नवीन माणसांशी स्वत:हून ओळख करून घेणं, मैत्री करणं वाटतं तेवढं सोपं नसतं. पण मैत्री नाही तर कॉलेज लाइफ नाही. म्हणूनच नवीन माणसांशी मैत्री करण्याच्या, जुळवून घेण्याच्या काही टिप्स, उमलत्या तरुणाईसाठी :
१. ओळख करून घेण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे शेकहँड! पहिल्या दिवशी आपल्या बेंचमेटकडे मैत्रीचा हात पुढे करा. समोरची व्यक्ती नक्की प्रतिसाद देईल.
२. मैत्री होण्यासाठी समोरची व्यक्ती आपल्याला आवडणं गरजेचं असतं तसंच त्या व्यक्तीलाही आपण आवडणं गरजेचं असतं. त्यामुळे चेहऱ्यावर सुंदर आणि साधं स्माइल ठेवा. चेहऱ्यावर बावरल्यासारखे अथवा गोंधळल्यासारखे भाव असू देऊ नका.
३. मैत्रीचा अविभाज्य भाग असतो शेअरिंग! त्यामुळे एखाद्या वस्तूच्या शेअरिंगने सुरुवात करा. टिफीन शेअरिंग हा सगळ्यात उत्तम पर्याय ठरेल. उर्वरित पान ३ वर
४. पहिल्याच भेटीत शक्यतो कोणाचे मार्क्स विचारू नका. मार्क्स कमी असतील तर समोरची व्यक्तीअवघडेल आणि तुम्हीही!
५. नवीन माणसं आजूबाजूला असताना फोनवर शक्य तितक्या हळू आवाजात बोला. हे सार्वजनिक ठिकाणी वागण्याच्या चांगल्या पद्धतीचं अर्थात ‘गुड मॅनर्स’चं लक्षण समजलं जातं.
६. मुलीमुलींची किंवा मुलामुलांची पटकन मैत्री होते. मात्र मुलामुलींनी एकमेकांशी ओळख करून घेताना थेट फोन नंबर मागू नका. त्याने ‘फ्लर्ट’ अशी प्रतिमा निर्माण होण्याची शक्यता असते.
७. काही कॉलेजेसमध्ये इन-हाऊस अॅडमिशन घेतलेल्या मित्र-मैत्रिणींचे आधीपासूनचे ग्रुप्स असतात. अशा वेळी भांबावून न जाता शक्य तितक्या शांतपणे आणि आनंदी चेहऱ्याने ओळखी करून घ्या.
८. कॉलेजची ‘फ्रेशर्स पार्टी’ ही नवीन मैत्री होण्यासाठी सुवर्णसंधी असते. ती पार्टी चुकवू नका.
९. दोन-तीन वेळा भेटल्यानंतर एखाद्या मित्र-मैत्रिणीच्या मोबाइल, बॅग, कपडे यांपैकी आवडलेल्या गोष्टीचं कौतुक करा.
१०. गॅजेट्स, बाइक, इंग्लिश मूव्हीज या विषयांवर मुलं पटकन एकत्र येतात तर शॉपिंग, ड्रेस, कॉस्मेटिक्स, अॅक्सेसरीज इत्यादी गोष्टींबद्दल बोलताना मुली सहज एकत्र येतात, हे लक्षात असू द्य.
११. शेवटचं पण महत्त्वाचं, कोणी स्वत:हून मैत्रीचा हात पुढे केला तर जरूर प्रतिसाद द्या. भाषेवरून अथवा कपडय़ांवरून समोरच्या माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचे आडाखे बांधू नका.
या सगळ्या मैत्रीची केवळ सुरुवात करण्यासाठीच्या काही टिप्स आहेत. मात्र घट्ट आणि निखळ मैत्रीसाठी या ‘फर्स्ट इम्प्रेशन’वर अवलंबून राहू नका. अशी मैत्री होणं हे केवळ तुमच्या इच्छाशक्तीवर आणि सगळ्यांना सांभाळून घेण्यावर अवलंबून आहे. हा तर फक्त मैत्रीचा ‘श्रीगणेशा’!
वेदवती चिपळूणकर -viva.loksatta@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा