|| सारंग साठय़े
आजकाल समाजमाध्यमांवर राहणं हे श्वास घेण्याइतकं महत्त्वाचं झालंय का? कारण त्याचा इतका कमालीचा रेटा समाजमनावर सध्या कायम आहे. मत मांडा. दुमत कळवा. नाहीच तर तोंड वाकडं केलेली ‘स्माइली’ टाका, असा ‘ठोक’ व्यवहार सध्या चालू आहे. देशात कुठेही काही घडू द्यात. त्याची खातरजमा नसली म्हणून काय बिघडले? त्यावर बोललंच पाहिजे. प्रत्येकाची ती गरज बनलीय इतकं मात्र नक्की. देशातील एखाद्या भागात घडलेला दहशतवादी हल्ला असो वा साध्या क्रिकेट संघाची निवड वा इतर काही. घटना घडल्याच्या तासाभरानंतर अनेकांची ‘स्टेटस’ बदलली जातात. म्हणजे ती त्या घटनेशी निगडित टाकली जातात. जर का ती नाही टाकली तर आपण जगाच्या मागे पडलोय, असा गंड तरुणांच्या मनात तयार होत आहे. आता हे तरुण असणं म्हणजे वयानं नाही, तर ‘डिजिटली तरुण’. डिजिटली तरुण असणं कदाचित रूढार्थाने गौरवास्पद असेलही. पण मला इथं समाजमाध्यमाचं वेड नुकतंच ज्यांच्या मेंदूत शिरलंय अशांसाठी हा शब्द वापरायचा आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्यांचा मी कट्टर पुरस्कर्ता आहे, हे मला सांगावं लागू नये इथं. प्रत्येकाला मांडावं, असं वाटणं हे स्वाभाविक आहे. वर तो आपला घटनात्मक अधिकार तर आहेच आहे. पण एवढं सारं मान्य करूनही मला हे मांडणं खटकतं. खटकतं अशासाठी, की ते फारच उथळ असतं. मत मांडायलासुद्धा आधी ते तयार व्हावं लागतं. म्हणजे इथे (समाजमाध्यमांवर) मांडण्याचीच घाई फार. गोंधळ इथेच आहे. असे का?
का बरं त्या ‘व्हलेंटाइन डे’ला विरोध करणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनांचा निषेध केला जातो आणि त्याच वेळी उत्तर प्रदेश वा राजस्थानात गोहत्येच्या मुद्दय़ावरून एखाद्याला ठेचून (लिंचिंग) मारलं जाऊनही त्याच्याविषयी साधा शब्दही उच्चारला जात नाही. समाजसेवक अण्णा हजारे यांच्या लोकपाल आंदोलनाला समर्थन करणारे तरुण भ्रष्टाचाराच्या विरोधात आहेत, असंच मानावं लागेल. पण त्यांनाही नेत्यांच्या ‘सेक्युलर’वादाची भुरळ पडून ते नेत्यांना ‘स्वच्छ’ प्रतिमेची पावती देऊन टाकतात. याचा अर्थ सोयीचा विचार मांडायचा. पण तो तर्कविसंगत आहे, याचा जरासुद्धा विचार करायचा नाही, याला काय म्हणायचं? महेंद्रसिंह धोनी एका सामन्यात ‘आऊट’ झाला म्हणून त्याला ‘ट्रोल’ करायचं नि दुसऱ्याच सामन्यात त्यानं विजयश्री खेचून आणल्यानंतर धोनीचे ‘प्रोफाइल फिल्टर’ लावून फिरायचं. यातूनच #भक्त, #लिब्टार्ड, #स्युडोसेक्युलर, #स्युडोनॅशनॅलिस्ट असे अत्यंत उद्रेकपूर्ण ‘हॅशटॅग’ बनत जातात आणि समाजमाध्यमाशी स्वत:ला जोडून घेणं म्हणजे एक निराशाजनक अनुभवच आहे, असं कुठे तरी मनपटलावर उमटत जातं.
दुसऱ्याचं कशाला? माझ्यावरूनच मी हे सांगत आहे. या जाळ्यात मीही गुरफटलो होतो. कारण वरील सर्व चुका मीसुद्धा कधी तरी केल्या आहेत. अर्थात चुका सुधारणं हे मी मान्य केलंय आणि म्हणूनच समाजमाध्यमांच्या या चौखूर उधळलेल्या घोडय़ावरून स्वत:ला खाली उतरवणं मला अधिक पटलं आहे. मी आताशा समाजमाध्यमांवर तितकासा व्यक्त होत नाही. पण असं करणंही काही चांगलं लक्षण नाही. समाजात निर्माण होणाऱ्या प्रत्येकाला उद्रेकाला तोंडच द्यायचं नाही, असं ठरवून जर मतच मांडायची नाहीत, असं ठरवून टाकलं तर मग समर्थनीय आणि विरोधाच्या मतांचा समतोल कसा साधला जाईल. एकच एक रेषेतली मत मांडली जात असतील आणि तीच खरी आहेत, असं म्हटलं जात असेल तर मग समाजाच्या विरोधी मताला सबलता कशी येईल बरे? हे सारं दुर्बल समाजाचं लक्षण नाही का?
समजून-उमजून मत मांडणं हे सशक्ततेचं लक्षण आहे. त्याचं महत्त्व तितकंच मोठं आहे. जगात काहीही घडू द्यात, किंबहुना अविरत काहीतरी घडतच राहणार आहे. पण ते घडल्यानंतर त्यामागचा कार्यकारणभाव समजून घ्यावा लागेल. त्या घटनेच्या मंडनातील आणि खंडनातील शक्याशक्यता उमजून घ्याव्या लागतील. इतिहास आणि राजकारण नेहमी समजून घेऊनच मांडण्याची गरज आहे.
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका येऊ घातल्या आहेत. यंदाच्या निवडणुकांमध्ये सुमारे १३ कोटी नवमतदार स्वत: मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आपण स्वत:ला ज्या विचारसरणीचे मानतो. ज्या विचारांना आपण मत देणार आहोत. ती विचारसरणी आपण खरंच जाणतो का? आपल्याला त्याविषयी कितपत माहिती आहे? हे प्रश्न स्वत:ला विचारायला हवेत. म्हणजे हे प्रश्न जेव्हा स्वत:ला विचारले जातील तेव्हाच समाजमाध्यम पौगंडावस्थेतून बाहेर पडलेलं असेल. ती आता पडण्याची वेळ आली आहे. खरं तर जो विषय आपण जाणतो, तो त्यापेक्षा खोल आहे. जरा खोलात जाऊ या, जबाबदार बनू या!!
viva@expressindia.com
(शब्दांकन: गोविंद डेगवेकर)