हल्ली एक मुलगी आणि मुलगा एकमेकांचे घट्ट मित्र असू शकतात.  ते दोघं एकमेकांना सगळं.. अगदी सगळं सांगतात. पण तरीही ते नातं मैत्रीचंच असतं. नेहमीच्या अर्थानं ते ‘कपल’ नसतात. अशाच दोघांची एक गोष्ट, कुठेही आसपास सापडू शकेल अशी..
कट्टय़ावरची गर्दी हळूहळू ओसरू लागलीय.. ऊन पाठीवरनं जायला लागलंय.. कॉलेज संपून तसा दीडेक तास केव्हाच उलटून गेलाय.. अगदी समोरच्या सँडविचवाल्यानंसुद्धा पॅकअप केलंय.. पण ती दोघं अजूनही तशीच त्या कट्टय़ावर बसलेली.. एकमेकांच्या सहवासात अलिप्तपणे.. आजूबाजूची भंकस, हसणं, खिदळणं, बिनधास्तपणे शिव्या फेकणं.. या साऱ्याचाच आजचा ‘शो’ संपलाय.. फरक फक्त एवढाच, की रोजच्या ‘शो’मध्ये ‘लीड रोल’ करणारे ते दोघं आज कुणाशी एक शब्दही न बोलता तसेच बसलेयत..
खरं तर तिच्या न बोलण्याचं कारण अगदी स्पष्टय.. आणि खरं तर ऑबव्हिअस आहे.. ‘त्याच्या’कडून मिळालेला नकार.. ते खरं तर एक्स्पेक्टेड होता तिला.. पण तरीही, पाच टक्क्यांच्या आशेवर राहिलेली ती.. शेवटी आलीय या तिच्या वेडय़ा आर्टस्टि मित्राकडे.. आणि मग त्याचंही तिच्या त्या शांततेत न जमणारं मौन धारण करून बसणं.. शेवटी राहवलंच नाही त्याला.. आणि मग बराच वेळ साठवलेलं वाक्य तो बोलला, ‘‘तरी मी म्हटलं होतं तुला, डोन्ट ब्रेक युअर फॅन्टसिझ विथ राँग अ‍ॅक्शन्स इन रिअल वर्ल्ड..!!!’’ पण आज त्याच्या या शब्दाचंही तिला काही म्हणजे काहीच वाटत नव्हतं.. तिला गरज होती ती थोडी इमोशन्सची.. जे तिला त्याच्याकडून अगदी सहज मिळणारं होतं.
खरं तर तिची प्रत्येक गोष्ट त्याच्याशी शेअर करणं हे ठरलेलंच असायचं.. तिच्या बाबतीतली एखादी गोष्ट त्याला माहीत नाही, आणि त्याच्या बाबतीतली एखादी गोष्ट तिला माहीत नाही, म्हणजे कॉलेजच्या कट्टय़ावर सँडविचवाल्यानं अ‍ॅब्सेंट राहण्यासारखं होतं.. इतर मुला-मुलींना वाटणारा ‘जेंडर डिफरन्स’ त्या दोघांनीही पहिल्याच भेटीत हद्दपार केलेला.. तेही समोरून येणाऱ्या मुलींकडे बघत ‘सुसंवाद’ करून..
तिच्या इमोशनल इम्बॅलन्सच्या कारणांपासून ते फिजिकल आणि बायोलॉजिकल स्टेटपर्यंतची आणि तिला त्याच्या अफेअरपासून ते सेक्सबद्दल असणाऱ्या ओपिनिअन्सबद्दलची इत्थंभूत माहिती. त्यांच्या आजूबाजूच्या सगळ्यांनाच त्यांच्या या अगदीच मोकळ्याढाकळ्या, फॉरवर्ड रिलेशनबद्दल माहिती होती. त्यामुळंच ही दोघं एकमेकांशी कधीही, काहीही आणि केवढंही शेअर करू शकतात याची कल्पना कॉलेजमधल्या सगळ्यांनाच होती.
खरं तर तिच्या बाजूनं ‘त्याला’ सारं काही सांगणं म्हणजे एक ‘कम्फर्ट झोन’ होता.. त्यामुळेच की काय, पण एखाद्या दिवशी तिचं छोटय़ाशा गोष्टीवरचं रडणं बघून, ‘तू अगदी रडीच आहेस..’ असं तो म्हणायचाय तेव्हा वैतागून ती त्याला ‘तुला कळत कसं नाही रे ? माझे पीरियड्स सुरू आहेत..’ हे तितक्याच फ्रीली सांगायची. हे असं काही त्याला आणि फक्त त्यालाच सांगणं तिला जमायचं.. तिच्या अँगलनं त्यांच्या नात्यात एक मोकळेपणा होता तरीही तो ‘प्युरिफाइड’ मोकळेपणा होता.. जो तिला कायम हवाहवासा वाटत आलेला..
अन् त्याच्या बाजूनं.. ‘तिला’ सारं काही सांगणं ही त्याची इमोशनल गरज होती.. ‘मुलंही खूप इमोशनल असतात, पण हे फार थोडय़ाच लोकांना कळतं’.. असं अगदी पहिल्या एक-दोन भेटीतच त्याचं तिला सांगणं.. शाळेत बायोलॉजीच्या टीचरला न विचारता आलेले प्रश्नही त्याने अगदी स्पष्टपणे तिला आणि फक्त तिलाच विचारून टाकलेले.. आणि तिनेही, ‘कावळा शिवणं म्हणजे काय वगैरे गोष्टींचं डिटेल्ड एक्स्प्लेनेशन त्याला दिलेलं.. त्याच्यासाठी ‘ती’ म्हणजे एक इनफॉम्रेटिव्ह सोर्स तर होताच, पण त्याही पल्याड जाऊन स्वत:ची इमोशनल नीड सॅटिस्फाय करणारा फॅक्टर होता..
सामाजिक बंधनांना विसरून ‘सेक्स’ या विषयांवर तासन्तास रंगलेल्या त्यांच्या चर्चा, त्यात दोन्ही जेंडरच्या अतृप्त इच्छा आणि गरजा, स्पेशली या टीनएजमध्ये अपोझिट जेंडरबद्दल वाटणारं आणि वाढत जाणारं फिजिकल अट्रॅक्शन आणि इनफॅच्युएशन, या साऱ्या साऱ्या टॉपिक्सवर त्यांनी एकमेकांसोबत मारलेल्या गप्पा, केलेले सुसंवाद आणि प्रसंगी केलेली भांडणही त्यांच्या रिलेशनला एका वेगळ्याच कम्फर्ट झोनमध्ये नेत होती..
आणि म्हणूनच आजचा तिच्यासाठीचा हा ‘कठीण’ प्रसंगाचा क्षणही तिनं त्याच्याचसोबत घालवलेला होता.. त्याच्या खांद्यावर डोकं टेकवून, त्याला हग करून.. खरं तर येणारे-जाणारे लोक त्यांच्याकडे ‘अ‍ॅज अ कपल’ म्हणून पाहत होते.. पण त्या दोघांच्यातही घडलेले ‘बोल्ड’ संवाद ऐकण्याऱ्यांची मात्र दांडी उडत होती.  ‘इट्स टाइम टू चेंज युअर अँगल ऑफ परसेप्शन..!!!’

Story img Loader