आपण अनेकदा टीव्ही मालिका, रिअॅलिटी शोज बघतो. बहुतांशी वेळा ते केवळ मनोरंजन म्हणून बघतो आणि सोडून देतो. काही वेळा मात्र त्या शोचा आपल्या मनावर एक ठसा उमटतो आणि त्यातून पुढच्या वाटेची निश्चिती होते. त्याचं एक उदाहरण म्हणजे मीच. आठवीत असताना हॉटेल मॅनेजमेंट करायचं मनाशी ठरवलं होतं. तेव्हा लागणारी ‘मास्टर्स शेफ’ मालिका खूप आवडायची. त्यामुळे या क्षेत्राविषयी कुतूहल वाटू लागलं आणि याच क्षेत्रात जायचं ठरवलं. अर्थात तेव्हा अमुक विभागात शिकायचं हे ठरवलं नव्हतं. किंवा परदेशात जाऊन शिकायचं असंही काही डोक्यात नव्हतं. दोन अॅप्टिटय़ूड टेस्टचा कल मी हॉटेल मॅनेजमेंट करू शकतो, असा होता. घरच्यांनी माझ्या निर्णयाला कायमच पािठबा दिला. मुलुंडच्या केळकर महाविद्यालयातून बारावी कॉमर्स झालो. नंतर नेरुळच्या ‘आयटीएम-आयएचआयएम’मधून एक वर्षांची हॉटेल ऑपरेशन्स मॅनेजमेंटची पदविका घेतली. त्यामुळे या क्षेत्राची तोंडओळख झाली. या क्षेत्रात परदेशी जाऊन शिकण्याचा विचार मनात डोकावला आणि त्या दृष्टीने शोध घेऊ लागलो.
कॅनडा हा पर्यटनप्रधान देश आहे. पर्यटनाची संस्कृती तिथे चांगलीच रुजून फोफावलेली दिसते. त्यामुळे तिथे जाऊन शिकावं, असं मनात न आलं तरच नवल.
मी ‘जॉर्ज ब्राऊन’ कॉलेजमध्ये हॉटेल ऑपरेशन्स मॅनेजमेंटच्या दोन वर्षांच्या पदविकेसाठी अर्ज केला. हा अंडरग्रॅज्युएशन डिप्लोमा फारच कमी ठिकाणी उपलब्ध आहे. या अभ्यासक्रमाविषयी कळल्यावर तिथे राहाणाऱ्या काकांना चौकशी करायला सांगितली होती. शिवाय आणखी काही ठिकाणीही चौकशीअंती कॉलेज आणि अभ्यासक्रम चांगला असल्याचं कळलं. ‘जीबी एज्युकेशन’च्या (GeeBee education) मदतीने अर्जासाठी आवश्यक असणाऱ्या व्यावहारिक कागदपत्रांच्या पूर्तता केली. IELTS ची परीक्षा दिली होतीच. अर्ज करण्याआधी पहिल्यापासून नीट आखणी केल्याने गोष्टी तुलनेने सुरळीत झाल्या.
हा माझा पहिलाच परदेश प्रवास होता. परदेशात आपण एकटे चाललो आहोत. आपली जबाबदारी वाढली आहे हे सगळं डोक्यात होतं. त्यामुळे थोडीशी भीतीही वाटली होती. भारत ते कॅनडा असं थेट विमान असल्याने त्याविषयीचा ताण नव्हता. विमानतळावर काका भेटल्यावर दिलासा मिळाला आणि ताण कमी झाला. सुरुवातीचे काही दिवस काकांकडे राहिलो. नंतर मुंबईतल्या मित्रांसोबत फ्लॅट शेअर केला. हे घर कॉलेजपासून लांब होतं. त्यामुळे मधल्या काळात ते घर बदलल्याने घर-कॉलेजचं अंतर कमी झालं आहे. सगळ्याच गोष्टी नवीन होत्या. त्यामुळे स्थिरावायला काही दिवस गेले. काही महत्त्वाचे नियम आणि आवश्यक गोष्टी काकांनी सांगून ठेवल्या होत्या. गेलो तेव्हा सप्टेंबर महिना होता. तेवढी थंडी नव्हती. खूप थंडी पडायला लागली ती नोव्हेंबरपासून. त्यामुळे टप्प्याटप्याने थंडीची सवय होत गेली. एका टप्प्यावर थंडी जाणवली; कारण मुंबईत इतकी थंडी कधीच अनुभवली नव्हती. पण त्यामुळे रुटीनमध्ये काहीही बदल झाला नाही.
