मितेश जोशी
गौरीगणपतीचे दिवस हे रूढी, परंपरा, रीतिरिवाजाच्या चौकटीत अडकलेले दिसतात. कित्येक वर्षांपासून चालत आलेल्या मंगलमूर्तीची प्रतिष्ठापना, पूजा, नैवेद्य, मखर या सगळ्या बाबी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत असताना त्या पिढीच्या तरुण प्रतिनिधीला या परंपरांविषयी काय वाटतं?, हे जाणून घेण्याचा ‘व्हिवा’ने केलेला प्रयत्न..
पणजोबांनी बनवलेला पाट, आजोबांनी बनवलेलं लाकडी मखर, पिढय़ान्पिढय़ा चालत आलेली परंपरा, आजीआजोबांनी मिळून पाडलेला पायंडा.. गौरीगणपतीच्या या पारंपरिक गोष्टी जपायचा प्रयत्न आजही अनेकांच्या घरी पहायला मिळतो. परंपरा किंवा हे रितीरिवाज त्याच पद्धतीने जोपासणारी तरूणाईही दिसून येते आहे. इतकेच नाही तर या परंपरांविषयी अधिक जाणून घेऊन त्या इतरांना समजावून सांगण्यातला आनंदही अनुभवणारी अशी ही पिढी आहे.
गणेशोत्सव आणि कोकण या समीकरणाविषयी अधिक बोलायलाच नको. तीन महिने आधीपासून तिकीट बुक करण्याची मारामारी असो किंवा आयत्यावेळी सुट्टी घेणं असो, कोकणी माणूस हा गावीच त्याच्या मुळ घरी गणपतीला जातो. मुंबईत राहणारा निलेश गवस या तरुणाचं गावही असंच गर्द झाडीने वेढलेलं. गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असणारं तळकट हे त्याचं गाव. कोकणी माणसाने आपला गणपती या घरातून त्या घरातही नेला नाही. गावची वेस ओलांडणं तर लांबच राहिलं. निलेश सांगतो, आमचं गावी मुळ घर आणि नवीन बांधलेलं घर अशी दोन घरं आहेत. एकूण ५० सदस्यांनी भरलेला आमचा गवस परिवार दरवर्षी गणपतीला गावी एकत्र येतो. मुंबईसारख्या शहरात लहानाचा मोठा झालेल्या निलेशला तुला तुझा गणपती अपुऱ्या सोयीसुविधा असलेल्या गावातून जे हवं ते मिळेल अशा मुंबई शहरात आणावासा नाही वाटत का?, असा प्रश्न विचारला असता तो म्हणतो, माझ्या मते गौरीगणपतीत आजची तरुण पिढी काय संपूर्ण कोकण पट्टाच हा शास्त्र, परंपरा यांच्या चौकटीत अडकलेला आहे. आमच्या मुळ घरी गेल्या ६९ वर्षांपासून आमचा गणपती बसतो. गणपती इथून दुसऱ्या घरी नेण्याचीसुद्धा आमच्याकडे परवानगी नाही. हा एक भाग झाला, मात्र आज गाव ही संकल्पनाच नष्ट होत चालली आहे. सोयीसुविधांनी युक्त आधुनिक रिसॉर्टने गावाचं रूप धारण केलेलं आहे. निव्वळ त्या रिसॉर्टमधला किंवा म्युझियममधला देखावा बघून नवीन पिढी गाव ही संकल्पना समजवून घेते आहे. त्यापेक्षा प्रत्येक कोकणी माणूस गणपती, होळीच्या निमित्ताने का होईना वर्षांतून दोनदा गावी परततो. त्यानिमित्ताने, त्यांची नवी-जुनी पिढी गावचा गणपती, तिथलं वातावरण, तिथली माणसं प्रत्यक्ष आहे तसं अनुभवते. प्रत्येक घरातून गणपतीसमोर सजलेली नैवेद्याची पानं, त्या पदार्थाची वेगळी चव हे अन्यत्र कुठेही सापडणार नाही. आणि म्हटलं तर कुठलीही गोष्ट इथून मुंबईत नेणं शक्य आहे, मात्र ही उर्जा तिथे नेऊ शकत नाही. आज जरी मी एका नामांकित कंपनीत व्यवस्थापक पदावर काम करत असलो तरीही मला माझा कॅमेरा घेऊन गणपतीत गावीच जायला आवडतं. गाव जंगलात असलं तरीही आम्हाला तिथल्या नैसर्गिक साधनसंपत्तीने मखर सजवायला आवडतं, असं तो आवर्जून सांगतो.
