‘ती’ एकटी असो, बहिणी-बहिणी असोत किंवा बहीण-भाऊ असोत.. ‘तिची’ जडणघडण.. ‘तिचं’ संगोपन.. ‘तिला’ दिली गेलेली स्पेस.. या सगळ्यांतून त्या त्या घराचं आणि ओघानं समाजमनाचं प्रतििबब दिसून येतं. ‘जागतिक महिला दिना’निमित्तानं मुलींच्या संगोपनाविषयीच्या या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया..

मी एकटीच आहे. एकटी असले तरी माझं संगोपन चारचौघांप्रमाणंच झालंय. माझ्या कोणत्याही गोष्टीला आईबाबांनी विरोध केलेला नाही. मग ते नाटकाची तालीम असू दे किंवा एन्ट्रन्सशिप असू दे. अर्थात मला यायला उशीर होतो तेव्हा माझी काळजी घेतली जाते. बाहेर जाताना किंवा तिथून निघाल्यावर घरी फोन करून सांगितलं तर त्यांच्या जिवाची घालमेल थोडी कमी होते, म्हणून मी तसं करते. आपली अशी जिवापाड काळजी घेणारं कुणीतरी आहे, हे स्पेशल फििलग असतं. त्यामुळं या गोष्टींचा अजिबात त्रास होत नाही. आपले पालक आपली काळजी करताहेत, कारण आज आजूबाजूला तशा घटना घडताहेत. काही पुरुषांची नजर वाईट असली म्हणजे सगळे पुरुष वाईट नजरेचे असतील असं नाही. उलट वाईट पुरुषांमुळं चांगल्या पुरुषांची किंमत कितीतरी वाढल्येय. अजूनही आजूबाजूला चांगली माणसं आहेत, असं मला वाटतं. करिअरिस्ट व्हायची इच्छा असणाऱ्या मुलींनी न घाबरून चालणार नाही. त्यांनी स्ट्राँग व्हायलाच पाहिजे.
सुप्रिया शेटे, फर्स्ट इयर, मास मीडिया, बिर्ला कॉलेज

माझ्या घरी मी आणि माझा भाऊ आम्हाला वाढवताना आमच्या आई-बाबांनी आमच्यात कधीही भेदभाव नाही केला. दोघांनाही कायम इक्वली फ्रीडम दिलं गेलं. आईबाबांनी मला प्रत्येक गोष्टीचं एक्स्पोजर दिलं. काही वेळा असं होतं की, मला एखादी गोष्ट करायला जमेल की नाही, असं वाटत असतं. अशा वेळी धीर देऊन ते कायम हेच सांगतात की, ‘तू ही गोष्ट करून बघ, तरच तुला ते जमतंय की नाही, हे कळेल,’ असं कधीही झालं नाही की, मी मुलगी आहे म्हणून अमुक वेळेत घरी यायला हवं. ते फक्त एवढंच सांगतात की, ‘स्वतची काळजी घे.’ लहानपणापासूनच त्यांनी मला स्वत:ची काळजी घ्यायला शिकवलंय. मला इंडिपेंडंट जगायला शिकवलंय. त्यांनी माझ्या प्रत्येक डिसिजनमध्ये मला सपोर्ट केलाय. त्यांनी माझी पर्सनॅलिटी स्ट्राँग केल्येय.
– सायली सोमण,
टी.वाय. बीएफए (अप्लाइड आर्ट्स),
भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाइन आर्ट्स, पुणे.

माझ्या घरात मला महत्त्वाचं स्थान आहे. माझे वडील कलाशिक्षक आणि आई शिक्षिका असल्यानं माझ्यावर अगदी लहानपणापासूनच चांगले संस्कार झाल्येत. आईबाबा माझ्याबरोबर अगदी फ्रेण्डली आहेत. कलेचा वारसा माझ्या आजोबांपासूनच चालत आला असल्यानं शालेय जीवनापासूनच मी चित्रकला, वक्तृत्व आणि नृत्य स्पध्रेत सहभागी होऊन यश प्राप्त केलंय. नृत्यकलेची आवड असल्यानं सध्या मी रहेनादीदी पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली ‘कलाराज्य अकादमी’त कथ्थक नृत्याचे धडे गिरवत्येय. सोसायटीच्या स्थानिक कार्यक्रमांत मुलींचे डान्सही कोरिओग्राफ करते. कला क्षेत्रातील ही मुळाक्षरं गिरवण्यासाठी घरून मला नेहमीच प्रोत्साहन मिळालंय नि मिळत राहील.
गार्गी बागडे, एफ.वाय.बी.कॉम, आर. ए. पोदार कॉलेज

आम्हा दोघी बहिणींना अतिशय चांगल्या प्रकारे वाढवलंय. आम्हा दोघींमध्ये त्यांनी लहान-मोठी असा कधीच भेदभाव केला नाही. किंबहुना मुलगा असता तरी असा काही भेदभाव त्यांनी केला असता, असं वाटत नाही. स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराचा विषय अनेकदा आमच्या गप्पांमध्ये असतो. या सगळ्या घडामोडी बघून आईबाबा आमची खूप खूप काळजी घेतात. कुठंही पाठवताना विचार करतात. नुकतीच माझी ‘बीएमएस’ची इंडस्ट्रियल व्हिजिट होती हैदराबादला. तिथं झालेल्या बॉम्बस्फोटांच्या पाश्र्वभूमीवर मला पाठवावं की नाही, अशा दुविधेत ते सापडले होते. पण माझ्या हट्टाखातर त्यांनी मला पाठवलं. मला सुखरूप घरी पाहिल्यावर त्यांचा जीव भांडय़ात पडला.  
– समीक्षा कदम,
टी.वाय.बी.एम.एस., रुपारेल कॉलेज

आम्ही दोघी बहिणी असलो तरी आमच्या पालकांनी त्यांना मुलगा नाही, याची जाणीव कधी करून दिली नाही. लहानपणासून सगळ्याच गोष्टींसाठी प्रोत्साहन देत आले. घरात सगळ्यात लहान असल्यामुळं जितके लाड होतात, तितकेच चुकल्यावर ओरडादेखील मिळतो. कुठल्याही गोष्टीसाठी कधीही थेट हो किंवा नाही म्हणाले नाहीत. आधी विचारपूस करून योग्य वाटलं तरच परवानगी देतात. नृत्य आणि अभिनयाची माझी लहानपणापासूनची आवड त्यांनी जोपासली. स्मिताताई तळवलकरांसोबतची बालनाटय़ं असोत किंवा नृत्याच्या कार्यक्रमांचे दौरे असोत, त्यांनी आधी सगळी माहिती काढून मग जायला परवानगी दिली. शाळेतला अभ्यास असो, हेडगर्लची कामं असोत किंवा आता कॉलेजमधल्या फेस्टिव्हलची धावपळ असो, प्रत्येक वेळी त्यांनी मला सक्रिय पािठबा दिलाय. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याजोगा कणखरपणा अंगी बाणवण्याचं बळ आम्हाला आईबाबांनी दिलंय. ‘आम्हाला आमच्या मुलींच्या नावानं ओळखलं जातं, हे आमचं भाग्य,’ असं ते नेहमी म्हणतात. हे ऐकल्यावर आम्हा दोघींना फार अभिमानास्पद वाटतं.     
– अक्षया नाईक, एस.वाय.जे.सी.आर्ट्स, रामनारायण रुईया कॉलेज