झोपेच्या माध्यमातूनच आपल्या शरीराला जास्तीत जास्त विश्रांती मिळत असते. झोप म्हणजे खऱ्या अर्थाने शरण जाणं असून या शरणावस्थेमध्ये व्यक्तीला ना काही हरवल्याची भावना असते, ना पश्चात्तापाची. मनावर कोणतंच ओझं नसतं आणि कोणतेच विचार आपल्याला हटकत नाहीत. झोपेकडे केवळ उपचार म्हणून पाहता कामा नये. आरामासह घेतलेली झोप ही निसर्गाची आपल्याला पुन्हा ताजंतवानं बनवण्याची प्रक्रिया असते. आरोग्य चांगलं राखण्यासाठी झोप हा आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा घटक असतो. झोप चेतासंस्थेला नवप्रेरणा देते. कमी झोपेमुळे आळस येतो, स्मरणशक्ती तसंच कार्यक्षमतेवरही परिणाम होतो. त्यामुळे लक्ष केंद्रित करणं कठीण जातं आणि उत्साह वाटत नाही. कमी झोप हा आजार बनला तर त्यामुळे मूडमध्ये सतत बदल होणं आणि भास होण्यासारखे दुष्परिणामही उद्भवतात. शास्त्रीय संशोधनातून असं आढळून आलं आहे की अपुऱ्या झोपेमुळे आरोग्य, सुरक्षितता, कार्यक्षमतेवर परिणाम होतो.
लवकर झोप न लागणं, झोपेदरम्यान रात्री बरचेदा उठणं, सकाळी खूप लवकर जाग येणं आणि पुन्हा लवकर झोप न लागणं ही इन्सोम्नियाची लक्षणं आहेत. इन्सोम्नियाचे ट्रान्झियण्ट (बरेच दिवस टिकणं), इण्टरमिटन (जेव्हा ट्रान्झियण्ट इन्सोम्निया नियमित बनतो) किंवा क्रोनिक (महिन्यापेक्षाही जास्त काळ टिकणं) हे प्रकार आहेत.
इन्सोम्निया झालेल्यांनी आपल्या झोपेच्या सवयी तपासून घेणं अपेक्षित आहे. त्यामुळे झोप न लागण्यामागे नेमकं काय कारण आहे, हे लक्षात येतं. या कारणांमध्ये आहार, व्यायाम, झोपतानाचं वातावरण किंवा वैयक्तिक सवयी आदींचा समावेश असू शकतो. या कारणांमध्ये फरक करूनही इन्सोम्नियाची लक्षणं जात नसतील तर डॉक्टरांकडून वर्तवणूक आणि/किंवा औषधांसारखे उपाय योजता येतात. इन्सोम्निया उपचारांनी बरा होऊ शकतो, पण त्यासाठी त्याचं मूळ कारण आणि त्या संदर्भात डॉक्टरांशी चर्चा करणं आवश्यक आहे. ‘झोपेचं ओझं’ एखाद्यावर इतकं परिणाम करतं की त्याला आपल्याबाबत चुकीच्या घडणाऱ्या गोष्टींमागचं तेच कारण आहे याची पुसटशी कल्पनाही येत नाही. खूप कमीजणांना पुरेशा विश्रांतीचं महत्त्व माहीत असतं किंवा झोपेच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी काही प्रभावी तंत्र उपलब्ध असल्याची माहिती त्यांना असते.
आपल्या व्यस्त कामकाजातून थोडा आराम करणं इतकंच झोपेचं महत्त्व मर्यादित नसतं. उत्तम आरोग्य, मानसिक आणि भावनिक कार्यक्षमता यासाठी झोप गरजेची असते. स्लीप अॅप्निया असणाऱ्यांना झोपेदरम्यान उच्च रक्तदाब असण्याची शक्यता असते आणि दिवसा भरपूर झोप येण्याचीही शक्यता असते.
कधीकधी उद्भवणाऱ्या झोपेच्या समस्यांमुळेही दैनंदिन जीवनात ताण निर्माण होऊ शकतो किंवा कार्यक्षमता कमी होऊ शकते. पुरेशी झोप न मिळण्याची तक्रार जे करतात, त्यांना लक्ष केंद्रित करणं, नेमून दिलेलं काम करणं आणि त्रागा आणणाऱ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवणं फार कठीण जातं.
झोपेदरम्यान बऱ्याच गोष्टी घडत असतात. व्यवस्थित झोपणाऱ्यांच्या ‘झोपेच्या रचनातंत्रा’बद्दल आपण नेमकेपणाने सांगू शकतो. ही संज्ञा पर्यायी तंत्र किंवा आरईएम (रॅपिड आय मूव्हमेण्ट) आणि नॉन-आरईएमचं वर्णन करण्यासाठी वापरली आहे. जेव्हा आपण स्वप्न बघत असतो, तेव्हा ती आरईएम झोप असते. यावेळी मानसिक किंवा शारीरिक हालचाल जलद गतीने होत असते. यादरम्यानचे हृदयाचे ठोके, रक्तदाब, श्वासोच्छ्वास जागे असताना सारखे असतात. शास्त्रज्ञ आरईएम आणि नॉन-आरईएमच्या उत्तम संयोगाला चांगली झोप मानतात.
आजूबाजूचं वातावरण किंवा श्वसनासारख्या अंतर्गत कारणांमुळे अडथळा न आल्यास चांगली झोप मिळाली तर झोपेचं नैसर्गिक रचनातंत्र राखता येतं आणि चांगली झोप मिळते. लहान असो वा मोठा, झोपेचा फायदा सर्वांनाच होतो. किशोरवयीन आणि तरु णांनी हे समजून घेतलं पाहिजे. गतिमान आणि व्यस्त जीवनामुळे झोपेला दुय्यम मानलं जातं. झोपेच्या कमतरतेमुळे मूड सतत बदलत राहतो, स्थूलपणा येतो आणि रोगप्रतिकारशक्तीही घटते.
निरोगी आणि शांत झोपेसाठी या काही टिप्स-
१) कॉफी, चॉकलेट्स, कोको, कोला, कॅफिनेटेड चहा आणि अल्कोहोल या कॅफिन असलेल्या घटकांपासून दूर राहा.
२) शरीराचं झोपेचं आणि उठण्याचं चक्र सुरळीत चालू राहाण्यासाठी योग्य पद्धतीने दिनक्रम पाळला पाहिजे.
३) काम आणि मोकळ्या वेळेत संतुलन राखून कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायचं, हे ठरवलं पाहिजे.
४) झोपण्यापूर्वी भरपूर व्यायाम करू नये. मोजका आणि उपयुक्त व्यायाम तसंच योगसाधनेमुळे झोपेच्या समस्या दूर करता येतात.
५) रात्री फार जेवू नये. भाज्या, सूप असा हलका आहार घ्यावा. त्यामुळे चांगली झोप लागते.
६) रात्री झोपताना हर्बल टी किंवा ग्रीन टी घ्यावा. त्यात झोप येण्यास मदत करणारे खास घटक असतात.
७) कोमट पाण्याने आंघोळ, वाचन, कर्णमधुर संगीत ऐकल्याने आपण रिलॅक्स होतो आणि झोपही चांगली लागते.
८) झोपण्याची खोली थंड, काळोख असलेली पण आरामदायी असावी.
९) ध्यानधारणा आणि प्रार्थना केल्याने आपल्या झोपेच्या पद्धतीवर सकारात्मक परिणाम होतो आणि त्यामुळे भावनिक आणि मानसिक स्थैर्य लाभतं.
झोप, विश्रांती आणि आराम करण्याने शारीरिक तसंच भावनिक आरोग्य चांगलं राहतं. झोप आणि विश्रांती हे दोन असे महत्त्वाचे घटक आहेत, जे ताणतणाव, चिंतेमुळे होणारी शरीराची हानी भरून काढतात.
मिकीज् फिटनेस फंडा : आरोग्यासाठी झोपेचं महत्त्व
झोपेच्या माध्यमातूनच आपल्या शरीराला जास्तीत जास्त विश्रांती मिळत असते. झोप म्हणजे खऱ्या अर्थाने शरण जाणं असून या शरणावस्थेमध्ये व्यक्तीला ना काही हरवल्याची भावना असते, ना पश्चात्तापाची. मनावर कोणतंच ओझं नसतं आणि कोणतेच विचार आपल्याला हटकत नाहीत. झोपेकडे केवळ उपचार म्हणून पाहता कामा नये. आरामासह घेतलेली झोप ही निसर्गाची आपल्याला पुन्हा ताजंतवानं बनवण्याची प्रक्रिया असते.
First published on: 03-05-2013 at 12:03 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Good sleep is must for good health