गणपतीचं मखर कसं करायचं?, हा अनेकांच्या मनातला प्रश्न असतो. मग इकोफ्रेंडली मखरांचा विचार केला जातो, काही ठिकाणी एकत्र जमून घरीच मखर बनवले जातात. दादरची नेमबाज पटू वैजयंती अजिंक्यकडे परंपरेने आलेलं दिव्यांचंच मखर केलं जातं. वैजयंती ही जेजेमध्ये कमर्शियल आर्टिस्ट म्हणून शिक्षण घेते आहे. वैजयंती आधुनिक मुंबईचे शिल्पकार, ‘भाऊचा धक्का’ बांधणारे लक्ष्मण हरिश्चंद्र अजिंक्य उर्फ भाऊ रसूल यांच्या कुटुंबातील आहे. त्यांच्याकडच्या मखराच वैशिष्टय म्हणजे दीडशे – पावणेदोनशे वर्षांपूर्वी भाऊंनी गणेशोत्सवाची ज्या साहित्याने सजावट केली होती, त्याच वस्तूंनी आजही सजावट केली जाते. जुन्या काळातील जाड घाटणीची तांब्या-पितळेची भांडी, शिसवी लाकडाचे, मिश्र धातूचे मोठमोठे चौरंग, पितळेच्या मोठया समया, रिद्धी-सिद्धी, हरणाच्या आकाराची उदबत्तीची घरे, लामण दिवे, त्या काळात रॉकेलवर चालणारे दिवे.. हे सारे काही पूर्वीचेच साहित्य आजही वापरले जाते. हे सर्व सामान वंशपरंपरागत चालत आलेले असून आम्ही ते सांभाळून ठेवले आहे. गणपतीच्या पूजेतील पंचामृताची भांडी ही औरंगजेबाची मुले आझम शहा व कामबक्ष यांच्या काळातील चलनी नाण्यांना चांदीचे जोडकाम देऊन बनवण्यात आली आहेत. गणपतीच्या मागचा आरसाही १५० वर्षांपूर्वीचा कारागिराने हाताने बनविलेला आहे. पितळेच्या झांजादेखील पत्रा ठोकून बनविलेल्या आहेत. ‘गणेश दर्शनाला येणाऱ्या लोकांना जुन्या काळातील आरास व तांबा, पितळ, बीड, जर्मन सिल्व्हर, चिनी माती यांपासून बनविलेल्या वस्तू बघून वेगळे काहीतरी बघितल्याचा आनंद होतो. यंदाचं आमचं शतकोत्तर अमृत महोत्सवी म्हणजेच १७५ वं वर्ष आहे’, असं वैजयंती सांगते.
ऋषीपंचमीच्या दिवशी पुण्यातील स्त्रियांची सकाळ इतर दिवसांपेक्षा जरा लवकरच होते. नऊ वार साडी, गळ्यात मोत्याचे दागिने, नाकात मोत्याची टपोरी नथ, असा पारंपारिक पोशाख करून पहाटे साडेचारच्या सुमारासच मंडळी दगडूशेठच्या दिशेला कूच करतात. ही लगबग असते, अथर्वशीर्ष पठणात सहभाग घेण्याची. ऋषीपंचमीच्या दिनी दगडूशेठ गणपती मंदिराचा व आसपासचा आसमंत शंखनाद, ओंकार व अथर्वशीर्ष पठणाने दुमदुमून जातो. हा आगळावेगळा उपक्रम राबविण्याची संकल्पना शुभांगी भालेराव व अरुण भालेराव यांची होती. १९८७ साली सुरू झालेल्या या उपक्रमाला यंदाच्या वर्षी ३२ वर्ष पूर्ण होत आहेत. भालेरावांची तिसरी तरुण पिढीसुद्धा या कार्यक्रमात खारीचा वाटा उचलते आहे. आदित्य भालेराव हा त्यांचा नातू म्हणतो, लहानपणापासून मी या वातावरणात वावरलो आहे. आजी आजोबांची श्रावणापासूनच धावपळ सुरू होते. अथर्वशीर्ष पठण शिबिर भरवणे, महिलांचे वेगवेगळे गट तयार करणे, प्रसादाची जबाबदारी वाटणे, स्वयंसेवकांना काम वाटून देणे अशा नाना कामात दोघेही गुंतून जातात. त्यात आमच्या घरीसुद्धा गणपती असतो ती एक जबाबदारी वेगळीच असते. आज या कार्यक्रमात जरी माझा फार मोठा सहभाग नसला तरीही आजीआजोबांनी पाडलेल्या या पायंडय़ाचा मला अभिमान आहे. या कार्यक्रमाचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे गेल्या ३० वर्षांत हजारो महिला व पुरुष या पठणात सहभागी होतात. परंतु, आतापर्यंत एकाही महिलेचा दागिना किंवा पुरुषाचं पाकीट, मोबाईल मारल्याची घटना घडलेली नाही. आजच्या धावपळीच्या युगातही अनेक तरुण-तरुणी इथे पारंपारिक पेहरावात हजर होतात. एका पिढीने सुरू केलेली ही परंपरा आज चौथ्या पिढीपर्यंत पोहोचते आहे याचा आनंद आणि अभिमान असल्याचे आदित्यने सांगितले.
