लग्नाचं योग्य वय नेमकं कोणतं? विशेषत: मुलीचं लग्न योग्य वयात झालंच पाहिजे हो.. असं म्हणणारे अनेक जण दिसतात. खरंच असं योग्य वय असतं का? अशाच एका सो कॉल्ड लग्नाळू वयातल्या मुलीच्या वॉलवरची ही पोस्ट.
‘सग्गळं काही योग्य त्या वयात आणि योग्य त्या वेळी व्हायला हवं हो!! नाहीतर मग पुढे कॉम्प्लिकेशन्स नको वाढायला!’ -जवळच्या नात्यातल्या बायका किंवा आईच्या मैत्रिणी एकत्र जमल्या की सध्या या बायकांची ही एकच ‘रट’ लागलेली असते. जसं काही मी बोहल्यावर चढलेच नाही ना, तर तिसरं महायुद्धच घडून येईल असं याचं म्हणणं!! कॉम्प्लिकेशन्स येतील तर येऊ दे, ते मीच तर सावरणार आहे ना.. ‘वयात आलेली पोर अन् जिवाला नुसता घोर..’ असं म्हणणाऱ्या सोसायटीतल्या काकूंचा तर आजकाल वीटच यायला लागलाय मला!! जसं काही मी ‘हो’ म्हटलंच नाही ना, तर यांच्याच घरची उष्टावळ काढली जाणार नाही.. काय करायचं या बायकांचं.. त्यात परत आईचं टेन्शन वाढवतात ते वेगळंच.. आणि मग ती येऊन माझ्यावर बरसते- ‘‘इतकी मुलं पाहिली. आता तरी मनावर घ्या आणि पसंत करा एखादा..’’ आता मुलगा म्हणजे काय िवडो शॉिपग करताना आवडणारा ड्रेस आहे काय? पाहिला आणि पसंत केला!!!
हं.. खरंतर मीही ही अशी २४-२५ च्या नाजूक सापळ्यात अडकलेले. हो!! सापळाच.. कारण लग्नाच्या बंधनात (की बेडय़ांत) अडकण्याचं हे म्हणे लग्नाळू वय समजलं जातं. योग्य वयात लग्न झालंच पाहिजे हो, असं म्हणणाऱ्या समाजात तर हा सापळाच म्हणायचा. अरे हे योग्य वय कुणी ठरवलं? आणि का? आजी सांगते तिचं योग्य वयात म्हणजे वयाच्या १८ व्या वर्षी लग्न झालेलं, आईचंही लग्न योग्य वयात म्हणजे २२ व्या वर्षी झालेलं.. आई सांगते, तिच्या आजीचं लग्न वयाच्या १५ व्या वर्षी म्हणजे त्या जमान्याप्रमाणे योग्य वयात झालेलं.. आता तीन पिढय़ांतलं हे सो कॉल्ड योग्य वय बघा म्हणावं.. म्हणजे लक्षात येईल माझा मुद्दा.
मला ना मुळात आपल्या या सिस्टीममध्येच इनकम्प्लिटनेस वाटतो.. पणजी, आजी, आई या सगळ्याच या लग्न नामक (भयंकर!) प्रोसेसमधून गेलेल्या.. पण म्हणून आमच्या पिढीनेसुद्धा त्याच साचेबद्ध वाटेवरून चालायचं का? ज्याची साधी ना ओळख ना पाळख.. त्याचं नाव काय असेल, माहीत नाही.. वर्ण काय, काळा
लहानपणी भातुकलीचा खेळ खेळताना बाहुलीसाठी नवरा शोधताना नाही बाई कधी एवढा विचार केला.. अगदी सरळ-साधी-सोप्पी आणि हवीहवीशी प्रोसेस वाटायची ती.. ‘माझ्या बाहुलीला मिळाला नवरा, मग मला नवरा कधी मिळणार गं?’ असे बालिश प्रश्न आईला विचारताना आजच्या या सगळ्या खेळाची कल्पनाही नव्हती.. २३ चा उंबरठा ओलांडते न ओलांडते, तोच नातेवाइकांच्या चौकशा सुरू झाल्या..’ काय मग? कधी बांधताय गाठी?’’ मला तर असं वाटायचं की माझ्या गाठी बांधल्या गेल्या नाहीत, तर यांच्या घरच्या अॅडजस्टमेन्ट्स अपूर्ण राहतील आणि यांची बॅलन्स शिटच टॅली होणार नाही..!!!
हे सगळं कमी म्हणून की काय, पण नंतर मग ते मॅट्रिमोनीवरचं रजिस्ट्रेशन.. त्या अख्ख्या प्रोसेसने तर अर्धा जीव घेतला माझा.. असं वाटलं, त्यापेक्षा एखाद्या मुलाच्या प्रेमात पडले असते तर बरं झालं असतं.. मॅट्रिमोनीवर ते फोटोज् टाकणं, मग स्वत:चं डिस्क्रिप्शन लिहिण्यासाठी अख्खा तासभर विचार.. जसं काही लग्न म्हणजे परीक्षा आहे आणि त्यात ‘मायसेल्फ’ हा निबंध लिहायला सांगितलाय. तरीसुद्धा काहीतरी अपूर्णय म्हणून भरात भर म्हणून ते मुलाबद्दलच्या एक्स्पेक्टेशन्स टाकणं.. मुलगा अमुक अमुक डिग्री घेतलेला हवा, सॅलरी चांगली, अमुक अमुक ठिकाणी घर, वगरे, वगरे.. (तरी मी पर्सनॅलिटी टाइप आणि बॉडी फिगर या असल्या क्रायटेरियाज्च्या भानगडीत पडलेच नाही.. ते देणं म्हणजे एखाद्या मुलाला ‘हेल्थ चेकअप्’साठी इन्व्हाइट करण्यासारखं वाटलं मला..!!) खरंतर मॅट्रिमोनीवर जुळलेल्या लग्नांपकी दोन्ही बाजूंच्या किती एक्स्पेक्टेशन्स पूर्ण होत असतील, याबाबत प्रश्नच आहे मला.. परत ई-कुंडली हा प्रकारच वेगळा.. हे सगळंच पाहून आपण नक्की कुठल्या काळात जगतोय हाच प्रश्न पडला मला आणि त्यावरून भारतीयांचं काही खरं नाही असंही वाटतं..!!!
इतकं सगळं केल्यानंतर मग कुठे ते समोरून प्रपोजल्स येणं.. त्यातही कित्येकांकडून रिजेक्शन, तर कित्येक बावळट, आगाऊ, लाडावलेल्या मुलांना माझं स्वत:हून रिजेक्ट करणं.. कांदे-पोह्य़ांचा कार्यक्रम तर बाप रे!!! मला तर ते कांदे-पोहे (मॉडर्न चिवडा) नेऊन देताना तर असा फील येत होता की मी माझं शाळेचं प्रगतिपुस्तकच नेऊन दाखवतेय त्यांना!! इतकं सगळं करूनही मुलगा मिळाला नाही तो नाहीच!!! मग काय तर अमुक अमुक ज्योतिषांकडेच जाऊ या आणि ते सांगतील ते ऐकू या.. मग त्यांनी दिलेले ते मंत्र आणि तंत्र!! जबरदस्तीने म्हणत असले तरी म्हणायला चांगले वाटले मला, कारण तेवढीच संस्कृतची रिव्हिजन झाली..
पण खरंतर ही सगळी प्रोसेस तशी थोडीफार जीवघेणी आणि आपले पेशन्स टेस्ट करणारी असली ना, तरीसुद्धा हा तोच पीरियड असतो, ज्यात आई आणि मुलीचे बंध एका वेगळ्याच पातळीवर जोडले जातात. कारण मुलगी अशा पायरीवर पोचलेली असते जिथं तिचा एक पाय सासरच्या माजघरात आणि एक पाय माहेरच्या अंगणात अडकलेला असतो. एकाच वेळेला आईच्या रूपातलं स्वत:चं भविष्य आणि तिच्या स्वत:तलं तिचं सरू पाहणारं अवखळ बालपण कम तारुण्य ती अनुभवत असते.. स्वत:च्या भविष्याची आणि ‘त्याच्या’ स्वप्नांची हुरहुरसुद्धा ती अनुभवत असते.. ‘त्याला’ अगदी ‘सर्वार्थाने’ स्वीकारण्यासाठी लागणारे गट्सदेखील तिला आईकडूनच मिळत असतात.. म्हणूनच की काय, पण आतापर्यंत राउडी आणि टॉम बॉय म्हणून जगलेल्या मुलीलाही, एक अनोखं ‘मुलगी’पण प्राप्त होत असतं.. नवरा नामक व्यक्तीच्या आयुष्याच्या वर्तुळात, ज्याला ‘सासर’ असं डिफाईन केलं जातं, त्यात तिचं प्रवेशणं आणि तिनेच मांडलेल्या मोठय़ा भातुकलीच्या अर्थपूर्ण खेळात शरीर आणि मन दोघांनाही सॅटिसफाय करण्याची तिची घालमेल सुरू होते.. या सगळ्याच गोष्टींना लीलया सांभाळत तिचं एक ट्रान्सफॉम्रेशन घडत असतं..
यंदा कर्तव्य आहे !
लग्नाचं योग्य वय नेमकं कोणतं? विशेषत: मुलीचं लग्न योग्य वयात झालंच पाहिजे हो.. असं म्हणणारे अनेक जण दिसतात. खरंच असं योग्य वय असतं का?
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 18-10-2013 at 01:11 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Getting married this year