पाऊस आल्याची वार्ता दशदिशांत पोहोचते. या पावसाच्या येण्याची मोठी गंमत असते, येत नाही तोवर आतुरतेने वाट पाहणारी माणसं, येऊन धबाधबा कोसळायला लागला की मात्र अस्वस्थ होतात, कारण शहरातल्या लोकांसाठी पाऊस म्हणजे तुंबणारे पाणी, बंद पडलेली लोकल आणि रस्त्यातले खड्डे. पण पावसाची खरी मजा अनुभवायची असेल तर शहरापासून दूर, जरा रानावनात – डोंगरदऱ्यांत जायला हवं. कडय़ावरून कोसळाणाऱ्या धबधब्याच्या धारांमध्ये मनसोक्त भिजायला हवं आणि गवतांवर डुलणाऱ्या रानफुलांसोबत डोलायला हवं. सुदैवाने आपल्या महाराष्ट्राला लाभलेल्या सह्यद्रीच्या राकट काळ्या कणखर रांगेमुळे पावसाचा हा उसळता – फेसाळता जलजल्लोश अनुभवणे सहज शक्य होते. चला तर मग एक धावती भ्रमंती करूया खास पावसाळी ठिकाणांची.
या सगळ्या नेहमीच्या धबधब्यांपेक्षा जरा हटके असलेला आणि मुंबईपासून थोडा दूर असलेला धबधबा म्हणजे जव्हारजवळचा दाभोसा वॉटरफॉल. हिरव्यागार डोंगरांच्या कुशीत कडय़ावरून कोसळणारी दाभोसाची पांधरीशुभ्र धारा पाहणे हा खरोखरच अनोखा अनुभव असतो. पायवाटेने तोल सांभाळत, जरा घसरत, दरीत उतरल्यानंतर काना-मनात भरून राहतो तो धबधब्याच्या धारेचा धीरगंभीर नाद, ओंकाराच्या अनाहत नादाशी नातं सांगणारा तो नाद नंतरही कानात गुंजत राहतो. मात्र हा धबधबा निव्वळ पाहण्याचा आहे, त्याच्या डोहात उतरण्याचा वेडेपणा (निदान पावसाळ्यात तरी) कोणी करू नये. या ठिकाणी नेचर ट्रेल कंपनीचे झकास रिसॉर्ट धबधब्याच्या समोरच असल्याने एखाद रात्र मुक्काम करून हा जलजल्लोश मन:पूर्वक अनुभवता येतो. धबधबा म्हटल्यावर पावसाळी पिकनिकचे, मित्र-मत्रिणींसह धांगडिधगा करण्याचे ठिकाण अशीच प्रतिमा सर्वसाधारणपणे रूढ असली तरी महाराष्ट्रात एक धबधबा असाही आहे, ज्याला अध्यात्माचे, साहित्याचे वलय लाभलेलं आहे. महाडजवळच्या शिवथर घळीला भिजवणारा हा धबधबा म्हणजे समर्थाच्या सुंदरमठाचा जणू रक्षकच. या धबधब्याचे महत्त्व म्हणजे ज्या घळीच्या मुखावर याच्या जलधारांचा पडदा वर्षांकाळात अखंड धरलेला असतो, त्याच घळीत बसून समर्थ रामदासस्वामींनी दासबोध सांगितला आणि शिष्योत्तम कल्याणस्वामींनी तो उतरवून घेतला. मुंबई-गोवा महामार्गावर महाडनंतर दहा -बारा किलोमीटरनंतर एक रस्ता वरंध घाटाकडे जाण्यासाठी वळतो, या वळणावळणाच्या रस्त्याने तुम्ही येता बारसगावापाशी, तिथे डावीकडचा रस्ता घ्यायचा आणि यायचे कुंभे शिवथरला. या सगळ्या प्रवासात हिरव्यागार वनस्पतींची झूल पांघरून सजलेले डोंगर, त्यावर रुळणाऱ्या धबधब्यांच्या पांढऱ्या रेषा, आकाशातून डोंगरावर उतरणारे काळे काळे ढग पाहताना काळ नदीचा प्रवाह अलगद बाजूने कधी वाहायला लागतो ते कळतच नाही, याच नदीवरचा पूल ओलांडल्यावर तुम्ही पोहोचता शिवथर घळीच्या पायथ्याशी, एव्हाना समोरच्या डोंगरातला भलामोठा धबधबा जसा नजरेत भरलेला असतो, त्याचप्रमाणे कानावर आदळणारा त्याचा आवाज मनावर ठसलेला असतो. घळीच्या पायऱ्यांपर्यंत रस्ता असल्याने