्षात आल्यावर खास तिने माझ्यासाठी स्पेशल पनीर क्रिस्पी बनवलं होतं. अमृता आणि अपूर्वा याही उत्तम स्वयंपाक करतात,’ असं तो म्हणाला.
अक्षयचं शालेय शिक्षण ‘सहकार विद्या प्रसारक मंडळ, कळवा’ येथे झालं. ‘शाळेत माझे मित्र आईच्या हातच्या जेवणाचे चाहते होते. पाचवीनंतर डबा घेऊन न जाता चिटॉस घेऊन जाण्याचा हट्ट मी आईजवळ करायचो, पण आईने माझे फाजील लाड न करता मला वेळीच वठणीवर आणलं. शाळा सुटल्यावर तिथे जवळच मिळणारा महालक्ष्मीचा वडा क्वचित कधी तरी खाल्ला जायचा. आजही तो मी आवडीने खातो,’ असं तो सांगतो. रहेजा कॉलेजमधून कमर्शियल आर्टची पदवी घेणाऱ्या अक्षयने कॉलेजमध्ये असताना त्याला कोल्ड्रिंक प्यायची सवय लागली होती, असं सांगितलं. ‘घरून आईच्या हातचा डबा असायचाच. जशी मित्रांसोबत बाहेर कॉलेजविश्वात रम्य खाबूगिरी होते तशी माझी काही झाली नाही. जे काही खाल्लं ते स्वत:च्या किंवा मित्राच्या घरचंच..’ हे सांगणाऱ्या अक्षयने या सवयींमुळेच बहुधा कामाच्या निमित्ताने घरापासून लांब राहणं किमान खाण्याच्या बाबतीत फारसं जड गेलं नसल्याचंही नमूद केलं. ‘एक तर मला स्वत:ला जेवण बनवता येत होतं. माझं खाणं सकस व साधं असल्याने ते खिशाला परवडणारं आणि शरीराला पोषक होतं. माझे मित्र जेव्हा पार्टीसाठी घरी यायचे तेव्हा मी स्वत: जेवण बनवायचो. एकदा मित्रांनी माझ्या घरी ठेवलेल्या पार्टीच्या वेळी मी एकटय़ाने २८ भाकऱ्या थापल्या होत्या. मी स्वत: सगळय़ांसाठी जेवण बनवलं, जेवायला वाढलं. त्यानंतर ओटा आवरून भांडीही घासली. तेव्हा मला आईच्या श्रमाची खरी किंमत कळली. घरात एक जरी माणूस वाढला तरी घरातल्या बाईची होणारी दमछाक मी स्वत: अनुभवली. हा प्रसंग मला खूप काही शिकवून गेला,’ असं त्याने सांगितलं.
शाळेत असताना अक्षयचा सुट्टीचा काळ बराचसा दापोलीला त्याच्या काकांकडे जायचा. त्या आठवणी सांगताना तो म्हणतो, चहूबाजूंनी डोंगरांनी वेढलेलं गाव. डोंगरातून गाडी उतरत असताना दूरवर गावातील घरांची कौलं दिसायला लागत व मला कधी एकदा घरी पोहोचतो असं वाटायला लागे. गावी पानात पडेल ते भरपूर व आवडीने खायचो. चपातीपेक्षा दुप्पट मोठय़ा तांदळाच्या भाकऱ्या आणि फणसाची भाजी जेवायला असायची. सकाळी न्याहारीला उकडलेला फणस, तर कधी गरमगरम भात असायचा. तिकडे आतासारखे कॉर्नफ्लेक्स, टोस्ट, बोर्नव्हिटाचे फाजील लाड नव्हते. कोकणी मेवा भरपूर असायचा. गावची ओढ, तेथील वातावरण, भावंडांचा सहवास, पाटा-वरवंटा व चुलीवरील स्वयंपाक, विहिरीचं चविष्ट पाणी, पितळी भांडी..कारण काहीही असो.. गावचं केवळ अप्रतिम जेवण मला कायम अनुभवायला आवडतं. त्यामुळे आजही निसर्गाच्या सान्निध्यात आणि जिथे घरचं जेवण मिळेल तिथेच भटकंतीचे बेत आखण्याचा माझा आजही आग्रह असतो, असं तो स्पष्ट करतो.
अक्षयच्या मते वारसा म्हणजे कुठली वस्तू वा परंपरा म्हणजे खुळचटासारख्या पुढे नेलेल्या रीती नव्हेत. तर वारसा म्हणजे दोन पिढय़ांना जोडणारे क्षण. या पिढीपासून त्या पिढीपर्यंत जाण्याचा मार्ग म्हणजे वारसा, परंपरा होय. माझी आजीची जेवण बनवण्याची पद्धत, तिच्या हातचे खाद्यपदार्थ हा वारसा माझ्या आईनेही जपला. आता तोच खाद्यसंपन्न वारसा मी माझ्या परीने पुढे नेतो आहे. कायम वर्कलोडच्या नावाखाली स्विगीवरून अरबट चरबट काही तरी मागवायचे, त्यावर हजारो रुपये वाया घालवून पोटाला त्रास करून घ्यायचा. त्यापेक्षा आपापल्या घराची खाद्यसंस्कृती प्रत्येकाने अभ्यासली पाहिजे, असे सांगत आपल्या घरातील खाण्याचे संस्कार जपण्याचा आग्रह अक्षय प्रत्येकालाच करतो.