स्वप्निल घंगाळे

टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपनीपासून ते ‘बुलंद भारत का विश्वास’पर्यंत आणि अगदी कालपरवा बाजारपेठेत आलेल्या कंपन्यांपर्यंतही सर्वाधिक चर्चेचा विषय आहे तो म्हणजे विजेवर चालणाऱ्या दुचाकी. सध्या या दुचाकींचा विषय चांगलाच तापलाय आणि सुरक्षेचा विषय हळूहळू चर्चेत येताना दिसतोय. याच हॉट टॉपिकच्या अनुषंगाने..

‘अरे बाईकचं काय घेऊन बसलास? आता तर एसटी पण इलेक्ट्रिक होणार आहेत म्हणे..’ असं म्हणत त्याने फार हौशीने नव्या इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल सांगणाऱ्या  मित्राला हटकलं आणि साऱ्या ग्रुपमध्ये एकच हशा पिकला. मात्र ज्याची खिल्ली उडवण्यात आली तो स्कूटरच्या वैशिष्टय़ांचा पाढा वाचत बसला होता. या अशा विजेवर चालणाऱ्या बाईक्स आणि सतत नवे नवे येणारे कार मॉडेल्सच्या चर्चा अगदी नाक्यापासून, ट्रेनमधील ग्रुप्सपासून ते अगदी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरही सुरू असतात. सध्या नव्या गोष्टींबद्दल कायम वाटणारं आकर्षण ही बाब या विजेवर चालणाऱ्या वाहनांबद्दल प्रकर्षांने जाणवते आहे. अनेक जण या वाहनांबद्दल भरभरून बोलत असतात, मात्र त्याच्या तांत्रिक बाबींबद्दल योग्य पद्धतीने समजून घेणारे अगदीच हाताच्या बोटावर मोजण्याइतके असतात. याच तांत्रिक बाबींमधील सध्या सर्वाधिक चर्चेत असणारी बाब म्हणजे सदोष इलेक्ट्रिक बाईक्स. अगदी आई-बाबांना राजी करून इलेक्ट्रिक स्कूटर घेण्यापासून ते ईएमआयवर स्कूटर घेणाऱ्यांपर्यंत सर्वासाठीच इलेक्ट्रिक बाईक हा जिव्हाळय़ाचा विषय झाला आहे.

मागील काही काळापासून या विजेवर चालणाऱ्या बाईक्सचा स्फोट, आग लागण्याचे प्रकार यांसारख्या घटना बातम्यांमधून आणि सोशल मीडियावरून चर्चेत आहेत. अर्थात जेवढय़ा प्रमाणात या गाडय़ा विकल्या जातात त्या प्रमाणात हे प्रकार अगदीच नगण्य म्हणावे लागतील. मात्र या गाडय़ांची किंमत आणि सुरक्षा या दोन मापकांचा विचार करायचा झाल्यास ग्राहक म्हणून या वाहनांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर फरक पडतो. मुळात या सर्व गाडय़ा किमान एक लाख ते पुढे अगदी दीड लाखांच्या रेंजमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळेच या गाडय़ा घेताना फार विचारपूर्वक पद्धतीने निर्णय घेतला जातो किंबहूना घ्यायला हवा. त्यातही हे तंत्रज्ञान नवीन असल्याने याबद्दल अनेक शंका ग्राहकांच्या मनात आहेत. विशेष म्हणजे या शंकांचं निरसन करण्यासाठी उपलब्ध असणारी दोन साधनं म्हणजे इंटरनेट आणि थेट डीलर. आता इंटरनेट हे मातीच्या गोळय़ाप्रमाणे असतं. ज्या बाजूने आकार देणार तसा गोळा घडतो त्याप्रमाणे जसं शोधणार तेच इंटरनेट समोर मांडतं. त्यामुळेच इंटरनेटवरून या गाडय़ा विकत घ्याव्यात की नाही या निर्णयापर्यंत पोहोचणं कठीण आहे. दुसरा माहितीचा स्रोतही एकांगीच आहे, कारण डीलर म्हणून त्यांना या गाडय़ा विकणे हा व्यवसायाचा भाग असतो. या साऱ्या गोंधळात आता अनेक जण जवळच्या लोकांकडून किंवा आपल्या आपल्यात तज्ज्ञ असणाऱ्यांकडून गाडय़ांबद्दल माहिती घेताना दिसतात. म्हणूनच या गाडय़ांबद्दलचा संभ्रम हा अधिक वाढत जाणार आहे हे निश्चित. 

प्रामुख्याने या गाडय़ांची मुख्य समस्या ही बॅटरीसंदर्भात आहे. म्हणजे कधी बॅटरीचा स्फोट होणे तर कधी बॅटरीच चार्ज न होणे यासारख्या अनेक समस्या आहेत. मुळात भारतीय बाजारपेठ ही फार स्पर्धात्मक बाजारपेठ असल्याने कमीत कमी किमतीमध्ये प्रॉडक्ट बाजारामध्ये उतरवण्यासाठी अनेकदा वस्तूच्या दर्जाशी तडजोड केली जाते. अर्थात नफा मिळवायचा म्हणजे या गोष्टी ओघाने आल्याच. तरीही भारतामध्ये हे क्षेत्र फारच नवीन असल्याने याबद्दल पारंपरिक वाहनांप्रमाणे जाणकार लवकर सापडणे आणि त्याच्याकडून सल्ला घेऊन निर्णय घेणे या गोष्टी अद्यापही ग्राहकांच्या खरेदी निर्णयाच्या वर्तुळाबाहेरच्या आहेत. परदेशामध्ये अशापद्धतीच्या विद्युत वाहनांसाठी नियमन आणि नियम अधिक कठोर आहेत. त्यामुळेच तेथे हलक्या प्रतीच्या गोष्टी ग्राहकांपर्यंत पोहोचण्याआधीच तपासणीमध्ये बाजाराबाहेर काढल्या जातात, मात्र भारतात असं होतं नाही. आता या गाडय़ांना आग लागण्याच्या बातम्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून हवा मिळाली आणि थेट केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने यासंदर्भात निर्देश जारी करत गाडय़ांच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली. त्यामुळे अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत या गाडय़ांना आग लागण्याचा विषय चर्चेत आहे.

या गाडय़ांबद्दल असणारा संभ्रम, सुरक्षेबद्दल व्यक्त केली जाणारी चिंता या साऱ्या गोष्टी एकीकडे असल्या तरी या गाडय़ांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना आपण एकदम करो या मरो प्रकारच्या स्पर्धात्मक बाजारपेठेत असल्याचा पूर्ण अंदाज आहे. त्यामुळेच अगदी २४ तासांमध्ये डिलिव्हरी देण्यापासून ते आर्थिक तरतुदींपर्यंत अनेक गोष्टींच्या माध्यमातून ग्राहकांना प्रलोभने दाखवली जात आहेत. या स्पर्धेमध्ये आणि सरकारी नियमांच्या गोंधळांमध्ये ग्राहकांच्या हाती पडणाऱ्या फायनल प्रॉडक्टबद्दल एकंदरीत सारी उदासीनताच दिसते आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात आता लोकांना विजेवर चालणाऱ्या गाडय़ा हे फॅड आहे की काय असं वाटू लागलंय. मात्र त्याच वेळी सरकारी यंत्रणा आणि या क्षेत्रातील जाणकार हे क्षेत्र फार वेगाने वाढणार असल्याचे दावे करत आहेत. चारचाकी विजेवर चालणाऱ्या गाडय़ा या मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेरच्या असताना दुचाकींच्या माध्यमातून दुधाची तहान ताकाने भागवण्याच्या प्रयत्नात असणाऱ्यांपैकी अनेकांचा यामुळे गोंधळ वाढतो आहे.

केवळ आग लागणेच नाही तर आता अनेक शहरांमधून या गाडय़ांची पुढची चाकं निखळून पडत असल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. इंटरनेटवर इलेक्ट्रिक टू व्हीलर फायर किंवा इश्यू असं नुसतं सर्च केलं तरी अनेक बातम्या यासंदर्भात सापडतात. तसंच दर वेळेस अगदी बातमी होण्याइतक्या गोष्टीच घडल्या पाहिजेत असं नाही. वेगाने अधिक जास्तीत जास्त प्रमाणात उत्पादन घेण्याच्या नादात या गाडय़ांची बांधणी, चाचण्या योग्य प्रकारे केल्या जातात की नाही? याबद्दल शंका उपस्थित करायलाही वाव आहे. याच निकृष्ट आणि सदोष गोष्टींमुळे अनेकदा घरी आलेली नवीन इलेक्ट्रीक बाईक काही वापरानंतर सव्‍‌र्हिस सेंटरला द्यावी लागते. कधी बॅटरीचा इश्यू तर कधी चार्जिगचा इश्यू असं काही ना काही अडचणी या गाडय़ांमध्ये आढळून येणं आता नवीन राहिलेलं नाही.

या गाडय़ांसंदर्भातील नियम अगदी स्थानिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांपासून ते डीलर्सपर्यंत सगळय़ांना संभ्रमात टाकणारे आहेत. मध्यंतरी नागपूरमध्ये पोलिसांनी कारवाई करून या अशा विजेवर चालणाऱ्या वाहनांमध्ये अफरातफर करून त्यांची निश्चित वेगमर्यादा बेकायदेशीरपणे वाढवल्याप्रकरणी डीलर्सवर कारवाई केली. अशा अनेक प्रकारच्या समस्या सध्या या विजेवर चालणाऱ्या वाहन क्षेत्रासमोर आहेत. बरं यावर उपाय काय तर अधिक कठोर नियम आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्याची अंमलबजावणी.

आता सर्वात शेवटी उरणारा प्रश्न म्हणजे ग्राहक म्हणून काय करायचं? तर ग्राहक म्हणून आपल्याला खरोखरच विजेवर चालणाऱ्या बाईक्स किंवा कारची गरज आहे का? याचा विचार करावा. बॅटरीची क्षमता, लागणारी वीज वगैरे याचा विचार करता या गाडय़ांमागील पर्यावरणपूरक हा भाग प्रश्नचिन्ह उपस्थित करणाराच आहे. या गाडय़ांच्या तथाकथित पर्यावरणपूरकतेबद्दलही विविध स्तरांवर चर्चा सुरू आहेत. अगदी इलेक्ट्रीक बाईकच घ्यायची असेल तर सध्याच्या कालावधीमध्ये तरी वेट अ‍ॅण्ड वॉच म्हणजेच थांबा, वाट पाहा आणि मग निर्णय घ्या हाच मार्ग अधिक योग्य दिसतो आहे. जाता जाता अगदी मोजक्या शब्दात सांगायचं झालं तर, विजेवर चालणाऱ्या गाडय़ांकडून अपेक्षाभंगाचा झटका लावून घेण्यापेक्षा या गाडय़ांच्या खरेदीसंदर्भात ‘मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक’ हेच धोरण सध्या असायला हवं. किमान नियमांमध्ये अधिक स्पष्टता येईपर्यंत हे धोरण अवलंबलं तरी ते भविष्याच्या दृष्टिकोनातून विचार करता फायद्याचं ठरणारं आहे.

viva@expressindia.com