इंग्लिशमधे ‘फ्रेंड’च्या किती पायऱ्या आहेत नाही? अॅक्वेन्टन्स, कलीग, फास्ट फ्रेंड, बेस्ट फ्रेंड, डिस्टंट फ्रेंड.. गंमत वाटते. मला नाही असं मोजता येत. कारण, फ्रेंड इज अ फ्रेंड.
पेपरांमध्ये ‘फ्रेंडशिप डे’बद्दल वाचून मला फार गंमत वाटली. मी कधीच कुणाला ‘हॅप्पी फ्रेंडशिप डे’ असं म्हटलेलं नाही. म्हणजे तत्त्व वगैरे असं काही नाही. पण जे जवळचे मित्र आहेत, त्यांना अचानक कुठला तरी दिवस आहे म्हणून हॅप्पी हॅप्पी म्हणावंसं वाटत नाही. त्यांच्या आयुष्यात त्यांचं काय चाललंय हे आपल्याला माहिती असतं. त्यात आपला कमी-जास्त सहभाग असतो. आणि मैत्री नेहमी परोपकारी वृत्तीनं केली जाते असं नाही. आपले स्नेहीसुद्धा आपल्या जगण्यात किती ‘व्हॅल्यू अॅड’ करत असतात. आपल्या जगण्याचं कारण असतात. माझ्या घरातली माणसं फ्रेंडशिपच्या प्रमेयांपलीकडे माझ्या सोबत होती, आहेत. त्याशिवाय भेटत गेलेली नवी माणसंही लळा लावतातच की. आपण मित्र होतो म्हणजे काय? मला तर वाटतं आपण स्वत:ला, काही अंशी समोरच्या माणसात पाहतो.
तीन वर्षांपूर्वी हा मित्र माझ्या आयुष्यात आला. एका सिनेमाच्या निमित्तानं. शूटिंगसाठी आम्ही एकत्र प्रवास केला. तर मी धसकाच घेतला त्याचा. बोलघेवडा गुणिले बहात्तर! एअरपोर्टवर चेक-इनच्या वेळेपासून जे त्यानी अखंड बोलायला सुरुवात केली. फ्लाईटवरही, मी डोळे मिटल्यावर, झोप लागली का तुला. असं म्हणत बडबडत राहिला. विमान उतरल्यानंतर लोकेशनच्या गावाला जायला दोन-अडीच तास लागले. हुश्श करून गाडीतून उतरताना मी त्याला म्हटलं, ‘आता पुढचे दहा दिवसच काय, दहा र्वष तू माझ्याशी बोलला नाहीस तरी चालेल- इतकं आयुष्यभराचं बडबडून घेतलं आहेस. वेडा आहेस का तू?’
पण वेडाच आहे तो. त्याला सतत काहीतरी निर्णय घ्यायचं प्रेशर असतं. कशाला तरी हो किंवा नाही म्हणायचं असतं. तो मला त्रास असा देत नाही. पण कधी त्याचा सल्ला विचारायला फोन आला, तर मला खूप आनंद होतो. मी त्याला हिरीरीनं पर्याय सुचवते. जणू काही मीच त्याला मार्ग दाखवला असावा- असं तो मला थँक यू आणि सॉरी टू बॉदर यू-वगैरे म्हणतो. शिवाय आभारप्रदर्शन म्हणून अप्रतिम तुफान विनोदी मेसेज पाठवतो.  त्यावर स्थळकाळाचं भान सोडून मी वेडय़ासारखी हसत बसते. माझ्या ह्य़ा मित्राला ‘क्लॅरिटी नसणं’ -मला खूप छान वाटतं. माझी परिस्थिती जरा बरी आहे असा मला फील येतो. तसंच इतकं मोठं झाल्यावरही गोंधळलेलं असण्याची त्याची स्टेज मला खूप हवीहवीशी वाटते. मी कधीच असं असण्याची मोकळीक घेऊ धजले नाही. कारण मोकळीक घेतलीच चुकून, तर त्याची जबर शिक्षा भोगावी लागली होती. तो आनंदानं कन्फ्युज्ड असतो. वाटही तोच काढतो.
मला बाळ झालं तेव्हा ह्य़ा नव्या मित्रानी आणि त्याच्या बायकोनी माझ्या घरी सुंदर फुलं आणि मोठ्ठा केक पाठवला. ओल्या बाळंतिणीच्या घरात असे हारतुरे पाठवावे का, ती हा विकतचा केक खाईल का. असं काऽऽही त्यांच्या मनात आलं नाही. पण तेव्हापासून, अजिबात न आवडणाऱ्या-चॉकलेट केककडे मी खूप प्रेमानी आणि हसून पाहते. अडीअडचणीत काही लागलं, तर हाक पोचायच्या आधी, हा माझा मॅड मित्र- आपण कल्पनाही करू शकणार नाही अशी रसद घेऊन धाऊन येईल ह्य़ाची मला खात्री आहे.
दुसरी- माझी एक इटालिअन मैत्रिण. आमची ओळख झाली, तेव्हा मी एकवीस वर्षांची होते आणि ती पंधरा. माझ्या प्रोडय़ुसरची मुलगी. एव्हाना आम्ही दोन सिनेमांच्या शूटिंगचा काळ विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, एकमेकांचे देश पाहणं, घरी राहणं अशा प्रमुख गोष्टी, शिवाय स्वैपाक, लेखन, चित्रं, वेण्या घालणं, व्यायाम करणं अशा छंदाच्या कितीतरी गोष्टी मिळून केल्या आहेत. मला आजपर्यंत भेटलेल्या जन्मजात सुंदर मुलींपैकी एक. तिला पाहिल्यावर डौलदार राजहंसाची आठवण येते. आमची मैत्री पाहून, तिचे आईवडील माझ्यामार्फत तिच्या मनाचा थांग घ्यायचे.
तिला रात्री झोपच यायची नाही. मूडी आणि गप्प राहणं अतिप्रिय. टीनएजर असल्यामुळे असेल कदाचित, पण तासन्तास दु:खी राहणं तिला आवडायचं. जरा कुणी आवाज चढवला तर डोळ्यातून मोती झरायला लागणार. हिचं पुढे काय होणार असं जवळच्या सगळ्यांना वाटायचं. प्रत्येकानं तिला सुचेल त्या ठिकाणी चिकटवून पाहिलं. सुंदर दिसण्यामुळे मॉडेलिंग आणि अॅक्टिंग हे प्राथमिक प्रयत्न झाले. नंतर मग शिक्षण म्हणू नका, राजकारण, खेळ, समाज सर्व बाबतीत तिचं बौद्धिक घेऊन झालं. ती अजून कोषात जात राहिली. कुणाला टाळायचं असेल तर ती पाण्यात डुबकी मारायची. कितीही वेळ पोहू शकायची. समुद्रात गेली तर तिला वेळेचं भानच रहायचं नाही. कधी तिच्या खोलीत डोकावलं, तर चारकोल घेऊन काहीतरी रेखाटत असायची.
तिनी जगभर स्वत:ला शोधलं. लंडन, अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, भारतात..पण. अखेर तिची तिला सापडली ती – कोऱ्या कॅनव्हासवर. आज तिच्या सोलो प्रदर्शनाची जगात अनेक ठिकाणी मागणी असते. गेल्या दहा वर्षांत माझ्या शांत, लाजाळू आणि प्रेमळ मैत्रिणीचं मन आणि सोशल सर्कल चांगलंच विस्तारलंय. तिनी जगभरातले मित्र जोडले. अशा ह्य़ा सुंदर राजकन्येचं लग्न ठरलं, तेव्हा रोममध्ये घडणाऱ्या ह्य़ा शाही समारंभात, करवली म्हणून मीच भारतातून यायला पाहिजे-असा हट्ट धरून बसली ती. आमंत्रणासाठी तिनं पाठवलेली मेल वाचून माझ्या डोळ्यात पाणीच आलं. आणि हातातली सगळी कामं सोडून तत्क्षणी रोमची वाट धरावी असं आतुर झालं मन.
कसंना. जगाच्या पाठीवर कुठेतरी आपल्याला आपलं माणूस सापडतं. प्रत्येक वेळी आपण एकमेकांसारखे असतो असं नाही, पण आपल्यातलं काहीतरी पूर्ण करणारे हे ग्रह-तारे अंतराळात कितीही जवळ/दूर असोत. आपल्या हृदयाच्या कक्षेत फिरत असतात. तुमच्यातलेही कितीतरी जण आहेत असे माझ्यासाठी. तर माझ्यासाठी असं व्यक्त/अव्यक्त असल्याबद्दल, आभारापेक्षाही जास्त, माझं किंचित गोंधळलेलं-खूप प्रेम .

Story img Loader