पेरू हे हिवाळ्यातील एक लोकप्रिय व स्वस्त फळ आहे. त्यात पित्तशामक गुण असल्याने ते अत्यंत उपयोगी फळ आहे. मध्य किंवा दक्षिण अमेरिका हे पेरूचे मूळ स्थान आहे. मेक्सिको ते कोलंबिया, पेरू आणि ब्राझीलचा प्रदेश हे पेरूचे मूळ उत्पत्तिस्थान समजले जाते. पोर्तुगीजांनी हे फळ भारतात आणले आहे. सध्या भारतात सर्वत्र बगिचांमध्ये पेरूची झाडे लावली जातात. पेरूला कोणत्याही प्रकारची जमीन चालते. तथापि क्षार नसलेली उच्च प्रतीची खडकाळ व थोडी कठीण जमीन पेरूला जास्त अनुकूल असते. ज्या जमिनीत पावसाचे पाणी साचून राहते अशी हलक्या प्रतीची जमीन पेरूला मानवत नाही, कारण पावसाचे पाणी जमिनीत साचून राहिल्याने पेरूचे रोप सुकून जाते. थोडक्यात कोरडवाहू जमीन पेरूला खूप मानवते. नदीकिनारी गाळाच्या जमिनीत पेरूची झाडे चांगली वाढतात. बीमधून रोप तयार करून लावलेल्या पेरूच्या झाडाची फळे आकाराने लहान, अधिक बिया असणारी व कमी गर असणारी असतात, तर कलम करून लावण्यात आलेल्या झाडाची फळे आकाराने मोठी, कमी बियाची व मुलायम व अधिक गर असणारी असतात. बनारस, अलाहाबाद व मिरझापूर या ठिकाणी पेरूची लागवड खूप मोठय़ा प्रमाणात होते. अलाहाबादचे अमरुद ही पेरूची सर्वोत्कृष्ट जात समजली जाते.
पेरूची भाजी करता येते. पिकलेले पेरू ताजा मेवा म्हणूनही खाल्ले जातात. दुपारी जेवणानंतर पेरू खाणे अत्यंत फायदेशीर असते. जेवल्यानंतर एक-दोन तासांनी एक मोठा पेरू खाल्ल्यास शरीराला आवश्यक ते घटक त्यातून मिळतात. अनशापोटी पेरू खाल्ल्याने किंवा अतिरिक्त प्रमाणात पेरू खाल्ल्याने पोटात वायू तयार होतो. जुलाब होतो व ताप येतो. वैज्ञानिक मताप्रमाणे पेरूमध्ये जीवनसत्त्व सी, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, ग्लुकोज, टूनिन अॅसिड व ऑक्झेलेटचे कण असतात. पेरूमध्ये मोसंबी, संत्री, पपई, िलबापेक्षा सी जीवनसत्त्व अधिक प्रमाणात असते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा