ही कहाणी आटपाट नगराची आहे. या आटपाट नगरात उंचच उंच इमारती, उड्डाणपुलांचे जाळे जसे आहे तसे खड्डय़ांची मालिकाही आहे. या आटपाट नगरातली जनता मोठीच सोशिक आहे. जाणत्या राजांना परस्परांवर डोळे वटारण्याच्या पलीकडचे काही दिसलेच तर सामान्यांचे डोळे ‘पांढरे’ होतील अशी अवस्था आहे. आटपाट नगराच्या पलीकडची परिस्थितीही काही वेगळी नाही.
(आठवण : लांबवरून आडव्या-उभ्या उडय़ा टाकत, हातात ढोलकं घेत हेऽऽऽहेऽऽऽ बाजे रे बाजे.. ढोल बाजे.. वगरे गाणं गात नायिकभोवती गरागरा फिरणारा पीळदार शरीरयष्टीचा सलमान खान.. गाएंगे हम, झुमेंगे हम म्हणत डिस्को दांडिया खेळणारा परफेक्शनिस्ट आमिर खान.. आणि काय काय)
दरवर्षीप्रमाणे गोरेगाव तत्सम वेस्टर्न लाइनवरच्या एखाद्या मोठय़ा पटांगणावर फाल्गुनी पाठकच्या गाण्यांचा जश्न.. हे सर्व आता सुरू झालंय.. याचाच अर्थ दांडिया, गरबा, नवरात्राचे पडघम वाजू लागलेत..
दांडिया खेळायला येण्याचा आग्रह फेसबुक, ट्विटरवर होऊ लागला आहे. मुंबई-ठाणे परिसरातील समस्त राष्ट्र-महाराष्ट्रवादीच नव्हे तर डोक्यावर कायम आरोपांच्या समर्थनार्थ मोठमोठय़ा फाइलींचा ‘किरीट’ मिरवणाऱ्या राजकारण्यांनी गरब्याचा-नवरात्राचा हा ‘इव्हेन्ट’ अगदी ‘मनसे’ कॅश करण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे.
किरकोळ विक्री क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीला राजमान्यता मिळण्याच्याही कैक आगोदर बाजारात सर्रास उपलब्ध असलेल्या ‘चायना मेड’ दांडियांसह देशी बनावटीच्या दांडिया (ज्याने गरबा खेळला जातो तो दांडिया; हे उदाहरण अशासाठी की आजकाल गरबा म्हणजेच दांडिया हे समजावून सांगावं लागतं) दुकानांमध्ये रास रचू लागल्या आहेत. अनेक प्रकारच्या, विविध रंगांच्या, आकारांच्या, स्टाइलच्या दांडियाही बाजारात उपलब्ध आहेत. खास गुजराती-राजस्थानी वर्क असलेले घागरे, ड्रेस वगरे विविध दुकानांत दिसू लागलेत. घागरी फुंकण्याचा कार्यक्रमही नवरात्रीतलाच, त्यामुळे पुन्हा विविध आकाराच्या, रंगांच्या घागरीही रस्त्याच्या बाजूला हमखास भरणाऱ्या ‘बिग बाजारा’त मिरवू लागल्या आहेत.
मराठी अभिनेत्यांचा, भावोजींचा असा कोणाचा कोणाचा दांडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विभागांत दांडियाची नेपथ्यरचना सुरू झाली आहे. मदान बुक करणं, गायकांसाठी व्यासपीठ उभारणं, रोषणाईसाठी बांबू ठोकणे, विजेच्या लखलखटाची व्यवस्था करणं, प्रायोजक शोधणं वगरे तयारी जोशात सुरू आहे. दांडिया खेळायला कोणाला निमंत्रित करायचं, कोणाला बोलावलं म्हणजे गर्दी जास्त होईल, किती गल्ला गोळा होईल, तिकिटाचे दर काय ठेवावेत याची चर्चाही जोरदार सुरू आहे.
कॉलेजांचे फेस्टिव्हल्स आता संपण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे ग्रुपमध्ये दांडियाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. दांडियाच्या निमित्ताने नव१रात्री’ कशा जागून काढायच्या, कुठे काढायच्या, कशा काढायच्या, ‘व्यवस्था’ काय आणि कशी करायची याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. कोणाच्या घरून किती वेळ बाहेर राहण्याची परवानगी असेल याची गणितं मांडली जात आहेत. फेसबुक-ट्विटरवर याविषयीच्या विचारांची देवाणघेवाण सुरू आहे.
मुंबई-ठाण्यापासून दूर.. गावात किंवा लहानशा शहरांमध्ये मात्र गरबा खेळण्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आखले जात आहेत. गुजराती गाण्यांच्या सीडी-डीव्हीडींची मागणी वाढू लागली आहे. आपापल्या गल्लीत कशा प्रकारे नवरात्र साजरा करायचे याची चर्चा सुरू आहे. भारनियमन असूनही लाइट कशी तग धरतील याची तजवीज करण्यासाठी काय करावं लागेल याचा विचारविनिमय पारावर चालू आहे.
डिझेल-महागाई-सिंचन-श्वेतपत्रिका-सोनिया-मोदी-ममता-मनमोहन हे सर्व विषय मागे सारून आता जनता सणसमारंभ उत्साहात साजरे करण्यासाठी तयारी लागले आहेत, हे नक्की. गणेशाच्या कानावर सर्व विघ्नं घातली आहेत. त्यांचे निराकरण कसे करायचे या विषयावर वर स्वर्गात देवादिकांची बठक निष्फळ पार पडली आहे. अश्विन शुद्ध पक्षी अंबामाता सिंहासनी बसेल आणि काय ते बघेल असे म्हणत देवादिकांनी निर्णयाचे सर्वाधिकार अंबामातेला दिले आहेत.
अशी ही दांडियाच्या तयारीची कहाणी सुफळ संपूर्ण.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा