मितेश जोशी
छोटय़ा पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या पसंतीचा उच्चांक गाठला आहे. या कार्यक्रमातील सर्वच विनोदवीर महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचले असून त्यांना त्यांच्या चाहत्यांकडून सतत प्रेम मिळतं आहे. याच फौजफाटय़ातील एक इरसाल फुडी आत्मा म्हणजे प्रसाद खांडेकर. प्रसाद हा मूळचा मुंबईचा असून त्याचं पूर्ण बालपण, शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पश्चिम मुंबईत गेलं. त्याच्या वडिलांची दुधाची डेअरी होती. रोज सकाळी शेकडो लिटर दूध त्यांच्या घरी उतरायचं. सुरुवातीच्या काळात त्याने दुधाची लाइनसुद्धा टाकली. अगदी आता आतापर्यंत कामाला मुलं गैरहजर राहिल्यावरसुद्धा त्यांच्याबदली तो लाइन टाकून आपला चरितार्थ चालवत होता. माझ्या आईला डेअरी प्रॉडक्ट बनवताना मी खूप जवळून पाहिलं आहे आणि एक डेअरी बिझनेस कसा हँडल करायचा, ग्राहकांना कसं जोडून ठेवायचं हे वडिलांकडून मी खूप जवळून शिकलो आहे, असंही तो सांगतो.
प्रसादच्या दिवसाची सुरुवात वाफळत्या शुगर फ्री चहाने होते. त्याला एक मुलगा असून त्याची जी फर्माईश असेल तो नाश्ता त्याच्या घरी बनवला जातो. सर्वसाधारण मराठी कुटुंबात केले जाणारे उपमा, पोहे, डोसे, घावणे, फोडणीचा भात, फोडणीची पोळी असेच नाश्त्याचे प्रकार प्रसादला आवडतात. त्याच्या बायकोला गुजराती पदार्थ उत्तम बनवता येत असल्याने कधी कधी ती खमण, खांडवीसारखे पदार्थही न्याहारीसाठी बनवते. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तील काही हटके स्कीट्समुळे आपल्या लक्षात आलंच आहे की, प्रसाद हा उत्तम लेखक आहे. दिवसभर लेखनात व कामात गुंतल्यामुळे बुद्धीला चालना मिळण्यासाठी प्रसादला सतत काही ना काही तरी खाण्याची किंवा सीसीडीमधील वेगवेगळय़ा प्रकारची कॉफी पिण्याची सवय आहे. दुपारच्या जेवणात दोन पोळय़ा आणि भाजी असा त्याचा आहार असतो. बऱ्याचदा भाजी ही नम्रता संभेरावच्या डब्यातली किंवा सेटवरच्या जेवणातली असते असं तो म्हणतो. संध्याकाळी नाश्त्याला सेटवर काही ना काही तरी चुरुमुरु खाऊन तो त्याची भूक शमवतो. रात्रीचं जेवण मात्र तो घरीच घेतो. जे पुढय़ात येईल ते स्वाहा या तत्त्वावर प्रसादची खाबुगिरी रंगते.
सेटवर खवय्येगिरी कशी रंगते याबद्दल तो सांगतो, ‘सकाळपासून रात्रीपर्यंत आम्ही एकत्र असल्यामुळे सेटवर आम्ही सर्वच जण एकत्र येऊन खवय्येगिरी करतो. नम्रताला माझी आवडनिवड माहिती असल्यामुळे बऱ्याचदा तिच्या डब्यात माझ्या आवडीच्या भाज्या असतात. मी आणि समीर चौघुले सेटवर सर्वासाठी बास्केटभरून सुका खाऊ आणतो. चेतना पुरणपोळय़ा खूप सुंदर बनवते. माझ्या आईच्या हातची कुळीथ पिठी आणि भाताचे चाहते सेटवर आहेत. खरं तर कुळथाची पिठी अनेकांना आवडत नाही; काहींना तर त्याचा वासही नकोसा वाटतो. परंतु काही पिठीप्रेमी असेही आहेत, जे नुसत्या पिठीच्या वासाबरोबरही जेवतील. मी आणि वनिता खरात त्यापैकीच एक. आईच्या हातच्या पिठीसारखी चव घरातील अन्य कुणाच्याच हातच्या पिठीला नाही, त्यामुळे माझी आई स्वत: मोठय़ा प्रमाणात कुळथाची पिठी बनवते. तिने बनवलेली पिठी ज्या दिवशी सेटवर येणार असते त्या दिवशी नम्रता खास इंद्रायणी भात तिच्या घरून बनवून आणते आणि आमची पिठी-भाताची छोटी पार्टी रंगते.’ पिठी संपल्यावर त्याच्या भांडय़ाला जमलेली गोलाकार घट्ट पिठी खायलाही मला प्रचंड आवडतं, असं तो आवर्जून सांगतो. सेटवरच्या खवय्येगिरीचे किस्से इथेच संपत नाहीत. ‘तालमीच्या वेळी पाणीपुरी पार्टीसुद्धा रंगते, कारण सचिन गोस्वामी यांना पाणीपुरी आवडते. पाहुणे कलाकारसुद्धा आम्हाला खाऊ घेऊन येतात. भारती आचरेकर यांनी सेटवर येताना उकडीचे मोदक आणले होते. सोनाली कुलकर्णीसुद्धा वेगवेगळे पदार्थ आणत असते. मोटे कुठेही फिरायला गेले की तिथली खासियत असलेले पदार्थ ते आणतात. साताऱ्याला गेले की कंदी पेढे सेटवर येतात. पुण्याला गेले की सगळय़ांना भाकरवडी अध्येमध्ये खायला मिळते’ अशा प्रकारे खाबुगिरी सेटवर चालूच असते असं तो सांगतो.
प्रसादला पाणीपुरी खायला प्रचंड आवडतं. त्याच्या या हळव्या प्रेमाविषयी तो म्हणतो, ‘मी कधीही, कुठेही, केव्हाही, कोणत्याही अवतारात आणि कितीही पाणीपुरी खाऊ शकतो. काही पदार्थ घरीच खावे या वर्गातले असतात, तसे काही पदार्थ बाहेरच खावेत या वर्गातले असतात आणि या वर्गात पाणीपुरी मोडते. माझं पाणीपुरीचं आख्यान सांगायला मी सासुरवाडीच्या किश्शापासून सुरुवात करतो. माझी सासुरवाडी विरारची. तिथे स्टेशनच्या बाहेर वेगवेगळय़ा फ्लेव्हर्सचं पाणी वापरून पाणीपुरी विकायची टूम निघाली आहे. चिनीमातीच्या बरण्यांत पाणी ठेवलं जातं. प्रत्येक बरणीच्या दर्शनी भागावर पुदिना, लसूण, जिरा, हाजमोला आणि रेग्युलर अशी नावं ठळक रंगात लिहिलेली असतात. बरण्यांच्या मागे एका भांडय़ात भिजवलेली खारी बुंदी आणि पाणीपुरीच्या पुऱ्या असा सरंजाम असतो. प्रत्येक फ्लेवरची एक पाणीपुरी खाऊन शेवटची पाणीपुरी आवडेल त्या फ्लेवरची खायला परवानगी असते. आणि विशेष म्हणजे इथे पळी न वापरता खोलगट बुडाचा डाव म्हणजे ओगराळं वापरलं जातं. ओगराळय़ाच्या बुडाशी भोक असतं. त्या भोकातून पडणारं पाणी तो पुरीवाला पुरीत सोडतो. स्वच्छतेच्या विचित्र कल्पना उराशी बाळगून पाणीपुरी खायला येणाऱ्यांसाठीची ही नामी शक्कल आहे, जी मला प्रचंड आवडली. पाणीपुरीचे सगळे फ्लेवर्स खाताना चेहऱ्यावर वेगवेगळे भाव उमटतात. काही फ्लेवर्स अंगावर झिणझिण्या आणतात. चिनीमातीच्या त्या बरण्यांबघून नॉस्टॅल्जिक व्हायला होतं, असं सांगताना तो लहानपणीच्या आठवणींशी जोडून घेतो. ‘लहानपणी मी अनेक घरांमध्ये चिनीमातीच्या या बरण्या बघितल्या आहेत. झाकणाच्या टोकाला पिवळसर रंगाच्या आणि त्याखाली पूर्ण पांढऱ्या अशा या बरण्यांमध्ये त्यावेळच्या सगळय़ाच आज्ज्या लोणचं, मुरंबा, वाळवलेले पापड, मिरगुंडं, कुरडया वगैरे गोष्टी भरून ठेवत. लाकडाच्या मांडणीत अगदी वरच्या किंवा अगदी खालच्या फळीवर ठेवलेल्या या बरण्या आनंदाचं निधान होत्या,’ असं त्याने सांगितलं.
मुळात पाणीपुरी ही ‘यूपी’वाली आहे, कारण दक्षिण बिहारमध्ये, मगध प्रांतात पाणीपुरीचा शोध लागला असावा असा अंदाज आहे. मोगल काळातील राजेरजवाडे, सरदार यांना तिखट, झणझणीत खाण्याचा असलेला शौक पाहता अगदी आताच्या रूपात नाही पण वेगळय़ा रूपात पाणीपुरी अस्तित्वात असावी असा काहीसा अंदाज आहे. प्रसाद पुढे सांगतो, ‘भारताच्या विविध प्रांतांत पाणीपुरीचे नाममाहात्म्य विलक्षण आहे. कुठे ती पुचका आहे, कुठे फुलकी, कुठे पानी के बताशे म्हणून लोकांना ती रिझवते, तर कुठे गोलगप्पा म्हणून. गुजरातच्या काही भागांत ती पकोडी (पकोडा नव्हे) आहे, तर काही अन्य ठिकाणी गपचप. पाणीपुरी खाणं ही एक साधना आहे. एक तर पाणीपुरीवाल्याकडच्या गर्दीतून वाट काढत स्वत:ची वाटी किंवा डिश घेऊन नेमकी जागा हेरता आली पाहिजे. त्यानंतर आपण एक-दोन जणंच असू तर पाणीपुरीवाल्या भय्याच्या वेगाशी स्पर्धा करत तोंडातली पुरी संपवत नव्या पुरीला ये म्हणायची कला अवगत करावी लागते. बरेच जण असतील तर इतरांच्या हलत्या तोंडाकडे पाहात, मेरा नंबर कब आयेगा, हा पेशन्स दाखवावा लागतो. पाणीपुरी ही सगळय़ांना समान पातळीवर यायला लावणारी रुलब्रेकर आहे. माझ्यासाठी पाणीपुरी ही जिवाभावाची मैत्रीण आहे.’
आम्ही अमेरिकेतही पाणीपुरी खाल्ली होती अशी सुरुवात करत त्याने अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यानची खाबुगिरीची आठवण सांगितली. ‘आम्ही ‘कुर्र्र्र’ या नाटकाच्या दौऱ्याच्या निमित्ताने अमेरिकेला गेलो होतो. तिथे आम्हाला सगळय़ा चाहत्यांनी मराठी पारंपरिक जेवण म्हणजे अगदी गोड वरण-भातापासून भरल्या वांग्यापर्यंतचे पदार्थ खाऊ घातले. तिथे आम्ही ‘विष्णू जी की रसोई’मध्येही गेलो. योगायोगाने विष्णूजी तिथे स्वत: हजर असल्याने त्यांच्याबरोबर अमेरिकेत खाबुगिरी करण्याचा योग आला. तिथेही मला पाणीपुरीची आठवण आली तेव्हा चक्क अमेरिकेतसुद्धा मी पाणीपुरी रस्त्याच्या कडेला खाल्ली होती. काही चाहत्यांनी घरी बनवली होती. कॅलिफोर्नियाला गेल्यावर मात्र आम्हाला तिथले लोकल कुझिन खाण्याची इच्छा झाली. भारतीय पदार्थ खाऊन अक्षरश: कंटाळा आला. ती इच्छाही आमच्या चाहत्यांनीच इटालियन जेवण घरी बनवून पूर्ण केली. अमेरिकेत खूप सुंदर कॉफी शॉप आहेत. पहिल्याच दिवशी मी पेट्रोल पंपावर कॉफी घेतली, ती मला प्रचंड आवडली. तेव्हापासून दीड महिना मी त्या पेट्रोल पंपावरच्याच शॉपमध्येच कॉफी पीत होतो,’ अशा आठवणी प्रसादने सांगितल्या.
प्रसादच्या दृष्टीने खाणं म्हणजे जिवाची मज्जा! प्रशांत दामलेंच्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकात त्यांचं एक खूप विनोदी वाक्य आहे, मला दीक्षित डाएटनुसार ५५ मिनिटांत खाता येत नाही. मला दर ५५ मिनिटांनी खायला लागतं. याच तत्त्वानुसार प्रसाद आपल्या खवय्येगिरीत मनापासून रमतो.
मला दर ५५ मिनिटांनी खायला लागतं, असं म्हणत स्वत:तील फुडी आत्मा जागृत ठेवणारा विनोदी अभिनेता, लेखक प्रसाद खांडेकर सांगतोय त्याच्या खाद्यकथा आजच्या फुडी आत्मामध्ये!