स्वत:च्या वाहनाने येणे सोपे आहे. मात्र हे ठिकाण केवळ मौजमजा करायचे नाही, अवघ्या मानवजातीला मार्गदर्शन करणाऱ्या एका भारदस्त ग्रंथाचे जन्मस्थान आहे, इथे स्वराज्याचे वेड घेतलेल्या तपस्वी पुरुषाचा निवास होता ही गोष्ट जरूर ध्यानात ठेवावी. अलीकडे जवळच्या गावातील मंडळींनी जेवणाची, चहा नाश्त्याची सोय घळीच्या पायथ्याशी सुरू केल्याने सोबत डबे नेले नाहीत तरी पंचाईत होत नाही.
एका धबधब्याने जर तुमची तहान भागणार नसेल तर तुमच्यासाठी अशीही ठिकाणे आहेत जिथे ‘होलसेल’मध्ये धबधब्यांची माळच्या माळ पाहायला मिळते. या यादीतले पहिले ठिकाण अर्थातच माळशेज घाट. कल्याणहून नगर जिल्ह्यकडे जाणाऱ्या या रुद्रभीषण घाटाला पावसाळ्यात ओलेतीचे लावण्य लाभते. मुरबाड, सरळगाव, टोकवडे, वैशाखरे ही गावे खाली सोडून रस्ता डोंगराच्या कडेवर चढायला लागतो आणि सह्यद्रीच्या रांगडय़ा सौंदर्याचे नवे दालनच डोळ्यांसमोर उघडू लागते. प्रत्येक वळणावर शेजारच्या दरीचे सौंदर्य हळू हळू उलगडत जात असते आणि बाजूच्या डोंगरावरच्या जलधारा थेट तुमच्या गाडीच्या टपावर कोसळत असतात. अचानक दरीतून आलेल्या धुक्याच्या लोटात समोरची वाट हरवते आणि हवेतला गारवा तना मनावर शिरशिरी उमटवतो. नकळत तुम्ही गाडी रस्त्याच्या कडेला लावता आणि माळशेजच्या पाऊसगाण्यात तुमचाही सूर मिसळता. तुम्हाला जरा ट्रेकिंग करायची हौस आणि सवय असेल तर वैशाखरे गावातून नाणेघाटाचा रस्ता धरायचा, इतिहासकाळात याच घाटातून व्यापारी तांडे देशावरून कल्याणच्या बंदराकडे जात असत. सातवाहनांच्या नागनिका राणीने खोदलेले जकातीचे रांजण आजही येथे पाहायला मिळतात. या घाटाला तुम्ही ट्रेकिंग न करताही भेट देऊ शकता, जुन्नर गावातून बाहेर पडून माणिक डोहाकडे जाणारा रस्ता घ्यायचा, हा रस्ता तुम्हाला थेट नाणे घाटाच्या माथ्यावर घेऊन जातो. इथल्या दरीच्या काठावरून डोकावल्यावर खालची छोटी छोटी गावे आणि हिरव्या गर्दीत हरवलेल्या रानातल्या पायवाटा सहज दिसतात, या कडय़ावर पावसाच्या धारा झेलताना स्वत:चा खासगी पाऊस अनुभवल्याचा आनंद मिळतो. पावसाचं असंच मनात फेर धरणारं गाणं ऐकायचं आणखी एक ठिकाण म्हणजे भंडारदरा. मुंबई नाशिक महामार्गावर घोटी येथे महामार्ग सोडून आतमध्ये शिरायचे आणि भोवतालच्या परिसराची निसर्गशोभा न्याहाळत शेंडी हे भंदारदरा धरणाजवळचे छोटंसं गाव गाठायचे. भंडारदऱ्याची खासियत म्हणजे इथलं एम.टी.डी.सी.चं रिसॉर्ट धरणाच्या जलाशयाला लागून आहे. त्यामुळे व्हरांडय़ात आरामात बसून तुडुंब भरलेल्या जलाशयावर रिमझिम बरसणाऱ्या पावसाच्या धारा पाहायच्या किंवा छत्री न घेता त्या धारांमध्ये चिंब भिजायचे. तुम्ही जर ऑगस्टच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवडय़ात भंडारदऱ्याला गेलात तर धरणातून सांडणाऱ्या पाण्याची छत्री पाहायला मिळते. जास्तीचे पाणी सोडण्यासाठी ब्रिटिश इंजिनीअर्सनी केलेली रचना पाहून मन थक्क होते आणि अंब्रेला फॉलचे कौतुक वाटते.
पावसातील निसर्गाचा खरा आनंद घ्यायचा तर एक तरी पावसाळी ट्रेक करायलाच हवा. आता तुम्ही पट्टीचे ट्रेकर नसलात म्हणून काय झालं कर्जतजवळचा पेठ, राजमाची ते कोंदिवडे, कर्नाळा किंवा मळवलीचा लोहगड असा एखादा सोपा ट्रेक नक्की करू शकता. रात्रीची पुणा पॅसेंजर पकडायची आणि पहाटे पहाटे झुंजुमुंजू होण्याआधी मळवली स्टेशनात उतरायचे. मळवली गावातून चालत निघायचे, हळू हळू उजाडू लागते तसे उजव्या हाताचा विसापूर आणि समोरचा लोहगड स्पष्ट दिसू लागतात. या डोंगराच्या मधलाच कातळ उन्हा-पावसाने झिजून नाहीसा झाला आहे, त्यामुळे तिथे पडलेल्या भोकातून पलीकडचे आभाळ स्पष्ट दिसते. लोहगडवाडीतून गडाची वाट चढायला सुरुवात केल्यावर गडाच्या बांधणीची वैशिष्टय़े स्पष्ट होतात.
दुहेरी बांधणीची मजबूत तटबंदी आणि वळणावळणाची वाट यामुळे किल्ल्याचे मुख्य द्वार कुठे आहे ते आधी कळतच नाही. लोहगडाचे खास आकर्षण म्हणजे निमुळती होत गेलेली नसíगक माची, या माचीच्या टोकावर बसून दरीतून घोंगावणारा वारा अनुभवणे हा अनुभव शब्दांत न मावणारा. आता पावसाळ्याची मजा लुटायचीय पण गड चढायचा म्हणजे जरा कठीणच, अशा मंडळींसाठी मळवली गावाजवळची भाज्याची लेणी हा पर्याय उत्तम ठरावा. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी बौद्ध भिख्खूंसाठी खोदलेली ही लेणी, महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्त्वाचा ठेवा आहेत. या लेण्यांजवळ कोसळणारा मोठा धबधबा असल्याने पावसाळ्यात लोणावळ्याला येणाऱ्या हौशी मंडळींची पावलेही इकडे वळतात.
साताऱ्याजवळच्या ठोसेघरपासून ते सावंतवाडीजवळच्या आंबोलीपर्यंत अनेक धबधबे पावसाळ्यात आपल्या जलधारांनी खुणावत असतात. त्यांचे आमंत्रण स्वीकारून हा जलजल्लोश साजरा करायला जरूर जा. मात्र थोडी सावधगिरी बाळगा, अनोळखी ठिकाणी साहस करू नका, निसर्गाचा आनंद लुटताना तुमच्या खाणाखुणा (प्लॅस्टिक, कचरा) तिथे राहणार नाहीत याची खबरदारी घ्या आणि रानावनातील हिरवाई, धबधब्यांचा उत्साह तनामनात भरून टवटवीत व्हा!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा