माझं वय १७ र्वष असून माझी उंची ४.९ फूट आहे. मी बारीक आहे. माझं वजन ३८ किलो आहे. मला फॉर्मल ड्रेसिंग आवडतं. मी कशा प्रकारचे कपडे वापरले पाहिजेत?
– सुनैना
प्रिय सुनैना,
तू वय सांगितलं आहेस त्यावरून तू सध्या ज्युनिअर कॉलेजला असणार. खरं तर कॉलेज वेअर स्टायलिश असायला हरकत नाही. कारण आयुष्यात हाच काळ असतो, जेव्हा तुम्हाला मनसोक्त फॅशन करता येते. याच वयात वेगवेगळ्या, अगदी कोणत्याही फॅशनचे प्रयोग तुम्ही करू शकता. कॉलेजच्या दिवसात तुम्ही वेगवेगळ्या रंगसंगती ट्राय करू शकता, वेगवेगळ्या प्रिंट्स, डिझाइन्स, वेगळे सिलोएट्स आणि कट्स तुम्ही ट्राय करू शकता. एकदा नोकरी सुरू झाली की मग फॉर्मल आणि सेमी फॉर्मलला पर्याय नसतो. पण असो.. तुला फॉर्मल लूक आवडत असेल तर त्यातही अनेक प्रयोग करता येतील. फॉर्मल लूक काही ट्रेंडी एलिमेंट्सशी कंबाईन करून वेगळा मिक्स लूक मिळू शकेल. तुला शर्ट घालायचा असेल तर छानशा जीन्सवर तो घालता येईल. शर्टसाठी काही बोल्ड प्रिंट्स आणि गडद रंग तू वापरू शकतेस.
जॉर्जेटचे शर्ट सध्या ट्रेंडमध्ये आहेत. जॉर्जेटचं कापड पारदर्शक असतं. त्यामुळे आत सेम कलरची स्पगेटी घालून तू शर्ट वापरू शकतेस. कॉलरवाली कॉटनची कुर्ती आणि जीन्ससुद्धा स्मार्ट फॉर्मल लूक देऊ शकेल. तू चुणीदार-कुर्ता घालणार असलीस तर स्मार्ट कट असलेला प्लेन कापडाचा वापर. त्यावर एखादा बोल्ड नेकपीस किंवा फक्त डँगलर्स (लांब लोंबते कानातले) घालूनसुद्धा हा लूक पूर्ण होऊ शकतो. प्लेन ड्रेस असल्याने तो फॉर्मल वाटेल. एक लक्षात ठेव. मिक्स अँड मॅचचा फॉम्र्युला वापरलास तर फॉर्मल तरीही ट्रेंडी लूक येऊ शकेल. वेगवेगळ्या स्टाइल्स एकत्र करून स्वत:चं वेगळेपण जप.
तुमचे प्रश्न पाठवा
तुमच्या फॅशनविषयीच्या शंका आमच्याकडे पाठवा. फॅशन स्टायलिस्ट मृण्मयी मंगेशकर त्यांना या सदरातून उत्तर देतील. सब्जेक्टलाईनमध्ये फॅशन पॅशन लिहायला विसरू नका. आमचा आयडी- viva.loksatta@gmail.com