|| तेजश्री गायकवाड
प्रत्येक मुलगी आणि मुलासाठी, त्यांच्या कुटुंबासाठी लग्न म्हणजे आयुष्यातील मोठा सोहळा असतो. तो नीट आणि उत्तमरीत्या पार पडावा असं सगळ्यांनाच वाटत असतं. लग्न म्हटलं की अनेक गोष्टी येतात. कपडय़ांपासून जेवणाच्या मेनूपर्यंत सगळ्या गोष्टी काय असाव्यात?, हे निश्चित ठरवून मगच अंतिम निवड केली जाते. त्यात आवडीपासून, चांगलं आहे का हे तपासत शेवटी बजेटमध्ये आहे की नाही?, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तपासून घ्यावी लागतात. त्यातही लग्नाचे कपडे आणि लुक सगळ्यात महत्त्वाचा आणि त्यासाठी महत्त्वाची ठरते ती ट्रायल..
लग्न भव्य आणि लक्षात राहील असं करायचं यावर प्रत्येक जण ठाम असतो, मात्र हा भव्यदिव्यपणा बजेटमध्येही बसवायचा असतो. यात प्राधान्याने महत्त्वाचा ठरतो तो वेडिंग ड्रेस. लग्नात वधू आणि वर या दोघांसह प्रत्येकालाच डिझायनर कपडे घालायची हौस असते. त्यातही विधींप्रमाणे दोन-तीन-चार असे वेगवेगळे लुक आणि ड्रेस ठरवायचे असतात. अगदीच डिझायनर कपडे घालता आले नाहीत तरी डिझायनरने सेट केलेले ट्रेण्ड फॉलो होतील अशा पद्धतीने वेडिंग ड्रेस निवडण्याकडे एकंदरीतच आजच्या पिढीला कल आहे. ड्रेसबरोबरच महत्त्वाचा असतो तो मेकअप आणि ज्वेलरी. ड्रेस, मेकअप आणि ज्वेलरी असं सगळं मिळूनच तर लुकपूर्ण होतो. सध्या या संपूर्ण लुकची ट्रायल लग्नाच्या काही दिवस आधीच घेतली जाते. किंबहुना, फायनल डेपेक्षाही या ट्रायल डेची क्रेझ गेली काही वर्ष वाढते आहे.
या लुक ट्रायल क्रेझबदद्ल ‘कलर मी क्रेझी फॅमिली सलोन आणि वेलनेस’च्या हरप्रीत मनोचा सांगतात, ‘मी गेली अनेक वर्षे या इंडस्ट्रीमध्ये काम करते आहे. काही वर्षांच्या गॅपनंतर लग्नाच्या ट्रेण्डमध्ये सातत्याने काही ना काही बदल हे होतच असतात. गेल्या वर्षांपासून संपूर्ण लुक ट्राय करण्यावर अनेक तरुणींचा भर आहे. प्रत्येक नववधूच्या डोक्यात आपला असा एक लुक असतोच जो त्यांना लग्नाच्या दिवशी स्वत:साठी करायचा असतो. नेमक्या दिवशी काही चुकू नये, लुक बिघडू नये म्हणून आधीच ट्रायल घ्यायला सुरवात केली जाते’. वेडिंग लूकसाठी त्यांच्याकडे येणाऱ्या नववधू येताना स्वत:च अनेक रेफरन्स फोटो घेऊन येतात, असं त्या सांगतात. त्यावर मग त्यांनी आणलेले लूक्स पाहून, चर्चा करून त्यांना कोणता लुक छान वाटेल हे आम्ही सांगतो. नंतर आम्ही त्यातले निवडलेले लुक्स त्यांच्यावर ट्राय करून दाखवतो. त्यामुळे त्यांना अंदाजही येतो आणि कोणता लुक करायचा तेही फायनल करायला मदत होते, अशी माहिती त्यांनी दिली.
सुरूवातीला वेडिंग ड्रेस परफेक्ट होणं ही एकच मोठी गरज होती. आता मात्र जसा वेडिंग ड्रेस पूर्ण झाला की प्रत्यक्षात तो परिधान करायचा. आणि ड्रेसवर मग ज्वेलरी निवडून त्याचाही लूक ट्राय केला जातो. शिवाय, त्याचवेळी मेकअपचाही विचार केला जातो, असं हरप्रीत सांगतात. ‘आताच्या मुलींना पूर्वीसारखा संपूर्ण गोरा लुकच हवा असं अजिबात नाही. उलट त्यांना त्यांच्या वर्णाप्रमाणेच फाऊंडेशन लावून नैसर्गिक सहज असा लूक ठेवायला आवडतो. हा बदल खरंच खूप मोठा आणि महत्वाचा आहे’, असं त्या सांगतात. मेकअपच्या बरोबरीने हेअरस्टाईलमध्येही त्या तितकाच रस घेतात, असं हरप्रीतचं ठाम मत आहे. ‘शहरात काम करणाऱ्या अनेक तरुणींचे केस हे छोटे असतात, अनेकदा केस गळतीची समस्याही भर घालत असते. मग अशावेळी पफ काढून मेस्सी बन, आणि केसाचा व्हॉल्यूम जास्त दिसेल अशी केशरचना केली जाते. अनेकींना लग्नाच्या दिवशी मोठे केस हवे असतात. त्यामुळेचे हेअर एक्स्टेन्शनची खूप मागणी असते. लग्नाच्या विधींप्रमाणे शक्यतोवर केसांची स्टाईल ही बांधलेल्या पध्दतीचीच असते. तर प्री किंवा पोस्ट अर्थात मेंदी, संगीत आणि रिसेप्शन अशा कार्यक्रमात मोकळ्या केशरचनेला पसंती दिली जाते. हेअरस्टाईलचे लुकही आधीच ट्राय केले जातात’, असं हरप्रीत यांनी सांगितलं.
कितीही पाश्चिमात्य कपडे, दागिने यांचा प्रभाव असला तरी लग्नात मराठी मुलींना आजही पारंपारिक नथ, नऊवारी साडी असा लुक खूप आवडतो. याबद्दल गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ या इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या ‘मेकओव्हर ब्युटी पार्लर’च्या माधवी गायकवाड सांगतात, ‘नववधूंना आजही अस्सल मराठमोळा लुक जास्त भावतो. मराठी लग्न असलं तरी हल्ली सगळेच मेंदी, हळदी, संगीत, प्री वेडिंग, रिसेप्शन असे साग्रसंगीत कार्यक्रम आवर्जून करतात. यामध्ये अगदी लग्नात नाही तर कोणत्या तरी एका कार्यक्रमाला तरी संपूर्ण मराठमोळा साजश्रृंगार केला जातो.आधी लग्नाचे कपडे खरेदी केले जातात आणि मग मुली लुक फायनल करायला आमच्याकडे येतात. त्यामुळे आम्ही आधी त्यांनी खरेदी केलेला ड्रेस बघतो आणि त्यांना तो कशा पद्धतीने प्रेझेंट करणं अपेक्षित आहे हे समजून घेतो. लग्नात अनेकदा सोन्याचीच ज्वेलरी असते. त्यातही आधीच्या काळातली टिपिकल ज्वेलरी राहिलेली नाही. सोन्याच्या दागिन्यांचेही अनेक प्रकार आले आहेत. त्यामुळे सोन्याच्या ज्वेलरीवरही हटके लुक करता येतात’. ड्रेस आणि ज्वेलरी निश्चित झाल्यानंतर मेकअप फायनल केला जातो, असं त्या सांगतात. सध्या सोशल मीडियामुळे मेकअप एक्स्पर्टनाही रेफरन्सेस काढावे लागत नाहीत, ते मुलींकडूनच येतात, ही बाब माधवी यांनीही अधोरेखित केली. अर्थात, आपण काढलेल्या फोटोप्रमाणे आपला लुक सुंदर दिसेल की नाही, याबद्दल त्यांना शंका असते. म्हणून मग ते लुक आम्ही प्रत्यक्ष त्यांच्यावर करून दाखवतो. अनेकदा लुक्स करून फोटोसुद्धा काढले जातात. त्यामुळे फोटोमध्ये आपण कसे दिसू हेही नीट लक्षात येतं. लुक अगदीच लाऊड असेल किंवा अगदीच साधा असेल तर या गोष्टी एरव्ही चटकन कळत नाहीत, फोटोत मात्र त्या पकडल्या जातात. त्यामुळे फोटोही काढून घेतले जातात. मेकअप म्हणजे अगदी डोक्यावर पदर घेऊनही आपण कसे दिसतो आहोत, आपला मेकअप बिघडत नाही ना, आपण केलेला लुक लपत नाही आहे ना, अशी बारीकसारीक गोष्टी तपासल्या जातात, अशी माहितीही त्यांनी दिली.
एकंदरीतच आजची पिढी प्रत्येक ठिकाणी आपण उत्तम, परफेक्ट दिसायला हवं, याबद्दल आग्रही असते. त्यामुळे आयत्या वेळी कुठलीही गोष्ट चुकून फजिती होऊ नये, यासाठी आधीच काटेकोर काळजी घेतली जाते. लूक ट्रायल हे त्यासाठीचं महत्त्वाचं अस्त्र आहे. आणि या अस्त्राचा प्रभावी वापर हा केवळ लग्नसमारंभापुरता मर्यादित राहिलेला नाही. तर ऑफिस पार्टीपासून एखाद्या समारंभात मिरवण्यापर्यंत सगळीकडेच परफेक्ट दिसावे यासाठी लूक ट्रायल ही मस्ट झाली आहे.
viva@expressindia.com