मितेश जोशी
एक उत्तम गायिका, कुशल सूत्रसंचालिका, गुणी अभिनेत्री अशा सगळय़ाच गुणांनी परिपूर्ण असलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे स्वानंदी टिकेकर. स्वयंपाकघरात मनापासून रमणाऱ्या तसेच दुसऱ्याकडून पदार्थ शिकण्यात आणि दुसऱ्याला शिकवण्यात कायम अग्रेसर असलेल्या स्वानंदीला जेवणाच्या ताटातल्या पदार्थाचे रंगीबेरंगी रंग आवडतात.
‘दिल दोस्ती दुनियादारी’, ‘दिल दोस्ती दोबारा’, ‘अस्सं माहेर नको गं बाई’ या मालिकांतून पुढे आलेली व सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई?’ या मालिकेतून रसिकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री स्वानंदी टिकेकर अबालवृद्धांमध्ये लोकप्रिय आहे. तिचा हटके अंदाज आणि तिने साकारलेल्या हरहुन्नरी व्यक्तिरेखा यामुळे रसिकांच्या मनावर ठसा उमटवत स्वानंदीने तिचा एक वेगळा प्रेक्षकवर्ग तयार केला आहे.
अशा चतुरस्र स्वानंदीलादेखील खाण्याची व खिलवण्याची विशेष आवड आहे. सध्या मालिकेच्या चित्रीकरणात जरी ती व्यग्र असली तरीही वेळच्या वेळी सकस अन्नपदार्थ खाण्याचा तिचा नियम असतो. स्वानंदीचा सकाळचा नाश्ता हा सेटवर होतो. नाश्त्यात पोहे, उपमा किंवा अंडय़ाचे वेगवेगळे पदार्थ खाण्याकडे तिचा कल असतो. साडेअकराच्या सुमारास ऋतुमानानुसार तिला फळं खायला आवडतात. दुपारच्या जेवणात पोळी-भाजी, कोशिंबीर, वरण-भात असं पद्धतशीर जेवायला आवडत असल्याचं ती सांगते. संध्याकाळी साडेसहा वाजता नाश्त्यासाठी भूक लागल्यावर ती त्याच वेळी रात्रीचं जेवण उरकून घेते. शूटिंग संपवून रात्री घरी आल्यावर भूक लागली तर दूध पिऊन भूक भागवते असं ती सांगते.
सेटवरच्या खवय्येगिरीचा विषयच खोल आहे, असं म्हणणारी स्वानंदी ‘दिल दोस्ती दुनियादारी’च्या चित्रीकरणाच्या वेळी झालेली खवय्येगिरी अविस्मरणीय आहे असं सांगते. या खवय्येगिरीचा किस्सा सांगताना ती म्हणते, ‘माझ्या सोबतीला पाच तरुण तुर्क होते. आमच्या चमूत सगळय़ात जास्त खादाड पुष्कराज चिरपुटकर होता. तो आम्हाला वेगवेगळे ठेले सजेस्ट करायचा. स्वत:हून काही तरी खायला घेऊन यायचा. शूटिंग संपल्यावर कुठे खायला जायचं हे ठरवायचा. आम्ही रोज बाहेरून काही न काही तरी खायला मागवायचो. सगळय़ांना मिळून पुरेल असा खाऊ ऑर्डर करून ते एकत्र खाण्यात एक वेगळीच मज्जा होती.’ एरवी कलाकारांना असते तशी हे खाल्लं तर आपण जाड होऊ असल्या मानसिकतेची धास्तीच नव्हती. सगळे षड् रस पोटात जायचे. फॅन्सी हॉटेलमधल्या चमचमीत पदार्थापासून पामतेलात तळलेल्या पचपचीत तेलकट समोस्यांपर्यंत आम्ही सगळं काही खाल्लंय, असं ती सांगते.
