|| तेजश्री गायकवाड
वडिलांच्या हैदराबादमधील साडीच्या दुकात बसलेल्या अवघ्या ८ वर्षांच्या मुलाला कपडय़ांविषयी वेगळीच आवड निर्माण झाली आणि पुढे ती वाढतच गेली. पुरस्कार विजेता डिझायनर, स्वत:च विणकाम शिकलेला, २० वर्षांहून अधिक काळापासून भारतातील जामदानी विणकरांसोबत काम केलेला टेक्स्टाइल आणि फॅशन डिझायनर म्हणजे गौरांग शाह. गौरांगला जामदानी साडी ९ यार्डच्या कॅनव्हासप्रमाणे वाटते. डिझाइन करू शकण्याची बुद्धिमत्ता ज्याच्याकडे आहे त्याच्यासाठी कल्पनांना मर्यादा नाही, असं ठाम मत तो व्यक्त करतो. गौरांगने अनेक वस्त्रोद्योगांमध्ये पुढाकार घेतला आहे. तो या व्यवसायांमध्ये इतका गुंतलेला आहे की आज अग्रगण्य सेलिब्रिटीज, उद्योजक आणि समाजसेवी संस्था यांच्याकडे वस्त्रोद्योग डिझाइनर म्हणून त्याला सर्वात जास्त मागणी आहे.
गौरांग त्याच्या टेक्स्टाईल आणि फॅशन डिझायनरच्या प्रवासाबद्दल सांगतो, ‘कापड व्यवसाय करणाऱ्या एका कुटुंबात मी मोठा झालो. माझ्या आईला सुंदर विणलेल्या साडीत पाहून मला त्या वेळी यातच काही तरी करून दाखवायची इच्छा निर्माण झाली होती’. माझ्या वडिलांच्या दुकानात आलेल्या महिला ग्राहकांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला शोभून दिसतील अशा साडय़ा शोधून देण्यासाठी आणि त्यावरचे मॅचिंग ब्लाऊज शोधण्यासाठी मी मदत करायचो. त्यामुळे मला साडी नेसणाऱ्या स्त्रीची भावना फार जवळून समजून घेता आली, असं तो म्हणतो. लहानपणीच्या त्या अनुभवामुळेच मला भारतीय फॅशनमधील पोत, रंग आणि धाग्यांबद्दल सर्व काही शिकण्याची इच्छाशक्ती निर्माण झाली. आणि त्यातूनच पुढे कॉलेज शिक्षण पूर्ण केल्यानंतर एक फॅशन डिझायनर म्हणून माझा प्रवास सुरू झाला, असं तो म्हणतो.
जामदानी विणकरांबरोबरचे गौरांगचे काम महत्त्वाचे आहे. त्याच्या या प्रवासाची सुरुवात कशी झाली हे सांगताना आंध्र प्रदेशातील एका गावात जामदानी विविंग फॉर्म सापडला आणि मग पुढे त्या दिशेने काम सुरू झाले, असे तो सांगतो. ‘मी तिथल्या विणकरांशी संवाद साधला, त्यांचे विचार जाणून घेतले, स्वत: थोडं विणकामही केलं. जामदानी विवने मला माझ्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. विणकाम ही एक अशी टेक्निक आहे ज्यात मनुष्य आपल्याला हवी ती कला दाखवू शकतो. मी या प्राचीन, बहुउपयोगी तंत्राचा नीट अभ्यास केला आणि यातच एक कन्टेपररी हातमाग फॅशन डिझायनर बनायचं हेही पक्कं केलं’, असं तो म्हणतो. गौरांगने महाविद्यालयीन शिक्षणानंतर देशाच्या अनेक भागांतील जामदानी वीवर कुटुंबांना भेट दिली आणि आश्वासन दिले की, त्यांचे डिझाइन्स त्यांच्या आयुष्यात नक्कीच बदल करतील. आज गौरांगच्या विणकर कुटुंबात ८०० हून जास्त विणकरांचा समावेश आहे. ‘माझा हा प्रवास सहजसोपा नव्हता. जामदानी विविंगमध्ये रस नसलेल्या विणकर समुदायाशी मला सामोरे जावे लागले. आधुनिक भारतीयांचे जीवन हे त्यांच्या आवडीनिवडीशी संबंधित आहे. भारतीय हातमागाची रचनात्मक, सौंदर्यात्मक कल्पना आणि दृष्टिकोनही विणकरांना समजावून सांगितला. हळूहळू त्यांना उत्तेजित करून त्यांचा विणकामातील उत्साह वाढवणे हे माझ्यासमोरचे आव्हान होते,’ असं तो म्हणतो. मात्र हे आव्हान त्याने पेलले याचे कारण आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळापासूनच या कलेची क्षमता काय आहे, ती किती अष्टपैलू आहे हे आपल्याला दाखवायचं होतं. विणकाम हे एकप्रकारे आधुनिक कल्पनाशक्ती आणि प्राचीन कला यांचा संगम आहे, असं आपल्याला वाटत आल्याचं तो सांगतो.
‘सुरुवातीला मी भारताच्या दक्षिण भागातील वेंकटगिरी, उपपाडा आणि श्रीककुलम या ठिकाणच्या विणकर समुदायासोबत एकत्र झालो. निव्वळ २० कुटुंबांबरोबर सुरू केलेला हा प्रवास आज ८००हून जास्त घरांत पोहचला आहे आणि तो कधीच थांबू नये अशी माझी इच्छा आहे,’ असं गौरांग सांगतो.
गौरांगच्या प्रत्येक कलेक्शनमध्ये भारतीय परंपरा दिसून येते. त्याने भारतीय वस्त्र परंपरा जतन करण्याची जणून शपथच घेतली आहे. त्याबद्दल तो सांगतो, ‘आपल्याकडचे पारंपरिक विणकाम हा राष्ट्रीय वारसा आहे आणि तो जतन करणे ही मला माझी जबाबदारी वाटते. हातमागाच्या कापडाची फॅशन वर्ल्डमध्ये नेहमीच सर्वात सोयीस्कर, आरामदायी आणि शरीरासाठी अनुकूल फॅब्रिक म्हणून ओळख आहे. त्यामुळे त्याचा प्रचार आपणच करायला हवा’. गौरांगचे मुंबई, नवी दिल्ली, कोलकाता, बंगलोर, चेन्नई आणि हैदराबाद इथे स्टोअर्स आहेत. शिवाय, यूएसमध्येही त्याचे दोन स्टोअर्स आहेत. गौरांग हा खासकरून त्याच्या विणकामासाठी ओळखला जातो. विणकाम करत असतानाचे अनेक सुंदर किस्से गौरांगने सांगितले.
‘ज्यांना जामदानी माहिती नाही त्यांना मला जामदानी शिकवायचं होतं. आधीचे जे विणकर आहेत, त्यांची स्वत:ची अशी कामाची पद्धत असते. त्यामुळे नवीन बदल स्वीकारणं त्यांना त्रासदायक होत होतं, पण मी जसजसं शिकवू लागलो तसं त्यांना ते आवडू लागलं. कोटाचे विणकर नेहमी साधे साधे विणकाम करायचे पण मी त्यांना जरा बदल शिकवला आणि परिणामी त्यांनी ब्रायडल वेअर, इव्हिनिंग वेअर डिझाइन केले. सध्या आम्ही साडीवर राजा रवि वर्मा यांच्या ५४ चित्रांचे पुनर्निर्माण करण्यावर काम करत आहोत. या प्रकल्पासाठी ८०० रंगांचे धागे, नैसर्गिक रंग, विशेषज्ञांक गरजेचे आहेत, असं गौरांग सांगतो. गौरांग फक्त सेलिब्रिटींसाठीच कपडे बनवण्यासाठी फेमस आहे असं अजिबात नाही. त्याने बनवलेले किती तरी कलेक्शन सर्वसामान्य लोकांना परवडतील अशाच किमतीचे आहेत. त्याबद्दल तो सांगतो की प्रत्येक व्यक्ती स्वत:ची फॅशन स्टेटमेंट करतो. हातमागावरची साडी ही प्रत्येक स्त्रीच्या फॅशन स्टेटमेंटमध्ये असतेच. कापडाचा प्रत्येक तुकडा व्यक्तीचं व्यक्तित्व बदलायला, संस्कृती जपायला फायदेशीर ठरतो. माझं साडीवर खूप प्रेम आहे, जे प्रसिद्ध व्यक्तीच्या पलीकडे आहे आणि जे सगळ्यांसाठी आहे’. शेवटी गौरांग ठामपणे सांगतो की, भारतीय टेक्सटाइल्समध्ये अधिक प्रयोग करत फॅ शन डिझायनर्सनी शिकत राहिलं पाहिजे. सततच्या अभ्यास आणि प्रयोगातूनच तुम्हाला डिझायनर म्हणून तुमची शैली विकसित करता येते, अर्थात त्यासाठी धाडस करावं लागतं, हेही सांगायला तो विसरत नाही.