‘देवी’ नि तिची असंख्य रूपं.. असंख्य नावं. प्रांत, भाषा, पूजाविधी कितीही वेगवेगळे असले तरी त्यातलं ध्येय अगदी स्पष्ट नि समान असतं. ते म्हणजे मुलांनी ‘आई’ला हक्कानं साकडं घालायचं नि तिनंही ती हाक ऐकायची. ‘नवरात्र’ हे एक निमित्त असतं एकत्र भेटण्याचं. माणुसकीच्या नात्यानं आपला खारीचा वाटा उचलण्याचं. फक्त आपल्या बिझी शेडय़ुलमधून देवीच्या उपासनेसाठी थोडासा वेळ काढायला हवा इतकंच. आपल्या कॉस्मोपॉलिटिन संस्कृतीचं प्रतिबिंब आसपासच्या नवरात्रोत्सवात हमखास दिसतं. देवीमातेकडून प्रेरणा घेत सध्याच्या कठीण परिस्थितीला कणखरपणे सामोरं जायला हवं, यावर सगळ्यांचं एकमत होतं. देवी नि भक्तांच्या भक्ती-प्रेमाचा धागा कायमच अखंड राहील. विविध भाषिक आणि प्रांतिक देवीभक्तांनी आपल्या नवरात्रोत्सवाची माहिती ‘व्हिवा’शी शेअर केली. नवरात्रीचा आजच्या काळातला रिलेव्हन्सही त्यांनी त्यांच्या शब्दात मांडला.
सोनल सांगळे
आमच्या काकांकडे गणेशोत्सव असतो. काकांकडच्या गणेशोत्सवाप्रमाणे आपल्या घरीही कुठल्याशा निमित्तानं सगळे जण एकत्र भेटावेत, या उद्देशानं आम्ही ‘नवरात्रोत्सव’ सुरू केला. गेली २५ र्वष आमच्याकडे घट बसताहेत. उत्सवादरम्यान घरात अतिशय प्रसन्न नि सकारात्मक वातावरण राहतं. देवीच्या पूजेतील पारंपरिक रीतिरिवाज आजी, आईसह आता मीही जपतेय. घटस्थापनेसाठीच्या तयारीला लागताना आठवणीनं गव्हांकुर पेरले जातात. देवीच्या मुखवटय़ाला साडी नि दागिन्यांचा साज चढवला जातो. पर्यावरणस्नेही सजावटीसह रोज वेगळा प्रसाद केला जातो. देवीची आरती-श्लोकांचं पठण होतं. देवीपुढच्या दक्षिणेत आमची भर घालून ती देवळात देणगी म्हणून देतो. गावातल्या गरिबांना कपडे-पुस्तकं दान केल्यानं आपसूकच भक्ती नि माणुसकी जपली जाते. देवीकडं चांगल्या भावानं मागितलेल्या गोष्टी नक्कीच मिळतात.
नवरात्रीच्या ‘शक्तिरूपिणी’ देवीप्रमाणेच स्त्रियांनीही एम्पॉवर व्हायला हवं. वाईटाचा नाश करण्यात पुढाकार घेतला पाहिजे.
आशिका रंगनाथन
फार कमी तमीळ घरांत नवरात्र- म्हणजे आमचा ‘गोलू’ साजरा होतो. कोईम्बतूरहून आणलेल्या देवदेवतांच्या मातीच्या मूर्तीची मांडणी स्टेप्सवर केली जाते. अमावास्येच्या दिवशी प्रथम गणपती नि पारंपरिक बाहुल्यांची स्थापना करून मग इतर मूर्ती ठेवल्या जातात. दरवर्षी एक नवीन मूर्ती घ्यावीच लागते. या मूर्तीना देवस्वरूप मानून त्या नृत्य करताहेत असं समजतात. दहाव्या दिवशी त्या नृत्य करून दमल्या असतील, या भावनेनं त्यांना स्टेप्सवरच झोपवलं जातं. नंतर त्या सांभाळून ठेवल्या जातात. प्रसाद म्हणून मुख्यत्वे ‘शुंडल’ म्हणजे चण्याची उसळ दिली जाते. हळदी-कुंकवाला दिव्यासह नारळ, पानसुपारी, केळं, एक कडधान्यं, उपयुक्त वस्तू देतात. संध्याकाळी भक्तिसंगीत आळवलं जातं. हल्ली आम्ही कॉम्प्युटरवर देवीचे श्लोक, गाणी लावतो. सरस्वतीपूजेच्या दिवशी देवीपुढं पुस्तकांची पूजा करून ती वाचली जातात. आमच्याकडं माझ्या मराठी फ्रेण्ड्सही कुतूहलापोटी दरवर्षी आवर्जून दर्शनाला येतात. देवी म्हटल्यावर माझ्या डोळ्यांपुढं ‘सरस्वतीमाता’ येते. तिच्या आशीर्वादामुळे माझी शिक्षणात प्रगती होतेय. देवीकडून दुष्ट शक्तींच्या विनाशासाठी प्रेरणा घेता येईल. सगळ्यांनी मिळून आवाज उठवल्यास अनेक गोष्टी साध्य होतील.
श्रुती परमार
नवरात्र म्हटल्यावर मला आठवते ती हिमाचलमधली प्रसिद्ध ‘रामलीला’. माझ्या वडिलांच्या प्रोजेक्टच्या निमित्तानं आम्ही ११ र्वष हिमाचल प्रदेशात राहिलो. कळत्या वयापासून गावकऱ्यांसमवेत रामकथा ऐकणारी मी अजूनही आठवतेय. रामलीलेत ठरावीक ठिकाणांनुसार संवाद व दोह्य़ांचा समावेश असायचा. रामायणातले महत्त्वपूर्ण प्रसंग गाण्यांद्वारे सादर होताना सगळे जण तल्लीन होऊन जात. नऊ दिवस रामायणाचं कथाकथन नि दहाव्या दिवशी रावणदहन केलं जाई. एक नवरात्र आठवतेय, ती आमच्या ओळखीच्या गुजराती राजपूत कुटुंबातली. त्यांच्याकडे देवीच्या नऊ रूपांतल्या प्रतिमा िभतीवर लावल्या जातात. श्रद्धापूर्वक पूजापाठ, हवन केलं जातं. तिथं मी कायम दर्शनाला जात असे. सध्या मी इंदोरला असून इथं गरब्याची क्रेझ आहे. शेरावालीमातेची पूजा करून खेळला जाणारा गरबा मी खूप एन्जॉय करते. गणेशोत्सव ते दिवाळीपर्यंतचा असतो तो सेलिब्रेशन मूड. वर्षभरातल्या हॅप्पी मूव्हमेंट्सचा कुटुंबीयांसोबत घालवलेला हा काळ सगळ्यांनी एन्जॉय करायला हवा.
‘रामायण’ नि ‘देवी’च्या कथेतून बोध घ्यायचा की, आपली सुरक्षा आपल्याच हाती असते. भारतीय संस्कार नि तत्त्वं पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायला हवीत. शिक्षणाच्या माध्यमातून चांगल्या-वाईटाची जाण त्यांना करून द्यायला हवी. हे तातडीनं घडणं गरजेचं आहे.
प्रतीक्षा कर
आमच्या बंगाली नवरात्रातल्या शाडूच्या मूर्ती मोठय़ा असल्यानं मंडपात पंचमीच्या दिवशी स्थापना केली जाते. दोन्ही वेळा पूजा-आरती केली जाते. सप्तचंडी पाठ, प्रसाद, उपास करणं, अखंड दीप लावणं महत्त्वाचं असतं. अष्टमीच्या दिवशी होमहवन होतं. नवमीला कुमारिका पूजन होतं. दशमीला बंगाली स्त्रिया पारंपरिक पद्धतीच्या लाल-पांढऱ्या साडय़ा परिधान करतात. निरोपाच्या प्रसंगी मूर्तीसमोर विडय़ाचं पान, पाणी, मिठाई आदी ठेवतात. स्त्रिया एकमेकांना सिंदूर लावतात. विसर्जनाच्या प्रसंगी नृत्य केलं जातं. उत्सवादरम्यानच्या स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, गायन, नाटक, नृत्यादी उपक्रमांत मुलींचा सहभाग लक्षणीय असतो. यानिमित्तानं एरवी बिझी असणारे सगळे जण भेटतात नि नवरात्रोत्सव एन्जॉय करतात.
‘दुर्गा माँ’ ही दुष्टांचा नाश करणारी देवी आहे. ते प्रतीक ध्यानात ठेवत मुलींनी गप्प न बसता व्यक्त व्हायला शिकायला हवं. परिस्थितीचा धीरानं सामना करावा. अशा वेळी देवीही आपल्या साहाय्याला धावून येईल.
चार्मी पटेल
माझा जन्म गुजरातमध्ये झाला असला तरी मी लहानाची मोठी झाले ती सोलापूरमध्ये. त्यामुळे मराठी सणवार साजरे करतानाच आम्ही नवरात्रोत्सवाची वर्षभर आतुरतेनं वाट पाहत असू. आमच्या एकत्र कुटुंबात वडीलधारी मंडळी नवरात्रात उपास करतात. आम्ही भावंडं नऊ दिवस चप्पल घालत नाही. एका सच्छिद्र घटात थोडी बाजरी ठेवून अखंड दीप प्रज्ज्वलित केला जातो. सोबत देवीचा पारंपरिक फोटो ठेवला जातो. भोवताली गव्हांकुर पेरतो. दोन्ही वेळा आरती केली जाते. दसऱ्याला कुमारिका पूजनात भेटवस्तू दिल्या जातात नि खिरीला महत्त्व अधिक असतं. या उत्सवात मी उत्साहानं नि भक्तिभावानं सहभागी होते. पारंपरिक गाणी शिकते. ती गाते. संध्याकाळी गरबा खेळायला जाते. नवरात्र ही एक प्रकारे संधीच असते आपल्याला सोशलाइट व्हायची. गरब्यामुळे आपला मूड चांगला होतो. फ्लेक्झिबिलिटी नि फ्रेशनेस येतो. लवकरच मी शिक्षण नि नंतर सेटल होण्यासाठी परदेशात जाणार असल्यानं यंदाच्या नवरात्राची उत्सुकतेनं वाट बघतेय.
मला वाटतं, देवीकडून प्रेरणा घेत प्रत्येकीनं स्वसंरक्षणाचे धडे गिरवायला हवेत. कठीण परिस्थितीचा सामना करण्याची मानसिक तयारी करून सजग राहायला हवं. मोबाइल अॅप्ससारख्या अत्याधुनिक सुविधांचा वापर करायला हवा.
हाय फ्रेण्ड्स ! वेलकम टू ‘व्हिवा वॉल’! ही आहे तुमच्या मनातलं सगळ्यांपर्यंत पोहचवायची एक हक्काची जागा. तुमच्या आवडीचे चित्रपट, नाटक, म्युझिक, पुस्तकं, मालिका आणि करंट टॉपिक्स अशा ढेरसाऱ्या विषयांवर आपण बोलणार आहोत. तुम्हीही या वॉलवर लिहू शकता. त्यासाठी तुमचे विचार आमच्याशी जस्ट शेअर करा. त्यासाठी आम्हाला ईमेल करा- viva.loksatta@gmail.com सब्जेक्टलाइनमध्ये – विवा वॉल असं जरूर लिहा.