इंडक्शनच्या दिवशी कॉलेज, विभाग आणि अभ्यासक्रमाविषयी माहिती देण्यात आली. नियम-व्यवस्था सांगितली गेली. सुरुवातीच्या काळात बऱ्याच ग्रूप असाइन्मेंट होत्या. थोडय़ाफार ओळखी होऊन आम्ही आपापले ग्रूप केले होते. त्यानंतर प्राध्यापकांनी शिताफीने आमच्या सगळ्यांच्या ग्रूपची सतत अदलाबदल केली. त्यामुळे सगळ्या वर्गाची अर्थात विद्यार्थ्यांची एकमेकांशी ओळख झाली. इथले प्राध्यापक खूप सौहार्दानं आणि मित्रत्वाच्या नात्याने वागवतात. कितीही प्रश्न विचारले, तरी त्यांची उत्तरं देतात. ऑनलाइनही ते कनेक्टेड असतात. ईमेलद्वारे विचारलेल्या प्रश्नांना लगेच प्रतिसाद दिला जातो.
माझ्या दोन सेमिस्टर्स पूर्ण झाल्या आहेत. आपण करिअरच्या योग्य मार्गावर चाललो आहोत, हे जाणवतं आहे. या अभ्यासक्रमात आपण अमुक गोष्टी शिकाव्यात, असं डोक्यात होतं, ते मिळतं आहे. या अभ्यासक्रमात फ्रण्ट डेस्क, मार्केटिंग, एचआर, हाऊस कीपिंग, फूड अँण्ड बेव्हरेज आदी गोष्टी शिकवल्या जात आहेत. प्रॅक्टिकल आणि थिअरी या दोन्ही गोष्टी आहेत. वर्गात विद्यार्थ्यांना एकमेकांशी आणि प्राध्यापकांशी संवाद साधायला प्रवृत्त केलं जातं. चर्चा करण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं. आमच्यापकी काहींची इंग्रजी ही दुसरी भाषा आहे. त्यामुळे बऱ्याच प्राध्यापकांनी सांगितलं की, इंग्रजी बोला. चूक होईल म्हणून बिचकून जाऊ नका. घाबरू नका. आम्ही तुमची चूक सुधारायला मदत करू. ग्रूप असाइन्मेंट दिल्या गेल्याने ओळखी झाल्या, अभ्यास करताना मजा आली आणि टीमवर्कचं महत्त्वही आपसूकच अधोरेखित झालं. याआधी असं टीमवर्क कधीच केलं नव्हतं. शिवाय वेळेच्या व्यवस्थापनाचं गणित सुटलं. कॉलेजतर्फे जॉब फेअर आयोजित केली जाते. रेझ्युमे कसे तयार करावे वगरे व्यावहारिक गोष्टी याच ओघात शिकवल्या गेल्या. फेअरच्या माध्यमातून संपर्क साधून किंवा वैयक्तिक पुढे चौथ्या सेमिस्टरला इंटर्नशिप करायची आहे. ग्रंथालयातील सोयी-सुविधांचा पुरेपूर वापर केला जातो.
