गर्भावस्था स्त्रीच्या आयुष्यात महत्त्वाचा टप्पा कसा असतो याबाबत आपण चर्चा केली. गर्भावस्थेनंतरची, बाळाच्या एकंदरीत आरोग्याला कारणीभूत ठरणारी, बाळाला पोषण देण्याची पायरी म्हणजे दुग्धस्रवण.
दुग्धस्रवणाची व्याख्या दूधनिर्मितीची प्रक्रिया अशी करण्यात आली आहे. बाळाला मिळणारं पहिलं पोषण असाही दुधाचा उल्लेख केला जातो. स्तनामधल्या चरबीयुक्त ऊतींमध्ये वसणाऱ्या मॅमरी ग्रंथींमुळे दूध येतं. हे दूध अनेक पोषक घटकांनी संपन्न असतं. त्यात सर्व प्रकारची जीवनसत्त्वं आणि खनिजं असतात, जी बाळाच्या वाढीला साहाय्यभूत ठरतात. बाळाला मिळणारं पहिलं पोषण म्हणून आईची दुधाची व्याख्या केली जात असल्याने, सर्व मातांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की बाळाची पोषणाची गरज भरून निघण्यासाठी त्यांनी बाळाला दूध देण्यासाठी नेहमीच सज्ज असलं पाहिजे.
बाळाला दूध पाजण्याच्या क्रियेला ‘स्तनपान’ असं म्हणतात. दुग्धस्रवण आणि स्तनपान हे दोन्ही घटक काही विशिष्ट हार्मोन्सवर अवलंबून असतात. ही हार्मोन्स मॅमरी ग्रंथींमधल्या दुधाच्या निर्मितीमध्ये तसंच स्रवणामध्ये मोलाची कामगिरी बजावतात.
ही हार्मोन्स केवळ दुधाच्या निर्मितीमध्येच नाही तर किती दूध निर्माण व्हावं, यासाठीही निर्णायक ठरतात. ही दोन महत्त्वाची हार्मोन्स म्हणजे ऑक्सिटोसिन आणि प्रोलॅक्टिन. लेट डाऊन रिफ्लेक्समुळे ऑक्सिटोसिनच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याचं अभ्यासातून सिद्ध झालं आहे. दोन महिन्यांचं झाल्यानंतर बाळाला दूध कसं चोखायचं हे माहीत पडतं. बाळाने स्तनाग्रं चोखल्यानंतर मेंदूमधले चेतासंदेश जागृत होतात, जे पुढे पिटय़ुटरी ग्रंथींमधून ऑक्सिटोसिन हे हार्मोन सोडतात. त्यामुळे अलव्हेओलीभोवतालचे स्नायू आकुंचन पावून दूध स्रवतं.
प्रसूतीनंतरच्या पहिल्या काही तासांमध्ये ‘?ोलस्ट्रम’ नावाचा पिवळा, जाड स्राव पाझरतो. हा स्राव पोषक घटक, फॅट्सनी समृद्ध असतो आणि तसंच जंतुसंसर्गापासून बाळाचं संरक्षण होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अ‍ॅण्टिबॉडीजही या स्रावांमध्ये मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे हा स्राव बाळासाठी विशेष असतो, जो काढून फेकता कामा नये.
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आहार महत्त्वाची भूमिका बजावत असतो. गर्भारपणात आहार जितका महत्त्वाचा असतो तितकाच तो दुग्धस्रवणादरम्यानही महत्त्वाचा असतो.
१) पाणी, फळं-भाज्यांचे रस, लस्सी, ताक, शहाळ्याचं पाणी अशा माध्यमांतून शरीरात मुबलक द्रवपदार्थ जाणं आवश्यक असतं. त्यामुळे भरपूर आणि नियमितपणे दुग्धनिर्मिती होते.
२) आहारात ज्वारी, बाजरी, नाचणी यांसारख्या कॉम्प्लेक्स काबरेहायड्रेट्स आणि अख्ख्या धान्यांचा समावेश करावा. त्यामुळे रक्तात हळूहळू शर्करा सोडली जाते.
३) पिवळ्या रंगाची ‘संत्र’ वर्गातली फळं आणि भाज्या खाल्ल्याने केवळ ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्वच मिळत नाही तर शरीरात आढळणाऱ्या घातक फ्री रॅडिकल्सना नियंत्रणात आणण्यासाठी अ‍ॅण्टि-ऑक्सिडण्ट्सही मिळतात.
४) आईचं दूध प्रोटिन्स आणि कॅल्शिअमनी समृद्ध करण्यासाठी गाईचं दूध, पनीर, अंडी, दही, ताक, सुकामेवा आणि तेलबियांचं सेवन महत्त्वाचं आहे.
५) या काळामध्ये लोह अत्यंत महत्त्वाचं असतं. मानवी दुधामध्ये लोहाची कमतरता असते. पण गर्भावस्थेपासून आयर्न सप्लिमेण्ट्स घेऊन योग्य काळजी घेतल्यास या कमतरतेवर मात करता येते.
६) आपल्या आहारातून कॅफिन आणि अल्कोहोल या घटकांना नेहमीच हद्दपार केलं पाहिजे. यामधले घातक घटक रक्तातून आईच्या दुधात प्रवेश करतात आणि पुढे बाळाच्या शरीरात पोहोचतात. हे बाळासाठी हानिकारक ठरू शकतं.
७) आजकालच्या माता आपल्या वाढत्या वजनाबाबत, विशेषत: प्रसूतीनंतर, फारच जागरूक असल्याचं दिसतात. त्यामुळे पूर्वीसारखी फिगर मिळवण्यासाठी एक तर त्या क्रॅश डाएटच्या मागे लागतात किंवा आहार अत्यंत मर्यादित ठेवतात. पण यामुळे बाळाला मिळणाऱ्या पोषणामध्ये त्या बाधा आणतात, हे त्यांना माहीत नसतं. पोषक, लो-फॅट आहाराला दररोज ४५ मिनिटांच्या व्यायामाची जोड द्यावी. व्यायाम ४५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ करू नये आणि तो फार कठीण नसावा. पारंपरिक योगसाधना, पोहणं, चालणं, लाइट जॉिगग, सौम्य अ‍ॅरोबिक्स किंवा पॉवर योगा, असं व्यायामाचं स्वरूप असावं. आणखी एक अनेकांना माहीत नसलेली गोष्ट म्हणजे स्तनपानामुळे मोठय़ा प्रमाणावर चरबी खर्च होते. दुधाच्या निर्मितीसाठी ही चरबी वापरली जाते.
८) शेवटचं पण महत्त्वाचं, दुग्धस्रवणादरम्यान भरपूर दुग्धनिर्मितीसाठी ‘गलॅक्टोगोग्युज’ ही विशिष्ट प्रकारची पाककृती बनवली जाते. त्यापकी काही ‘गलॅक्टोगोग्युज’ पाककृती पुढीलप्रमाणे-
९) मेथीदाणे- मेथीमध्ये फायटोएस्ट्रोजेनिक घटक असतात ज्यामुळे एस्ट्रोजिनची पातळी वाढण्यास चालना मिळते व २४ ते ४८ तास एवढय़ा कमी कालावधीत दूधनिर्मिती वाढते. मेथीदाण्यांचे लाडू बनवून ते खाल्ल्यास दूधनिर्मितीच्या प्रक्रियेला गती मिळते.
१०) जिरं- जिऱ्यामध्ये ‘सायमोल’ हा घटक असतो, ज्यामुळेही दुधाच्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे जिऱ्याचं पाणी प्यावं किंवा प्रत्येक पदार्थामध्ये जिऱ्याचा वापर करावा.
११) दूध आणि दुग्धजन्य पदार्थ- हे नसíगक गलॅक्टोगोग्युज असल्याने त्यांचा आहारात वरचेवर वापर करावा. त्यामध्ये दही, लो-फॅट चीज, ताक, पनीर आदींचा समावेश होतो.
१२) लसूण- लसणामुळे बाळाचं दूध चोखण्याचा वेळ वाढतो आणि त्यामुळे दुधाचं प्रमाणही वाढतं. पण स्तनपान करणाऱ्या आईने दिवसाला लसणाची केवळ एकच पाकळी खावी. त्यापेक्षा जास्त लसूण खाऊ नये.
१३) बडीशेप- बडीशेपमुळे पोटात वायू धरत नाही. बडीशेप खाल्ल्याने आईला व पर्यायाने बाळाला गॅसेसचा त्रास होत नाही. लेट डाऊन रिफ्लेक्स कमी करण्यातही बडीशेप उपयुक्त असल्याने दूधनिर्मिती वाढते.
१४) बार्ली- यामुळे दुधाचं प्रमाण तसंच दुधामधले फॅट्सही वाढतात, असं मानलं जातं.
१५) सुकामेवा आणि ओट्स- दुधाचा पुरवठा वाढवण्यास हे दोन घटकही कारणीभूत ठरतात.
गर्भावस्थेत असताना बाईची सर्वतोपरी काळजी घेतली जाते. परंतु दुग्धस्रवणाच्या वेळेस ही काळजी घेणं हळूहळू कमी होतं, विशेषत: पोषणाबाबत ही उदासीनता दिसते. या कालावधीत पोषणाचं महत्त्व किती आहे, हे आपण आज समजून घेतल्याने स्तनपान देणाऱ्या मातांनी आपल्या आहाराबाबत अधिक सजग बनण्याची गरज आहे. त्यामुळे बाळ शारीरिकदृष्टय़ाच नाही तर मानसिकदृष्टय़ा सुदृढ आणि बुद्धिवान बनेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा