पहिली नजरानजर, चिडवाचिडवी, त्यानंतर मैत्री आणि मग प्रेमाच्या आणाभाका घेतल्या जातात.. त्याच जागी पहिली ब्रेक-अपची ठिणगीही पडलेली असते. ती जागा म्हणजे कट्टा. या कट्टय़ावरच्या प्रेमाच्या गोष्टी कट्टे की जबानी! प्रेमाच्या महिन्यात सुरू झालेल्या या शॉर्ट आणि स्वीट चारअंकी लेखमालिकेचा भाग तिसरा.

कट्टय़ावरचे काही मित्र-मैत्रिणी सध्या रिलेशनशिपमधल्या रोलर कोस्टरमधून जात होते. अनिकेत ऊर्फ अन्या रिद्धीबरोबर सेटिंगलावण्याच्या मागे. तिच्यामागे धुंद. अनिकेत एका बाजूला  तर त्याच्याकडे दुरूनच प्रेम करणारी आणि त्याच्याकडून प्रत्युत्तराची, प्रतिक्रियेचीही अपेक्षा न ठेवमारी अनन्या दुसरीकडे. या तिढय़ाची गोष्ट.

गेल्या आठवडय़ात अनन्याचा उल्लेख झाला होता ना! अनन्या अशी का बघत होती अनिकेत ऊर्फ अन्याकडे? अनन्या कोण, अन्याच्या फुलटॉसवर रिद्धीची विकेट पडली का.. की अन्याच गारद झाला वगैरे प्रश्न पडले असतील ना.. पण सीरिअल्स ते वेगवेगळे ट्रॅक कसे एकाच वेळी सुरू असतात.. तशी मी की कट्टेकऱ्यांची गोष्ट सांगणारे. तर अनन्याचं सांगण्यापूर्वी त्या दिवशीच्या कॉन्सर्टला काय झालं ते सांगतो.

अखेर कॉन्सर्टचा दिवस उजाडला. म्हणजे १३ फेब्रुवारी. व्ही डेचा आदला दिवस. आज अनिकेत आणि रिद्धी कॉन्सर्टला जाणार होते. दोघंही टकाटक आवरून इथे माझ्यापाशी भेटले. नंतर एकत्र कॉन्सर्टला गेले. दोघांनीही कॉन्सर्ट खूप एन्जॉय केली. पहिल्यांदाच ही कॉन्सर्टला जाण्याची वेळ.. दोघांचीही. म्हणजे रिद्धी उत्तम गाते तरीही यापूर्वी तीही कधी कॉन्सर्टला गेली नव्हती. कॉन्सर्ट संपली.. तिथलं ते उत्कट वातावरण अन्याच्या आत झिरपत गेलं. रात्री परतताना अन्याच्या मनात नेमकं काय घडत असावं हे मी अद्याप ताडू शकलेलो नाही. या प्रश्नाचं उत्तर मी कधीचच अधीरतेने शोधतोय. रादर, अशी वेगळी झिंग चढलेला कन्फेशनच्या आधीचा क्षण नेमका कसा असतो ते मी कुठल्याच दोस्ताच्या बाबतीत ठामपणे सांगू शकत नाही.. कदाचित या अव्यक्ताला केवळ एक अनाम गंधच असतो शब्द नसतात! आणि अन्या मनातल्या मनात चाचपडत त्या वाक्यापाशी पोहोचला, ‘रिद्धी, मला तू खूप आवडतेस.’

हे शब्द म्हटलं तर कॉन्शिअसली.. म्हटलं तर नकळत बाहेर पडले. हे असं आपण धडकन काय बोललो हे त्याचं त्यालाच लक्षात यायला काही क्षण गेले.. लक्षात आलं तेव्हा फक्त धडधड जाणवत राहिली. नंतरची काही मिनिटं नकोशा शांततेत गेली. नंतर शांतपणे रिद्धीच म्हणाली, ‘वेल.. सी, आय रिस्पेक्ट युवर फिलिंग्स.. बट आय डोंट फील फॉर यू इन द सेम वे. (इथे मोठा पॉज.) बट यू आर अ वंडरफुल फ्रेंड. त्यामुळे हे हार्टब्रेक वगैरे काही समजू नकोस. प्लीज टेक केअर.’ अन्या वेडय़ासारखा तिच्याकडे नुसता बघत राहिला. ती गोंधळून गेली. मग आजूबाजूला उगीच पाहत राहिली. आताच आपल्याला नकार आलाय ही गोष्ट वास्तवातून मनापाशी पोहोचायला थोडा वेळ लागणारच होता. न बोलता दोघेही चालत राहिले. रिद्धीचे शब्द त्याच्या कानात तसेच घुमत राहिले. त्याला आपण मूर्ख आहोत.. उगीच विचारलं हिला असं आतून वाटत राहिलं. रिजेक्शनचा हा असा मुक्कामार त्याला अगदीच नवा होता. दोघंही एकमेकांशी एकही शब्द न बोलता चालू लागले. घरी आल्यावर अन्याला थकल्यासारखं वाटत राहिलं. घरात कुणाशीही फार काही न बोलता, न जेवताच तो झोपून गेला आणि रात्री बारा वाजता अनन्याचं ते पत्र व्हॉटसअ‍ॅपवर येऊन धडकलं.. सकाळ व्हायची वाट पाहत राहिलं.

प्रिय,

मी तुला हे सगळं तेही या अशा प्रकारे सांगण्याचा प्रयत्न का करतेय मला कळत नाही. पण थांब, इतका मोठा मेसेज पाहून नेहमीसारखा वाचायचा कंटाळा नको. मी तुला पाठवलेला आयुष्यातला हा पहिला मेसेज. तुझ्या भाषेत हा एवढा मोठा मेसेज म्हणजे निबंधच. तुला किती तरी वेळा मोठमोठाले फॉर्वड्स न वाचताच इग्नोर करून सोडून दिलेले पाहिलेत मी. आणि ते फॉर्वर्ड्स पाठवणाऱ्यांवरचं वैतागणंही. पण थांब! हा तसला फॉर्वर्ड नाहीये आणि उगीच उदाहरण देऊन पाठवलेले तात्त्विक संदेशही नाहीत. हे खरंखुर सांगणं आहे. कधीही ओठांवर जाणीवपूर्वक न आणलेलं. कारण, गेल्या महिन्या-दीड महिन्यापासून तुझी होणारी घालमेल, तुझ्या आतलं भावनिक वादळ मला जाणवतंय. ए पण तुला कधी पुसटशीही कल्पना आली का रे मला तुझ्याबद्दल काय वाटतंय याची. इतक्या दिवसांत जर एकदाही माझ्या नजरेतून तुला हे जाणवलं नसेल तर माझ्या आतलं वादळ माझं माझ्यापुरतंच सीमित ठेवण्यात मी यशस्वी झालेय असं म्हणेन. कारण, मला ही गोष्ट तुझ्यापर्यंत कधी पोहोचूच द्यायची नव्हती. पण आजकाल मला तू ज्याप्रकारे टाळतोयस ते पर्पजली? की तू मला टाळत-बिळत नाहीयेस..  मलाच असं वाटतंय याचा काही मला नीटसा उलगडा होत नाहीय. आपण एकमेकांचे चांगले मित्र कधीच होऊ  शकलो नाही. एका ग्रुपमध्ये असल्यामुळे असेल किमान जुजबी बोलणं तरी व्हायचं रे आपल्यात. तू मला का आवडलास याचं कुठलंही एक्सप्लेनेशन माझ्याकडे नाही. अ‍ॅण्ड आय अ‍ॅम नॉट सॉरी फॉर माय फिलिंग्ज. कारण, त्या खूप जेन्युइन आहेत अरे. 4मी इतके दिवस तुझ्यापासून हे सारं लपवून ठेवलं हे खरं. पण आज सगळं तुला सांगावंसं वाटतंय. का ते माहीत नाही आणि आज व्हॅलेंटाइन डे आहे म्हणून ठरवून मी हे सांगतेय असंही काही नाही हं.

