|| तेजश्री गायकवाड

काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गुढीपाडव्याच्या सणाकडे यंदाही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. गेल्या वर्षी साजरे न करता आलेले सण यंदा तरी जल्लोषात साजरे करता येतील अशी आशा प्रत्येकाच्या मनात होती. पण परत घातल्या गेलेल्या निर्बंधांमुळे आपली परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ झाली आहे. यंदाच्या वर्षीही आपण घरूनच मराठी नवीन वर्षाचं स्वागत करणार आहोत. दरवर्षी गल्ल्यागल्यांमधून रंगत जाणारी शोभायात्रा, वाढत जाणारा जल्लोष, उत्साह हा माहौल सध्या मनामनांतच फु लतो आणि मावळतो. या शोभायात्रांमध्ये मनात घुमणारा आवाज असतो तो ढोलताशांचा… भान हरपून ढोल वाजवणाऱ्या तरुण-तरुणींची ढोलपथकंही गेल्या वर्षीपासून घरीच आहेत. या परिस्थितीचा स्वीकार त्यांनी कसा केला?, या काळात आपली कला जोपासण्यापासून ते समाजासाठी म्हणून काय काय गोष्टी त्यांनी केल्या?, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी राज्यातील वेगवेगळ्या ढोलपथकांशी ‘व्हिवा’ने संवाद साधला.

एक… दोन… तीन…चार… अशा घोषणांपासून सुरू झालेला प्रवास मग आलेलं डी.जे. प्रकरण आणि त्याचा कंटाळा करत पुन्हा संस्कृतीशी जोडून घेणारा तरुणाईचा ढोलताशा पथकापर्यंतचा प्रवास आपण विसरू शकत नाही. राज्यभरात अनेक शहरांतून अभ्यास, शिक्षण, नोकरी – व्यवसाय सगळं सांभाळून आवर्जून या ढोलताशा पथकात सामील होणारी तरुणाई आपण पाहिलेली आहे. शिवजयंती असो वा गणेशोत्सव किंवा गुढीपाडवा या सणांना ढोलपथकांना सर्वाधिक मागणी असते. गुढीपाडव्याच्या शोभायात्रेचं तर मुख्य आकर्षण असतं ढोलपथक. परंतु करोनामुळे असलेल्या निर्बंधामुळे यंदाही आपल्याला या ढोलताशांचा आवाज ऐकता येणार नाही. याबद्दल पुण्याच्या ‘शिवगर्जना’ या पथकाचा विशाल उभे सांगतो, ‘कोणत्याही पथकासाठी आपले मोठे मराठी सण फार महत्त्वाचे असतात. पुढच्या वर्षी अजून उत्साहात पुन्हा ढोलताशांना काढून  शुभारंभ करू या एका आशेवर आम्ही गणेशोत्सवानंतर सगळे ढोल व्यवस्थित बंद करून ठेवतो. पण गेल्या वर्षीपासून आजपर्यंत आम्ही पुन्हा नवीन सुरुवात करण्यासाठी वाटच बघत आहोत. दरवर्षीचा ढोलताशांचा सराव ते सादरीकरणाच्या दिवसापर्यंतचा प्रत्येक क्षण आम्ही मिस करतो आहोत. घरात खूप आवाज होतो त्यामुळे घरातल्या लहान-मोठ्यांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही ऑनलाइन पद्धतीनेसुद्धा काहीच करू शकत नाही’. लवकरात लवकर हे संकट टळून पुन्हा एकदा ढोलताशांचा नाद घुमावा, अशी आशा विशाल व्यक्त करतो. नाशिकच्या ‘जिजाऊ महिला पथका’ची रुचिका देशपांडेही काहीसं असंच मत व्यक्त करते. ‘आमचं संपूर्ण महिलांचं ढोलताशा पथक आहे. दरवर्षी आम्ही महिला – मुली दिमाखात ढोल घेऊन शोभायात्रा, आगमन सोहळ्यांमध्ये सादरीकरण करतो. गेल्या वर्षीपासून आलेल्या संकटामुळे पुन्हा तसं सादरीकरण करण्याची संधी कधी मिळतेय याची मी वाट बघते आहे’. गेल्या दीड वर्षात रुचिकाच्या पथकातील अनेक मुलींशी वेगवेगळ्या कारणांमुळे संपर्कसुद्धा तुटल्याचं ती सांगते. ‘सध्याच्या काळात घरून जरी काही करायचं म्हटलं तरी ते शक्य नाही. कोणाच्या घरी काय परिस्थिती असेल हे माहिती नाही. त्यामुळे आम्ही कोणताही नवीन प्रयोग अद्याप केलेला नाही. आम्ही दरवर्षीची धावपळ नक्कीच मिस करतो आहोत. मुली म्हटलं की नटणंमुरडणं हे आलंच. सरावासोबत आम्ही दरवर्षी नवीन लुक कसा करता येईल?, यावरही काम करायचो. नऊवारी साडी, पारंपरिक दागिने, मेकअप, फेटा आणि डोळ्यांवर गॉगल हे सगळंच आम्ही मुली खूप मिस करतो आहोत, असं रुचिका सांगते.

ठाण्याच्या ‘शिवमल्हारी’ या पथकाचा साईप्रसाद परब मात्र तीव्र नाराजी व्यक्त करतो. ‘प्रत्येक सणाला आवर्जून आवाज देणारेच आता कुठेतरी गायब झाल्यासारखे वाटतायेत सध्या… प्रत्येक गोष्टीवर चर्चा, मदत होते आहे, पण आमच्यासारख्या ढोलताशा पथकांकडे दुर्लक्ष झालं आहे याचं फार वाईट वाटतं’. ढोलपथक म्हटलं की त्यासोबत न दिसणारा खर्चही असतो. कपडे, फेटा या सारख्या गोष्टीसोबतच सरावासाठी लागणाऱ्या जागेचं भाडं, ढोल व्यवस्थित राहावेत यासाठी त्यांना लागणारं तेलपाणी यासारख्या गोष्टींवर पैसे खर्च होत असतात. अनेक ढोलपथकं कर्ज काढूनसुद्धा चालवली जातात. ‘ पारंपरिक कला जिवंत राहावी म्हणून अनेकजण ढोलताशा पथक सुरू करतात आणि त्या पथकाशी अनेक लोक जोडले जातात, परंतु हे सगळंच सध्या ठप्प झालं आहे. आर्थिक समस्यांमुळे खूप पथकं कायमची बंद झाली आहेत, पण कोणाकडेच यावर काही उपाय नाही याची फार खंत वाटते. आमचं पथक अगदी दुसऱ्या राज्यात, शहरातही सादरीकरण करायला जायचं. त्या वेळी होणारी धावपळ , ढोलताशांचा आवाज लवकर पुन्हा ऐकण्याची इच्छा आहे. घरातून अनेकांचं ऑफिस, शाळा, कॉलेज सुरू असल्यामुळे घरी बसूनही काहीच करता येत नाही’, असं साईप्रसाद सांगतो. या सगळ्या अडचणीतून मार्ग काढत नाशिकच्या ‘नटनाद’ या पथकाच्या विक्रांत सोनवणे याने काही वेगळा प्रयत्न केला. नाशिकमधील जास्तीतजास्त पथकं यामुळे बंदच्या काळातही एकमेकांना जोडली गेली. याबद्दल विक्रांत सांगतो, शेवटचं वादन आम्ही २०१९ सालच्या गणेशोत्सवात केलं होतं. दरवर्षी नव्याने जोडले जाणारे वादक, मॅनेज करता करताना होणारी धावपळ , रंगीबेरंगी कपडे, फेटा, ध्वज हे सगळं आम्ही त्याच शेवटच्या वादनात अनुभवलं. आम्ही २०२०च्या गुढीपाडव्याला काही हटके प्रयोग करणार होतो. त्या दिशेने खूप मेहनत घेत तयारीही के ली होती. आर्थिकदृष्ट्याही आम्ही तयारी के ली होती. आणि नेमकं  गुढीपाडव्याच्या काही दिवस आधी लॉकडाउन जाहीर झाला. त्यानंतर पुन्हा सुरू झालेल्या अनलॉकमध्ये सगळे नियम पाळून, परवानगी घेऊन विक्रांतचं पथक पुन्हा सज्ज झालं होतं, परंतु पुन्हा एकदा त्यांना बंदचा सामना करावा लागतो आहे. या सगळ्या परिस्थितीत निराश न होता विक्रांतने लॉकडाउनच्या काळात  त्यांच्या पथकाच्या इन्स्टाग्राम पेजवरून लाइव्ह येत नाशिकमधील वेगवेगळ्या पथकांतील लोकांची मुलाखत घेतली. आपलं पथक अजून चांगलं कसं होईल, काय बदल करणं गरजेचं आहे?, अशा अनेक गोष्टींवर या मुलाखतीस्वरूप कार्यक्रमात चर्चा झाल्या. यामुळे नाशिकमधील अनेक पथकांना फायदा होणार हे निश्चिात. याखेरीज आम्ही काही पथकांनी, संस्थांनी एकत्र येत लॉकडाउनच्या काळात कामगार, गरजू लोकांच्या जेवणाची सोय के ली, अशी माहितीही त्याने दिली.

एकंदरीत फक्त घरात बसून न राहता काही तरी नवीन प्रयोग, समाजाप्रती कामही काही पथकांनी केलं. अर्थात, समाजोपयोगी कार्य, छंद या सगळ्यांतून मिळणाऱ्या आनंदात रमण्याचा त्यांचा प्रयत्न असला तरी घरात किं वा संस्थेच्या कार्यालयात एका कोपऱ्यात पडून असलेल्या शांत ढोलताशांचा नाद पुन्हा कधी वातावरणात घुमणार याकडेच त्यांचे लक्ष लागले आहे.

viva@expressindia.com

Story img Loader