मितेश जोशी
‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील मल्हार म्हणजेच चॉकलेट हिरो सौरभ चौघुलेचा जीव खाण्यात कसा काय गुंतलाय याच्या गमतीजमती आजच्या ‘फुडी आत्मा’ या सदरात..
सौरभच्या दिवसाची सुरुवात चहा चपातीने होते. सकाळच्या वेळी पटकन रेडी होऊन चटकन खाऊन लगोलग घराबाहेर पळण्यासाठी चहा चपाती पोटाला मजबूत आधार देते, असं त्याचं ठाम मत आहे. सध्या त्याच्या ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेचं चित्रीकरण मुंबईत सुरू असल्याने सौरभला न्याहारीसाठी घाटकोपरच्या भारत कॅफेमध्ये कधीतरी जायला आवडतं. सौरभला रस्त्यावर उभं राहून ठेल्यावरचे पदार्थ खायलाही खूप आवडतात. दुपारच्या जेवणात सेटवरचं आणि थोडंसं घरचं जेवण असं कॉम्बिनेशन करून सौरभ जेवतो. रोज पालेभाजी खाण्याचा त्याचा नियम आहे. ज्या पदार्थामधून जास्तीत जास्त प्रोटीन मिळतील असे पदार्थ खाण्याकडे त्याचा कल असतो. संध्याकाळची भूक तो प्रोटीन शेक पिऊन शमवतो. कधीतरी ब्राऊन ब्रेड सँडविचही तो सेटवर स्वत: बनवतो. सौरभच्या रात्रीच्या जेवणात उकडलेली कडधान्ये आणि प्रोटीन शेकचा समावेश असतो. पपई, किलगड आणि चिबुड ही फळं खायला त्याला आवडतात. ऋतुमानानुसार मिळणारी फळं आणि भाज्या खाण्याकडेही त्याचा कल असतो.
दोन वर्ष चित्रीकरणासाठी सौरभ कोल्हापूरला होता. कोल्हापूरची मांसाहारी खादाडी सांगताना तो मटण थाळीच्या आठवणी सांगण्यात रंगून जातो. ‘मी डोंबिवलीला राहत असल्याने मी कोल्हापूरी मटणाची चव कधीच चाखली नाही. आणि कोकणी असल्याने मत्स्यप्रेमाच्या पलीकडे कोणालाही जवळ करू शकलो नाही. कोल्हापूरात असताना मी माझी जिभेची चव वाढवण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरचं मंगळवारपेठ म्हणजे मांसाहाराचं माहेरघरच. शेकडो हॉटेल – खानावळी इथे आहेत. मस्त टम्म फुगलेली भाकरी, सुकं मटण, तांबडयम-पांढऱ्या रश्शाच्या वाटयम आणि सोबतीला कांदा-दही मिक्श्चरने नटलेली मटण थाळी समोर आली की तोंडाला पाणी सुटतं. रश्शाच्या वाटयमवर वाटयम रिचवणं हा अस्सल कोल्हापुरी रिवाज मला तिथे जाऊन माहिती झाला. किती वाटयम प्यालात याचा कोणी हिशेब मागणार नाही. भाकरी नको असेल तर पोळीचा पर्यायदेखील असतो, पण इथली पोळीदेखील घडीची आणि थाळीभर मोठी असते. एकातच आउट व्हायला होतं. त्यामुळे जे पचेल ते मोजकंच घ्यावं आणि मनापासून खावं’ असं सौरभ सांगतो. फुकटचे शहरी रीतिरिवाज न बाळगता मटणाची नळी चाटून पुसून चोखायला मी कोल्हापूरातच शिकलो, असं सांगणारा सौरभ भाकरी संपल्यावर तिथे मस्त परतलेला चुरचुरीत कांदा भुरभुरलेला मसालेभात दिला जातो हेही आवर्जून सांगतो. कोल्हापूरी मांसाहारी खाद्यसंस्कृती सांगताना तल्लीन झालेल्या सौरभने रक्ती-मुंडी या आणखी एका खाद्यप्रकाराविषयीही माहिती दिली. ‘कोल्हापुरातील जुनेजाणते खाद्यप्रेमी रक्ती-मुंडी हा पदार्थ आवर्जून खातात. बोकड कापतानाचं पहिलं रक्त गोठून जातं ते आणि भेजा असं एकत्र शिजवून हा पदार्थ तयार होतो. हवं असेल तर हे वेगवेगळं देखील मिळतं. मुंबईच्या आणि पुणेकरांच्या हिशेबी वृत्तीनुसार वाटीभर ‘एक्स्ट्रा’ रस्सा आणि एक्स्ट्रा चटणीचा हिशोब येथे केला जात नाही. ‘अजून घे की रं मर्दा’ म्हणत बादलीनेच रस्सा वाढणारेदेखील कोल्हापुरात आहेत’ असं तो म्हणतो.