नाशिक, औरंगाबाद, मराठवाडा या भागात गौरींना महालक्ष्मी म्हटले जाते. जेष्ठा व कनिष्ठा अशा दोन उभ्या महालक्ष्मीची पूजा या भागात केली जाते. नाशिकच्या भाग्यश्री देशपांडे या तरुणीकडे १०० वर्षांहून अधिक जुनी गौरींची परंपरा आहे. भाग्यश्री सांगते, आम्ही गौरी गेल्या १५ वर्षांपासून उभ्या करत आहोत. गौरींच्या नैवेद्याचा थाट काही औरच बघायला मिळतो. माझ्या घरी गणपतीतच दिवाळी असते, असं म्हणायला हरकत नाही. कारण शंकरपाळे, अनारसे,बेसनाचे लाडू, रव्याचे लाडू, करंजी असा दिवाळीचा गोड फराळ गौरींना नैवेद्यासाठी बनवला जातो. मी मुंबई विद्यापीठात शिकते आहे, पण गणपतीत दरवर्षी नाशिकला जाते. गौरी गणपती हे खरं नियमांनी बांधलेलं व्रत आहे. पण त्यानिमित्ताने होणारा हा आनंदोत्सव साजरा करायला आणि अनुभवायला कायमच आवडेल, असं ती सांगते.
डोंबिवलीच्या वेदांत जोशी या तरुणाकडे ७ खडय़ाच्या गौरींची ७० वर्षांची परंपरा आहे. वेदांत सांगतो, मी दरवर्षी त्या त्या वर्षांच्या ट्रेंडिंग विषयांचा अभ्यास करुन मखर तयार करतो. दीड दिवसाचा बाप्पा आता माझ्या हट्टापायी ५ दिवस गौरींसोबत राहतो. दीड दिवसांची परंपरा मोडण्यात घरच्यांनीसुद्धा साथ दिली. पूर्वी गणपती गावी होते. आता इथल्या घरी येतात. गावी वाहत्या पाण्यात हात घालून खडे गोळा केले जायचे, पण आता मुंबईत तशी सोय नसल्याने रस्त्याच्या कडेला असणारे खडे आणावे लागतात. काही घरात बऱ्याच जणांनी चांदीचे खडे केलेले मी पाहिले आहेत. स्वच्छ खडे उपलब्ध नसल्याने त्याच्यावरचा हा उपाय असावा. मात्र काही लोकांचा या खडय़ांना विरोध असलेलाही बघायला मिळतो. अर्थात, कालाय तस्मै नम: म्हणून पुढे चालायला हवं. गौरी गणपतीची ही परंपरा मी पुढे सांभाळू शकेन की नाही?, यावर आता विचार करण्यापेक्षा मी आता या सणाच्या परंपरेचा एक भाग आहे याचा जास्त आनंद घेतो, असं तो सांगतो. एकंदरीतच पिढय़ान्पिढय़ा चालत आलेले सणवार त्याच उत्साहाने साजरी करण्यात तरूणाई दंग आहे. मात्र त्याचवेळी त्यांच्यातली व्यवहारी विचार करण्याची वृत्तीही त्यांना आतून साद घालत राहते हेही जाणवते. प्रत्येक गोष्टीमागचे शास्त्र शोधून ते समजून घेऊन पुढे जाऊ पाहणारी ही तरुणाई परंपरा जपतानाच तो वारसा योग्य पद्धतीने पुढे नेण्यासाठीही आग्रही आहे हे विशेष!
viva@expressindia.com