आज सकाळी कॉलेजमध्ये येईपर्यंत सगळं खूप नॉर्मल होतं. पण गेटजवळ आले आणि जिमखान्याजवळच्या भिंतीआडून तुला कट्टय़ावर बसलेलं पाहिलं (खरं सांग, त्या वेळी तू रिद्धीचाच विचार करत होतास ना?) आणि नेहमीप्रमाणे टू बी वेरी ऑनेस्ट मी आजही विरघळले. माझी खरं ही नेहमी बोलण्याची स्टाइल नाही. पण आज तू जाम ‘रापचिक’ दिसत होतास आणि त्यात तुझे ते ‘कातिल’ डोळे.. आय हाय! मी त्या क्षणी पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडले. असं नसतं ना रे की प्रत्येक वेळी आपण ज्याच्यावर प्रेम केलंय त्यालाही आपल्याविषयी तसंच वाटायला हवं! पण हे बुद्धीला कितीही कळलं, पटलं तरी काही क्षणी मनं कशीबशी ताब्यात ठेवावी लागतात.

सगळी रॅशनॅलिटी गळून पडते मित्रा आणि समोर दिसत राहतो फक्त एक ओळखीचा चेहरा. आईबाबा, मित्रमैत्रिणी कुणाकुणाहीपेक्षा अधिक जवळचा. आय गेस, मला फारसे मित्रमैत्रिणी नाहीत हे तुला माहीत असेलच. पण उगीच एक आगाऊ  माहिती म्हणून सांगते. जे फार जवळचे मित्रमैत्रिणी वाटतात त्यांच्याशी आणि फक्त त्यांच्याशीच मनातल्या गोष्टी बोलते मी. हल्ली मित्रमैत्रिणींच्या बाबतीत सिलेक्टिव्ह व्हायला शिकलेय मी. त्यामुळे ‘एक मैत्रीण’ म्हणून मला नव्याने अ‍ॅक्सेप्ट करायचं की नाही ते तुझं तू ठरव. तसं आपण सगळे एकत्र असताना मी फार शांत असते.

माझं माझंच काही तरी चाललेलं असतं. पण कदाचित एक हक्काची लिसनर प्रत्येकाला हवी असते तो रोल मी चांगला बजावते असं मला वाटतं. पण तुम्ही सगळ्यांनी मला जे गुडी गुडीपणाचं लेबल लावलंएत ते मला अजिबात आवडत नाही. हा जो तुम्ही गैरसमज करून घेतलाएत ते प्लीज सोडा आता. असो.. माझ्या या बोरिंग बडबडीमुळे थोडाफार ऑकवर्डनेस आला तरी तो लवकरच दूर होऊन आपण निदान नॉर्मली बोलतो तसे लवकरच बोलू एवढी अपेक्षा. अजून एक.. मला तुझ्याकडून कुठल्याही उत्तराची अपेक्षा नाही, कारण मी कुठलाही प्रश्न विचारलेलाच नाही. त्यामुळे चिल! रिलॅक्स! आणि तुला जे हवंय ते तुला मिळो ही सदिच्छा! 🙂

हं.. तर ग्रुपमधले काही जण या रिलेशनशिप्सच्या रोलर कोस्टरमधून जात होते. ग्रुपमधलं एक नातं मात्र या सगळ्याच्या पलीकडे.. कुठल्या तरी वेगळ्याच ‘हाय’वर जाऊन पोहोचलंय.. ग्रुपमधल्या नेहा आणि सागरला मैत्री आणि प्रेमापेक्षाही वेगळं नातं हवंसं वाटतंय का? ती दोघंही आजकाल ग्रुपमध्ये असूनही नसल्यासारखी का असतात? मला याची उत्तरं माहीत नाहीत.. तुम्ही शोधायला मदत कराल? पुढच्या आठवडय़ात त्यांची गोष्ट सांगतो.

(क्रमश 🙂