आता मात्र जपून खावं लागतं, असं सांगतानाच ‘अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई’ या नव्या मालिकेच्या सेटवर कशा पद्धतीने डाएट सांभाळून योग्य ते सकस अन्नपदार्थाच्या आधारे खाबुगिरी करावी लागते, याचंही रसभरित वर्णन ती करते. ‘मी बिटाची कोशिंबीर आणली आहे. तू आज कोणती कोशिंबीर किंवा पालेभाजी आणलीस? अशा प्रकारची स्पर्धा सध्या आमच्यात चालते. त्याचबरोबर दुपारच्या जेवणाच्या वेळी आमच्यात गुंडागिरीसुद्धा चालते. सेटवर सुकन्याताई आमच्यासाठी साक्षात अन्नपूर्णा आहे. तिच्या डब्यात कायम वेगवेगळे पदार्थ असतात. सेटवर प्रत्येक जण जास्तीचं जेवण आणतात. सुकन्याताईच्या डब्यातला एखादा पदार्थ आवडला तर आम्ही तिला म्हणतो, ए सुकन्याताई !! तू ही भाजी बनवली आहेस म्हणजे तू ती सकाळी खाल्ली असशीलच. त्यामुळे ती आता तू आम्हाला दे, असं गोड शब्दात तिला धमकी देऊन तिच्या डब्यातले पदार्थ आम्ही कायम हिसकावतो. तीसुद्धा आमच्या या मस्तीचा भाग होते.’ सेटवर प्रत्येकाच्या डब्यातलं आपल्याला काय काय आवडतं हेही ती सांगते. सुकन्याताईच्या हातचं ताक मला विशेष प्रिय आहे. तर मिलिंद दादाच्या डब्यात महाराष्ट्रीय पारंपरिक पदार्थाची रेलचेल तर असतेच, पण त्याचसोबत थाय करीसारखे फॅन्सी तथा पाश्चात्त्य पदार्थही असतात. दिग्दर्शक वैभव चिंचळकर यांचा डबा जिव्हातृप्तीबरोबरच नेत्रसुख देणारा असतो. त्याची बायको अन्विता तूप, लोणी, मुरांबा, ताक यासारख्या पदार्थाबरोबरच केळीच्या पानात केशराची काडी घालून गुंडाळलेले उकडीचे मोदक अतिशय उत्तम प्रकारे बनवून पॅक करून आमच्यासाठी पाठवते. वैभवच्या आईच्या हातची कढी आणि पालकाची भाजी मला खूप आवडते. दुपारच्या जेवणात कधी तरी कोणी तरी डेंजरस गोड पदार्थ आणतं. म्हणजे ते खाऊन पुढे शूट होऊच शकत नाही. ते खाऊन वामकुक्षी कन्फर्म असते. सगळे रोज म्हणतात हे खाल्लं नाही पाहिजे, याने निश्चितच झोप येणार आहे. तरीही सगळे जण त्यावर तुटून पडतात. संध्याकाळी साडेसहाच्या मधल्या सुट्टीत सुकन्याताईंचा ड्रायव्हर दादा इडली सांबार, भेळसारखे चाट आयटम बनवतो. कोणी सूप किंवा सलाड बनवतं. त्यामुळे सेटवर खाण्याची कायमच चंगळ असते, असं ती सांगते.
स्वानंदीला दुसऱ्यांकडून जेवणाच्या टिप्स घ्यायलाही आवडतात. त्याचबरोबर तिला दुसऱ्यांना जेवण बनवायला शिकवायलाही आवडतं. तिच्या घरी काम करणाऱ्या सविताताईला तिने सगळय़ा प्रकारच्या उसळी, चिंच-गुळातली आमटी, वेगवेगळय़ा कोशिंबिरी तसेच चटण्या बनवायला शिकवल्या. सविताताई आता स्वानंदीच्या हाताखाली स्वयंपाक शिकून तो उत्तम बनवू लागली आहे. स्वानंदी सांगते, ‘मी माझ्या आजीला जेवण करताना पाहायचे. तिच्याकडून मी बरेच पदार्थ शिकले. आता माझी आत्या मला टिप्स देते. त्याचबरोबर सेटवर सुकन्याताईदेखील टिप्स देते. मी साध्यात साधे प्रश्न तिला विचारते आणि तीसुद्धा मायेने त्याची उकल करते. लगेच मोबाइलवर गूगल करण्यापेक्षा मला हिंडत्या फिरत्या गूगलची मदत घ्यायला आवडते.’
फिरण्याच्या निमित्ताने स्वानंदीचं वेगवेगळय़ा ठिकाणचं स्वादिष्ट खाणं झालं. स्वानंदीने तिच्या जर्मन मैत्रिणीबरोबर जर्मनवारीवर असताना रोड ट्रिप केली. या ट्रिपदरम्यान तिथले लोकल पदार्थच चाखायचे असं तिने ठरवलं होतं. वेगवेगळय़ा पदार्थापासून बनवलेले स्वादिष्ट केक्स, वेगवेगळय़ा प्रकारचे व चवीचे सॉसेज खाण्याची व अभ्यासण्याची संधी जर्मनीत मिळाली, असं तिने सांगितलं. धरमशाला ट्रिपमध्ये तिथल्या टूर गाइडने तिच्या आग्रहावरून तिथल्या लोकल कपलच्या घरी जेवू घातलं होतं. त्यावेळची आठवण ती सांगते, त्या कपलने रानात जाऊन फ्रेश कुसरोड नावाची भाजी तोडून आणली व त्यांनी ती माझ्यासमोर बनवली. ती भाजी बघून कोणाचीही खाण्याची इच्छा मरेल, पण ती भाजी अतिशय स्वादिष्ट होती. नाटकाच्या निमित्ताने झालेले दौरे व तिथल्या शहरांची खासियत असलेले पदार्थ खाण्याची संधीदेखील मी हुकवली नाही. कोकण दौऱ्यात मासे, कोल्हापूर दौऱ्यात तांबडा-पांढरा रस्सा, मराठवाडा दौऱ्यात चिकन खाण्यात सुमित राघवन व उमेश कामतसारख्या दोन फुडी आत्म्यांची मला साथ लाभली होती.’
‘स्वयंपाकघरात मला मनापासून रमायला आवडतं. सकाळपासून रात्रीपर्यंत दैनंदिन जीवनात लागणारे सगळे पदार्थ मी उत्तम बनवू शकते. ही सवय मला माझ्या आजीकडे बघून लागली’, असं स्वानंदी सांगते. आजीच्या स्वयंपाकघरातील गमतीजमतीही तिने उलगडून सांगितल्या. ‘माझ्या शालेय जीवनात दुपारची चारची वेळ ही माझ्यासाठी सुवर्णवेळ असायची, कारण या वेळेत मी शाळा सुटून घरी आलेले असायचे आणि आजीच्या हातचे वेगवेगळे गरमागरम पदार्थ टेबलवर माझी वाट पाहात असायचे. धिरडी आणि लोणी, तांदळाची उकड असे पौष्टिक पदार्थ ती मला खाऊ घालायची. आजीच्या हातच्या पातोळय़ा माझ्या एकदम फेवरेट. तिने मला पुढय़ात घेऊन जेवण बनवायला शिकवलं नाही. पण माझी निरीक्षण शक्ती एकलव्यासारखी होती. तिच्याकडून मी बरंच काही शिकले.’ माझे आजी-आजोबा प्रचंड फुडी होते. जितकं आजी घरचं खाऊ घालायची तितकंच बाहेरच खाण्याचं फ्रीडमही ती द्यायची. इराणी कॅफेतला खिमा, बनमस्का, कडक पावसारखे चमचमीत पदार्थ शाळेत असताना खूप खाल्लेत. त्याचबरोबर जे पदार्थ मला आवडायचे नाहीत ते पदार्थसुद्धा आजी शिताफीने मला खाऊ घालायची. एकदा लहानपणी आजी केळफुलाची भाजी आणि फणसाची भाजी चिरत होती. या दोन्ही भाज्यांचा अंतर्बाह्य अवतार बघूनच माझं त्यांच्यावरचं प्रेम उडालं, पण आजीने मला चिकनच्या नावाखाली ती भाजी खाऊ घातली व मीसुद्धा त्याच मानसिकतेने ती आवडीने खाल्ली, असं स्वानंदी सांगते.
स्वानंदीच्या मते, ‘पाककला ही एक नुसती क्रिया नसून त्यामागे भावनांचे पदर आहेत. जेवण बनवणारी व्यक्ती तिच्यातली ऊर्जा ओतून जेवण बनवत असते. तुम्ही जेवण पेश कसे करत आहात याच्यावर मी अधिक भर देते. मला ताटातले वेगवेगळे रंग आवडतात. त्यांची शिस्तबद्ध ठेवण आवडते, कारण जेव्हा भरल्या पदार्थाचं ताट आपल्या पुढय़ात येतं तेव्हा ते पहिल्यांदा नेत्रसुख देतं. नंतर जिव्हातृप्ती देतं आणि त्यानंतर आत्मतृप्ती मिळते. त्यामुळे पदार्थ उत्तम बनवण्याबरोबरच पदार्थाची मांडणी माझ्यासाठी कायमच महत्त्वाची असते.’ पाककलेत एक शिस्तही असावी, असाही आग्रह स्वानंदी धरते. पदार्थाची चव न घेता केवळ अनुभवातून व कल्पनाशक्तीतून पदार्थ उत्कृष्ट कसा असू शकतो हे मी माझ्या आजीकडून शिकले. तीच शिस्त मी आजीकडून आत्मसात केली. एखादा पदार्थ आवडत नसेल तरी तो थोडासा का होईना चाखून बघायचा, चौरस आहार पोटात गेला पाहिजे ही शिस्त मी माझ्या आजी-आजोबांकडे बघून स्वत:ला लावली, असं ती आवर्जून सांगते.