प्रांजली कुलकर्णी

आपल्याकडे शिक्षणाची सुरुवात पाटीवर अक्षरं गिरवून केली जाते. आजच्या डिजिटल युगातही पाटीची संकल्पना तग धरून राहिली आहे हे विशेष. या पाटीच्याच संदर्भात पुढच्या शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर देशात पदवीपर्यंतच्या शिक्षणाची मुळाक्षरं गिरवली जातात आणि जगाच्या पाठीवर अर्थातच जगभरातल्या विद्यापीठांच्या पाटीवर (आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पुढचं शिक्षण घेतलं जात आहे. त्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यामागचा विचार, त्यासाठी द्याव्या लागणाऱ्या परीक्षा, दरम्यान आलेल्या अडीअडचणी, प्रत्यक्षात तिथे गेल्यावर आलेला अनुभव आदी मुद्दय़ांचा शोध घ्यायचा प्रयत्न म्हणजे हे ‘जगाच्या पाटीवर’ सदर..

mpsc exam preparation tips
MPSC मंत्र : भारतीय अर्थव्यवस्था – मूलभूत संकल्पना
Daily Horoscope On 30 October
३० ऑक्टोबर पंचांग: दिवाळीआधीच येईल सोनेरी संधी, आर्थिक…
Rumours of bombs due to science experiments police got confuse
विज्ञानाचा प्रयोग, बॉम्बची अफवा अन् पोलिसांची तारांबळ, काय घडले नेमके?
andaman and nicobar additional commissioner ias vasant dabholkar Success Story
माझी स्पर्धा परीक्षा : समाजाचं ऋण फेडण्याचा मार्ग
Rashmi Barve nominate from Umred reserved constituency
दलित महिलेवर अन्यायाचे प्रतीक, काँग्रेसची जबरदस्त खेळी, रश्मी बर्वे यांना उमरेडमधून उमेदवारी
Daron Acemoglu Simon Johnson, and James Robinson Awarded 2024 Nobel Prize
वसाहतवाद, विकास आणि विषमतेच्या इतिहासातून भविष्याकडे…
Ulhasnagar, Kumar Ailani, kalani family, BJP MLA Kumar Ailani, Kumar Ailani news, Ulhasnagar latest news,
उल्हासनगरच्या आखाड्यात यंदा मोठा संघर्ष
Preparation Strategy for Competitive Exams
करिअर मंत्र

सध्याच्या जगात तग धरायला केवळ पदवी पुरेशी नसल्यामुळे पुढे एमए करावं की एमबीए करावं, हा निर्णय घ्यायचा होता. मग एमएवरच शिक्कामोर्तब झालं. त्यानुसार मुंबई विद्यापीठात एमए इकॉनॉमिक्सला प्रवेश घेतला. तिथल्या प्राध्यापकांचं शिकवणं चांगलं होतं; पण पहिल्या वर्षांचा निकाल माझ्या मनाजोगता लागला नव्हता. तेव्हा अन्य पर्यायांच्या शोधात असताना परदेशात शिकायला जायचा पर्याय पुढे आला.

‘आयडीपी’ या संस्थेतर्फे परदेशातील शिक्षणासंदर्भात चांगलं मार्गदर्शन मिळालं. यूएसमध्ये प्रवेश घ्यायचा तर किमान वर्षभर आधी प्रक्रिया सुरू होते. मग संस्थेने यूकेच्या प्रतिनिधीशी बोला असं सुचवलं. यूके मधील विद्यापीठांच्या वेबसाइटवर सविस्तर व अद्ययावत माहिती मिळते. भरपूर शोधाशोध करताना माझ्या आवडीचे विषय, शिष्यवृत्ती, त्यासाठी अर्ज करायची तारीख व परीक्षा, सोयीसुविधा हेही मुद्दे लक्षात घेत होते. मी सात विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी अर्ज केला होता. त्यातील सहा विद्यापीठांकडून मला ऑफर आली होती. त्यापैकी ‘युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंगहॅम’चा पर्याय मी निवडला. आयईएलटीएसची परीक्षा आणि पदवीला किमान ६०% अशी त्यांची प्रवेशासाठी किमान अट आहे. प्रवेश घेण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता आणि तांत्रिक गोष्टींची माहिती यासाठी आयडीपीमधल्या समुपदेशकांची खूपच मदत झाली. हे विद्यापीठ यूकेमधील टॉप टेन विद्यापीठांपैकी एक म्हणून गणलं जातं. माझ्या विषयासह एकूणच सगळ्या मुद्दय़ांचा विचार करता जगभरातील शंभर विद्यापीठांपैकी एक असं युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंगहॅमचं स्थान आहे. कारण अनेकदा विद्यापीठाचं स्थान-श्रेणी यावर गोष्टींचा खोळंबा होऊ  शकतो. त्या विद्यापीठाचं स्वत:चं, जगभरातलं, विषयानुसार, संशोधनाच्या दृष्टीने आणि पुढे नोकरी मिळण्याच्या दृष्टीने रँकिंग काय आहे, ते नक्की सखोलपणे पाहायला हवं.

परदेशी शिकायचा माझा निर्णय तसा रातोरात झाला. माझ्या निर्णयाला आईबाबांनी खंबीर पाठिंबा दिला. युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंगहॅममध्ये पाठवायला लागणारे शिफारसपत्र माझ्या महाविद्यालयातील दोन प्राध्यापकांनी दिलं. त्याचा खूप फायदा झाला. एरवी हा अर्ज केल्यापासून प्रतिसाद द्यायला किमान ४ ते ६ आठवडे वेळ घेतात. योगायोगाने मला आठवडय़ाभरातच कोणत्याही अटींविना ऑफर लेटर मिळालं होतं. त्यांनी दिलेल्या पत्रानुसार आयईएलटीएसची परीक्षा द्यायची गरज नव्हती; पण बँकेच्या लोनसाठी ही परीक्षा मला द्यावी लागली. ही परीक्षा ब्रिटिश काऊ न्सिल किंवा आयडीपी या संस्थांच्या माध्यमातून देता येते. लोनची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर विद्यापीठाला कळवून अनामत रक्कम भरली. त्यानंतर त्यांचं पत्र (सीएएस लेटर) मिळाल्यावर व्हिसासाठी अर्ज केला. नंतर विमानाचं तिकीट वगैरे व्यावहारिक गोष्टींची पूर्तता केली.

वेबसाइटवरच्या माहितीवर कोणत्या मोडय़ुलला किती गुणांकन, प्रोजेक्ट पद्धती, विषय निवड असेल की लेखी परीक्षा असेल की डिझर्टेशन वगैरे सगळ्या गोष्टींबद्दल लिहिलेलं असतं. डिझर्टेशन (प्रबंध) हा खूप महत्त्वाचा भाग असतो. आपण केलेलं संशोधन, अभ्यास यावर इथली पदवी मिळणं अवलंबून असतं. पहिल्या सेमिस्टरमध्ये सगळे विषय बंधनकारक होते, तर दुसऱ्या सेमिस्टरमध्ये चारही विषय मला निवडायला मिळाले. इथल्या राहणीमानाचा खर्च इतर विद्यापीठांच्या तुलनेने थोडा कमी होता. मात्र किंचितसा तोटा म्हणजे संधी थोडय़ा कमी मिळतात आणि एकूणच जगण्यातला संथपणा मुंबईकरांना अगदीच जाणवण्याजोगा आहे. बर्मिगहॅमला माझी महाविद्यालयातली मैत्रीण राहत असल्याने तिला माझ्या विषयाच्या अभ्यासाबद्दलची माहिती होती. बाबांच्या मित्रांची मुलगी असल्याने शहराची माहितीही कळली. त्यांच्यामुळे मला मदतीचा हात मिळाला. समजा, कुणी ओळखीचं नसतं तरी एक शहर म्हणून ते सुरक्षित असल्याने मी इथं आलेच असते.

अभ्यासक्रम सुरू व्हायच्या आधी वेलकम प्रोग्रॅम आयोजित केला जातो. त्यात विविध कार्यक्रम आणि कार्यशाळांचं आयोजन केलं जातं. दरम्यान, भारतातून महिन्याभराचा व्हिसा मिळतो आणि इथे आल्यानंतर बीआरपी अर्थात ‘बायोमेट्रिक रेसिडंटस् परमिट’ मिळतं. ते मिळालं की तांत्रिकदृष्टय़ा आपण तिथले होतो. हे परमिट आणि पासपोर्ट जिवापाड जपावं लागतं. वेलकम वीकनंतर स्कूलतर्फे इंडक्शन प्रोग्रॅम असतो. त्यात अभ्यासक्रम व प्राध्यापकांविषयी माहिती दिली गेली. फ्री सेशनमध्ये विविध देशांतून आलेल्या, विभिन्न पाश्र्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांच्या समजाचं भान किमान समान पातळीवर आणणं गरजेचं असतं. त्यामुळे गणितासह विषयाशी निगडित गोष्टींचे क्लासेस घेतले जातात. त्यायोगे अभ्यासक्रम कसाकसा पुढे सरकणार आहे, याची कल्पना आल्याने त्या दृष्टीने विचारांना चालना मिळते.

अभ्यासक्रम सुरू झाल्यावर महिन्याभरात अभ्यासक्रमातील विषय किंवा तो अभ्यासक्रम बदलावासा वाटला तर तो बदलता येऊ  शकतो. पूर्ण अभ्यासक्रम बदलल्यास व्हिसा बदलून घ्यावा लागतो. या प्रक्रियेत अडथळा शर्यत अजिबात नाही, हे विशेष. कारण विद्यार्थ्यांच्या आवडीला, त्यांच्या मानसिकतेला इथे खूप महत्त्व दिलं जातं. मानसिक ताणतणाव असल्यास किंवा अभ्यास जमत नसल्यास इथल्या वेल्फेअर ऑफिसरशी बोलता येतं आणि त्यांचं मार्गदर्शन मिळतं. इथे प्रत्येक विद्यार्थ्यांला पीएचडी झालेला पर्सनल टय़ुटर असतो. अभ्यास, प्रबंध, करिअरशी संबंधित काहीही बोलायचं झाल्यास टय़ुटरशी बोलता येतं. उत्तर मिळालं नाही इथपासून ते मला पीएचडीसाठी अर्ज करायला काय करावं लागेल इथपर्यंत त्यांना सगळं विचारता येतं. त्यांच्याकडून शिफारस पत्र घेता येऊ  शकतं. वर्गात शिकवलेली गोष्ट कळली नाही, तर टय़ुटर ते शिकवण्याचा प्रयत्न करतात, अगदीच काही किचकट असेल तर स्वत: प्राध्यापकांशी बोलून मग आपल्याला समजावून सांगतील. वर्ग संपल्यावर प्राध्यापकांची परवानगी घेऊ न किंवा ईमेलद्वारे आपल्या शंका त्यांना विचारता येतात. ही सगळी प्राध्यापक मंडळी अनेकदा व्यावहारिक जगातील उच्चपदस्थ किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरचे प्राध्यापक असतात. इथे अ‍ॅक्सेंटचा प्रश्न येत नाही. प्राध्यापकांचं इंग्रजी सगळ्या मुलांना कळेल, असंच असतं. ते फार भराभर बोलत असतील तर भर वर्गात त्यांना सावकाश बोलायला सांगता येऊ  शकतं. सगळ्यांना समजेपर्यंत शिकवतात. विशेष आणि अपंग विद्यार्थ्यांसाठी उत्तम तांत्रिक गोष्टी आणि नोटटेकर्ससारख्या सुविधा  उपलब्ध आहेत. इथल्या स्टुडण्ट असोसिएशनमध्ये आपल्याला करिअरसाठी मदतीचा हात मिळतो. वैयक्तिक आयुष्यातल्या प्रश्नांसाठी समुपदेशकांची मदत मिळते. आठवडय़ात एकदा प्रॅक्टिकल डे असतो. सॉफ्टवेअरमध्ये काम करायचं असतं. त्यामुळे खूप माहिती मिळते आणि आपण कालसुसंगत शिकतो आहोत, ही जाणीवही होते.

इथे पीपीटीवर शिकवतात. त्यासाठीचे चार्ट, स्लाइड्स वगैरे प्राध्यापक स्वत: मेहनत घेऊ न करतात. ते स्लाइड्स वाचताना आपण त्याच्या नोट्स काढू शकतो. काही शंका आली तर लगेच विचारायचं. या प्राध्यापकांच्या नोट्स आणि स्लाइड्स वर्षांच्या सुरुवातीलाच ऑनलाइन स्टुडण्ट पोर्टलवर उपलब्ध असतात. ऑनलाइन सबमिशन असतं. त्यावर त्यांचं मार्किंग असतं. आपण सबमिट केलेल्या प्रोजेक्ट किंवा उत्तरामध्ये एखादा परिच्छेद अन्य ऑनलाइन किंवा ऑफलाइन पुस्तकातला, संदर्भामधला असला आणि त्याचा शेवटी उल्लेख केला नसेल तर लगेच त्याची दखल घेतली जाते. ते बदलायला लागतंच. आपल्यापेक्षा इथे खूपच सखोल अभ्यास करावा लागतो. पदवी आणि एमएच्या पहिल्या वर्षांला यातला काही भाग असल्याने मला ते माहिती होतं. त्यामुळे थोडं सोपं गेलं. वेळेचं गणित सोडवणं, हे एक मोठं आवाहन आहे. कारण बहुतांशी विद्यार्थी पार्टटाइम नोकरी करतात. मीही करते. लेक्चर्सना जाणं, अभ्यास करणं, जॉब करणं आणि घरचं सगळं बघणं यासाठी वेळ अपुरा पडतो. इथे येताना मनाची ती तयारी असणं अतिशय आवश्यक आहे. वाहतुकीचा वेळ फारच वाचतो. बस, ट्रामच्या तिकिटासाठी विद्यार्थ्यांना सवलत असते. हॉस्टेलमध्ये राहण्याचा आणि टय़ुशन फीचा खर्च शिष्यवृत्ती मिळाल्यास कमी होतो. अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून आपलं करिअर इथे घडवता येतं, हे नक्की.

शब्दांकन : राधिका कुंटे