मटण जसं आवडीनं खाल्लं जातं तितक्याच आवडीनं त्यावर गप्पाही रंगतात. ज्याप्रमाणे आपल्याकडे हुर्डा पार्टी, पोपटी पार्टी फेमस आहे तसंच पश्चिम महाराष्ट्रातही अशा खाद्यमैफिली रंगतात असं तो सांगतो. ‘हिवाळय़ात घाटावर म्हणजेच नदीच्या काठी जाऊन किंवा एखाद्याच्या शेतात रंगणाऱ्या ‘रस्सा मंडळ’, ‘गुऱ्हाळ पाटर्य़ा’ हे मटणप्रेमींचं खास ‘सोशल आऊटिंग’असतं. रस्सा मंडळ म्हणजे मित्रमंडळ होय. हे रस्सा मंडळ नदीकिनारी जाऊन एकत्रित मटणाचा स्वयंपाक करतात आणि सहभोजनाचा आनंद घेतात. हीच बाब गुऱ्हाळ पार्टीच्या बाबतीतही आहे.कोल्हापूर भागात साखर व गुळाचं उत्पादन मोठय़ा प्रमाणावर होतं. या गुऱ्हाळांचा हंगाम असतो त्या काळात मित्रपरिवारातल्या एखाद्याच्या गुऱ्हाळावर सहभोजनाची पार्टी ठेवली जाते’ अशी आठवण त्याने सांगितली.
न्याहारीसाठी कोल्हापुरी पदार्थ जगात भारी आहेत असं सौरभ म्हणतो. ‘तुझी खांडोळी करीन’ या वाक्प्रचाराला जन्माला घालणारी झणझणीत खांडोळी हा कोल्हापूरचा एक चविष्ट न्याहारीचा पदार्थ इथल्या तरुणाईत लोकप्रिय आहे. याविषयी सांगताना सौरभ म्हणाला, ‘या पदार्थाचा जन्म ९० वर्षांंपूर्वी कोल्हापुरातील गांधीनगर परिसरातील पोर्तुगीज लॉजमध्ये काम करणाऱ्या शशिकांत उरुणकर यांच्या हातून झाला होता. मधल्या काळात हा पदार्थ कोल्हापूर मध्यवर्ती बँकेच्या, त्यानंतर एलआयसीच्या कँटीनमध्ये तिथल्या कर्मचाऱ्यांसाठी बनवला जायचा. उरुणकरांच्या नातवाला हा पदार्थ सर्वसामान्यांना खाऊ घालायचा होता. म्हणून त्याने ७ वर्षांपूर्वी ‘खांडोळी कँटीन’ हॉटेल सुरू केलं. बघता बघता ही खांडोळी कोल्हापुरी तरुणाईत फेमस ठरू लागली. खांडोळी म्हणजे ब्रेड आणि अंडं याचं समीकरण करून तयार झालेला खाद्यपदार्थ. ही खांडोळी चीज खांडोळी, मेयोनीज खांडोळी, बटर खांडोळी अशा अनेक प्रकारात मिळते. खांडोळी चीज टोस्ट, सँडविच खांडोळी असे आगळेवेगळे ४० खाद्यपदार्थ इथे मिळतात. केवळ तरुणच नव्हे तर कोल्हापुरी पैलवानदेखील ही हेल्दी खांडोळी चवीने चाखायला रोजच गर्दी करतात’ अशी माहिती त्याने दिली.
सौरभला वेगवेगळय़ा ठेल्यावर जाऊन खादाडी करायला प्रचंड आवडते. मोठय़ा फॅन्सी हॉटेलमध्ये जाण्यात त्याला विशेष रस नाही. अभिनेता होऊन नावारूपाला येण्याआधी सौरभ जिथे जिथे जाऊन खादाडी करायचा तिथे तो आजही आवर्जून जातो. त्याचे चाहते त्याचा साधेपणा पाहून चकित होतात. सौरभला मित्रांबरोबर जाऊन खादाडी करायला आवडतं. त्याला कायम कोणाची तरी सोबत लागते. सेटवरच्या खाबूगिरीचे किस्से सांगताना सौरभ म्हणाला, ‘आमची मालिकेतली आजी वीणा कट्टी ही सेटवरचं आमच्यासाठी चालतंफिरतं स्वयंपाकघर होतं. मी डोंबिवलीहून परिवारापासून लांब येऊन शूटिंग करतोय हे तिच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हापासून ती माझ्यासाठी वेगवेगळे चटकदार पदार्थ बनवायची. मोठमोठय़ा भाकऱ्या ती माझ्यासाठी बनवून आणायची. कोल्हापुरात जाऊन हृदयात आणि पोटात भाकरी तसंच विशेष मटणप्रेम वाढल्याने उगाच चिकन खाण्याचा करंटेपणा आता माझ्याकडून होत नाही’.
कोकणातील मालवणनजीक रेवंडी हे सौरभचं गाव. कोकणचा विस्तृत सागरीकिनारा लाभल्यामुळे सौरभच्या आहारात माशांनाही तितकंच महत्त्व आहे. मत्स्यप्रेमाविषयी सांगताना सौरभ म्हणतो ‘मला कोळंबी, रावस, शिंपले, खेकडा, सुरमई हे मासे प्रचंड आवडतात. शिंपले हे उकडून सारामध्ये बनवले जातात. शिंपले आणि घुले हे मासे मला गावची ओढ लावतात. घुले म्हणजे समुद्राच्या वाळूत मिळणाऱ्या छोटय़ा गोलसर शिंपल्या. या समुद्रकिनारी रेतीवर सापडतात. त्यांना गोळा करण्यासाठी समुद्रकिनारी आकला म्हणजेच बारीक जाळी घेऊन जावी लागते. मग त्या जाळीत समुद्रकिनाऱ्यावरची वाळू गोळा केली जाते, ती पाण्यात खळखळून धुतली की रेती निघून जाते व जाळीत घुले अडकतात. घुले हे भरतीच्या वेळी मिळत नाहीत. घरी आणून हे घुले स्वच्छ करून उकडवले जातात. बाउलमध्ये घेऊन त्यांना टूथपिकच्या कडीने किंवा पिनने त्यांना टोचून त्यांचं मांस खाल्लं जातं. गावी राहणारा मालवणी माणूस हा फार कमी वेळा हलवा, पापलेट, सुरमई या मोठय़म माशांच्या वाटेला जातो. तारली, मोदक, खवळी, पेडवे, बांगुर्ले इ. छोटे मासे गावी बनवले जातात. या माशांचं आमसूल आणि मालवणी मसाला घालून केलेलं तिखलं तांदळाच्या भाकरीबरोबर खाण्याची मजा काही औरच. दुसऱ्या दिवशी हे तिखलं उरलं असेल तर आटवून पेजेबरोबरही खायला चांगलं लागतं’ अशा आठवणीही त्याने सांगितल्या.
सौरभच्या मते खाण्यासाठी भ्रमंती ही प्रत्येकाने करायलाच हवी. जोपर्यंत तुम्ही घरची चौकट मोडून बाहेर पडून वेगवेगळय़ा ठिकाणी जाऊन खात नाही तोपर्यंत तुमची जीभ वेगवेगळी रसनातृप्ती द्यायला तयार होणार नाही. माझ्यासारखंच मोजकं खा, चांगलं खा, स्वच्छ जागेतलं खा, पण स्वत:च जीव ‘खाण्यात’ नक्की गुंतवा !
viva@expressindia.com