मी एकोणीस वर्षांची आहे. नांदेडमध्ये राहते. माझं वजन ५२ किलो आहे. मला हॉल्टर नेकचे टॉप घालायला आवडतात. पण माझे दंड मोठे असल्यामुळे ते छान वाटत नाही. मी काय करायला हवं ?
– अनामिका

हाय,
तुझ्या वर्णनावरून तू खूप जाड असशील असं वाटत नाही. ५२ किलो वजन म्हणजे काही फार नाही. हॉल्टर नेक ही खूपच मस्त आणि एकदम इन फॅशन आहे. तुझे दंड जर १५ इंचापेक्षा जाड नसतील तर हॉल्टर नेक घालायला काहीच हरकत नाहीय. एकच मुद्दा महत्त्वाचा आहे. तो म्हणजे तू ते कपडे कसे वागवतेस.. अर्थात कसे कसे कॅरी करतेस. तू ते अगदी आत्मविश्वासानं कॅरी केले पाहिजेत. मी जाड आहे, मला कसं दिसेल ही भावना ते घालून वावरताना आली तर काही उपयोग नाही. हॉल्टर नेकलाइन अगदी आत्मविश्वासानं कॅरी करणाऱ्यांमध्ये अभिनेत्री काजोल, राणी मुखर्जी आणि जूही चावला ही चांगली उदाहरणं आहेत. यांच्यातल्या कोणाचीच झीरो फिगर नाहीय. तरीही त्यांनी हॉल्टर नेकचे ड्रेस आणि ब्लाऊझ छान कॅरी केले आणि त्यांना ते शोभून दिसले. आणि तुझ्याबाबतीत तुझं वयसुद्धा प्लस पॉइंट आहे. तू फक्त १९ वर्षांची आहेस. तू अशा वेगवेगळ्या आऊटफिट्सचे प्रयोग नक्कीच करून बघू शकतेस. तरीही तू जर या कपडय़ांबाबत साशंक असशील तर एखादा छानसा ट्रान्सपरन्ट श्रग किंवा जॅकेट ड्रेसवरून घाल. अशानं तुझा हॉल्टर पॅटर्न तर दिसेल पण तुझे दंड थोडे झाकले जातील. शिवाय सध्याचा लेटेस्ट रॅगलन पॅटर्न ट्राय करायला हरकत नाही. या पॅटर्नमध्ये हॉल्टरसारखाच कट असतो पण बाहय़ा मात्र जोडलेल्या असतात.

एक्सपर्ट अ‍ॅडव्हाइस : या फंक्शनला कुठला ड्रेस घालावा, कुठला रंग उठून दिसेल, या ड्रेसमध्ये जाड तर दिसणार नाही ना.. असे नाना प्रश्न आपल्याला पडत असतात. प्रत्येक वेळी खास ड्रेस डिझायनर गाठणं काही जमत नाही आणि परवडत नाही. तुमच्या फॅशनविषयीच्या शंकांना या कॉलममधून डिझायनर मृण्मयी मंगेशकर उत्तरं देतील. आपला प्रश्न व्यवस्थित वर्णनासह आमच्याकडे viva.loksatta@gmail.com या आयडीवर पाठवा. सोबत तुमचं नाव, वय आणि आपले राहण्याचे ठिकाणही आम्हाला सांगा. सब्जेक्ट लाइनमध्ये फॅशन पॅशन असा उल्लेख करायला विसरू नका.