कॉलेजमध्ये सतत काही ना काही इव्हेंट्स आयोजित केले जातात. आमच्या सेंट जेम्स या कॅम्पसमध्ये विविध देशांचे-धर्माचे सण-उत्सव साजरे केले जातात. दिवाळी मोठय़ा प्रमाणात साजरी करण्यात आली. एका पार्टीत फक्त बॉलीवूडची गाणी लावण्यात आली होती. माझ्या वर्गात भारतीयांसह फ्रान्स, इराण, कझाकिस्तान, स्थानिक मिळून २५-३० लहान-मोठय़ा वयोगटातील विद्यार्थी आहेत. काहीजण या क्षेत्रात काम करत असून केवळ पदविकेच्या प्रमाणपत्रासाठी हा अभ्यासक्रम शिकायला आले आहेत. एका प्रोजेक्टमध्ये ग्रूपमधल्या दोन-तीन अनुभवी विद्यार्थ्यांनी सांगितलेल्या माहितीमुळे आमचं प्रोजेक्ट अधिक चांगलं झालं. प्राध्यापकांनी आमचं कौतुक केलं. आपापल्या देशांतील घडामोडी, सकारात्मक गोष्टी, करिअरच्या संधी हे आमच्या गप्पांचे विषय असतात. काहीजण भारतात येऊन गेलेले असून त्यांना पुन्हा भारतात यायची इच्छा आहे.
घरी असताना मला कुठल्याही कामाची सवय नव्हती. जवळपास सगळ्या गोष्टी हातातल्या हातात मिळायच्या. त्यामुळे अगदी सुरुवातीच्या काळात कामाची सवय व्हायला थोडासा अवधी गेला. पोळी-भाजी, वरण-भात असे काही मोजके पदार्थ कसे करायचे ते बघून ठेवलं होतं. इथे आल्यावर एखादा पदार्थ करताना काही अडलं-नडलं तर आईला व्हिडीओ कॉल करून विचारायचो. माझे फ्लॅटमेट कलिनरीचा अभ्यासक्रम शिकत असल्याने कधी त्यांना विचारायचो. काही वेळा हे मित्र सगळ्यांसाठीचा स्वयंपाक करतात आणि आपलं काम हलकं होतं. स्वयंपाक कधी एकटय़ाचाच तर कधी एकत्र करतो. घरकाम आळीपाळीने वाटून घेतलं आहे. सगळे एकमेकांना समजून घेतात. सुरुवातीला अभ्यास आणि घरकाम या दोन्ही गोष्टी साधताना किंचितशी दमछाक झाली होती. माझा एक मित्र आणि त्याचा भाऊ यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केल्याने मोठी मदतच झाली.
मी नायगारा फॉल्सला माझ्या मित्राच्या भावाबरोबर गेलो होतो. फारच छान अनुभव होता तो. एक भारी गोष्ट म्हणजे सकाळी आणि रात्रीच्या वेळीही नायगारा फॉल्स पाहता आला. नायगारा फॉल्स पहिल्यांदा बघणं हा आयुष्यातला एक अविस्मरणीय प्रसंग म्हणता येईल. इथे आल्यापासून अनेक चांगल्या गोष्टी शिकलो. त्यातली एक म्हणजे समोरच्या व्यक्तीला ‘थँक्यू‘ आणि ‘सॉरी‘ म्हणणं. ‘थँक्यू‘ म्हटल्याने त्याचाही दिवस चांगला जाऊ शकतो, हे कळलं. स्वावलंबी झाल्याने आत्मविश्वास दुणावला आणि जगभरात आता कुठेही एकटा जाऊ शकतो, राहू शकतो हे जाणवलं. आताशा वेळ मिळाला की, अनेकदा जॉगिंगला जातो. शिक्षण संपल्यावर इथेच काही काळ कामाचा अनुभव घ्यायचा आहे. त्यानंतर पुढच्या गोष्टी ठरवणार आहे. लहानपणी टीव्हीवरील एका शोमुळे प्रेरित झालो, पुढे या क्षेत्रात यायचा निर्णय घेतला आणि एक स्वप्न पाहिलं. हे स्वप्न नक्कीच साकारेन..
कानमंत्र
- परिपूर्ण मानसिक तयारी करावी आणि नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा.
- गगनभरारी घ्यायची जिद्द मनात बाळगा. अभ्यासातले सातत्य आणि मेहनतीमुळे पंखांत बळ न भरलं तरच नवल.
शब्दांकन : राधिका कुंटे
viva@expressindia.com