हाय फ्रेण्ड्स ! वेलकम टू ‘व्हिवा वॉल’! ही आहे तुमच्या मनातलं सगळ्यांपर्यंत पोहचवायची एक हक्काची जागा. तुमच्या आवडीचे चित्रपट, नाटक, म्युझिक, पुस्तकं, मालिका आणि करंट टॉपिक्स अशा ढेरसाऱ्या विषयांवर आपण बोलणार आहोत. तुम्हीही या वॉलवर लिहू शकता. त्यासाठी तुमचे विचार आमच्याशी जस्ट शेअर करा. त्यासाठी आम्हाला ईमेल करा- viva.loksatta@gmail.com सब्जेक्टलाइनमध्ये – विवा वॉल असं जरूर लिहा.
‘समोर आले रंग.. एका घोळक्यात दंग.. हरतऱ्हांचे मुखवटे.. किती खरे-खोटे..’ हाय फ्रेण्डस्! रंग आणि त्यांच्यावरच्या कवितांचा पाऊस पडायला लागला म्हणजे होळी-रंगपंचमी जवळ आली, ही खुणगाठ पक्की ठेवायची. खुणगाठ अशासाठी की, हा असतो आपला परीक्षेचा सीझन. एकदम फोकस राहायचे दिवस.. त्यात भलसलतीकडं डोकं फिरायला गेलं तर वाटच लागणार.. हां, पण होळी नि रंगपंचमी हे तर सणावाराचे दिवस.. आपल्या सगळ्यांच्या सॉलिड आवडीचे. एकच धुमशान करता येण्याजोगे.. अभ्यास थोडा सायिडगला टाकून धम्माल करता येण्यासारखे.
काय मजा आहे, खरं तर मजा आहे म्हणू या की, सांस्कृतिक खंत म्हणू या की, उत्तरेकडचं सांस्कृतिक आक्रमण आहे असं म्हणू, काही कळत नाहीये.. ‘व्हिवा वॉल’साठी होळी-रंगपंचमीचा विषय करायचा ठरलं. खरं म्हणजे होळी म्हणजे फाल्गुन पौर्णिमेला साजरी केली जाते ती नि दुसऱ्या दिवशी धूलिवंदन अर्थात शहरी भागांत रंग खेळायचा दिवस. होळीनंतर पाच दिवसांनी येते रंगपंचमी. पुण्यात अजूनही रंगपंचमीला रंग खेळणारे लोक आहेत. पण काही जणांशी बोलताना असं लक्षात आलं की, सरसकटपणं ‘आम्ही होळी खेळतो..’ असंच म्हटलं गेलं. क्वचितच कुणी ‘रंगपंचमी खेळतो’ असं म्हटलं. ‘होळी खेळतो’ म्हणणाऱ्यांना मग आदल्या दिवशी रात्री जी होळी लावली-पेटवली जाते, त्या विषयी सांगा, असं म्हटल्यावर त्या विषयी सांगितलं गेलं. शुभेच्छा देतानाही सर्रासपणं म्हटलं जातं की ‘हॅप्पी होली..’ असो.
गेल्या काही वर्षांत होळी आणि रंगपंचमीच्या निमित्तानं पर्यावरणस्नेहाचा जागर सतत सुरू आहे. त्याचंच फलित म्हणा किंवा काही म्हणा तरुणाईचा कल पर्यावरणस्नेही होऊ लागलाय. होळीसाठी निर्दयपणे वृक्षतोड न करता भोवतालच्या परिसरात उपलब्ध असलेल्या गोष्टींचा वापर केला जातोय. रंगपंचमीसाठी वारेमाप पाणी वापरण्यापेक्षा कोरडय़ा, त्वचास्नेही नि पर्यावरणस्नेही रंगांनी खेळण्याचं प्रमाण वाढतंय. पाण्याचे फुगे-पिशव्यांमुळं होणारी इजा लक्षात घेऊन त्याचा वापर करणं बंद होतंय. गेल्या वर्षीच्या दुष्काळी परिस्थितीमुळं अनेकांनी पाणी वाचवण्याचा, पर्यावरणस्नेहाच्या जबाबदारीचा ‘श्रीगणेशा’ गिरवला होता, त्याची ‘दिल से’ ‘बाराखडी’ होणं अतिशय गरजेचं आहे. आपण उचललेल्या या ठाम पावलाला इतरांचीही साथ मिळू लागल्येय.. हा प्रतिसाद वाढला तर मग खरोखरच हा सण वाईटाचा नाश करणारा नि सकारात्मक भावनांचे रंग खुलवणारा ठरेल.. मग कायमच.. ‘रंग प्रेमाचा.. रंग स्नेहाचा.. रंग हर्षांचा.. रंग उत्सवाचा..’ असं म्हणता येईल. होळी नि रंगपंचमीविषयीची मतं काही जणांनी ‘व्हिवा वॉल’शी शेअर केली आहेत.
ऋतुजा तरटे
आमच्या सोसायटीमधील ‘रॉयल्स फॉर सोशल’ या ग्रुपच्या पुढाकारानं गेली दोन वर्षे आम्ही कोरडी होळी साजरी करतोय. पाण्याशिवायही आम्ही होळी एन्जॉय करतोय. यंदाही तशीच होळी आम्ही साजरी करणार आहोत. आम्ही पर्यावरणस्नेही रंग वापरतो. या उपक्रमाला सगळ्यांचाच छान प्रतिसाद मिळतोय. होळीसाठी एवढी र्वष आम्ही लाकूड विकत आणत होतो. त्याऐवजी यंदा सुकलेल्या फांद्या नि पालापाचोळ्याचाच वापर करायचा विचार चालू आहे. पाण्याच्या पिशव्या बॅन करणार आहोत.
अजय लाड
गेल्या वर्षीचा दुष्काळ लक्षात घेऊन आम्ही फक्त दोन िपपांतलं पाणीच होळी खेळण्यासाठी वापरलं होतं. गावातल्या लोकांना-गुराढोरांना पाण्यासाठी वणवण करायला लागत होती, हे लक्षात घेऊन पाण्याचा दुरुपयोग करायचं टाळलं होतं. आमचा खारीचा वाटा उचलला होता. होळीसाठी आम्ही पर्यावरणस्नेही रंगच वापरतो. हे रंग पुसून पटकन जाऊ शकत असल्यानं त्यासाठी अतिरिक्त पाण्याचा वापर टाळता आला.
सायली ठाकूर
अलिबागजवळच्या चौल या माझ्या गावात होळीच्या आधीच आठवडाभर लहान मुलांची छोटी होळी लावणं सुरू होतं. लेकुरवाळ्या केळीचं झाड, माडाच्या झावळ्या, सुकलेल्या फांद्या वापरून ही होळी सजवतात. रात्री उशिरा होळी पेटवल्यावर मुलं विविध खेळ खेळतात. त्यांना छान खाऊ दिला जातो. मोठय़ा माणसांच्या लवकर लावल्या जाणाऱ्या मुख्य होळीत पडलेलं झाड, घरातल्या उपयोगी नसलेल्या लाकूडसामानाचा वापर केला जातो. होळीच्या सजावटीसाठी हार, गाठय़ा, नारळांचं तोरण, फळांचा वापर करतात. भोवती सुबकशी रांगोळी काढतात. होळी पेटल्यावर जळता झाप घेऊन होळीभोवती सगळे जण गोल फिरतात. त्यामुळं प्रतीकात्मकपणे वाईट गोष्टींचा नाश होतो, असं मानतात. रंगपंचमीच्या दिवशी आम्ही कमीत कमी पाणी वापरतो नि कोरडय़ा रंगानं खेळतो. आम्ही फुग्यांचा वापर अजिबात करत नाही.
कुणाल राणे
घरीच तयार केलेल्या पर्यावरणस्नेही रंगांनी आम्ही खेळतो. अॅलर्जी येऊ शकणारे, स्किनला त्रास होणारे रंग आम्ही वापरतच नाही. गेली ३ र्वष फक्त रंगांनी खेळायचं ठरवल्यानं पाण्याचा वापर करणाऱ्यांशी आमच्या ग्रुपनं खेळायचं नाही असं आम्ही ठरवलंय. मी बऱ्याच जणांना पर्यावरणस्नेही रंगांनी खेळायचा सल्ला देतो. आमच्या आसपासच्या झाडांच्या पडलेल्या सुकलेल्या फांद्या-पालापाचोळा, झावळ्या नि पेंढा यांचा वापर करून आम्ही होळी सजवतो. लाकडाचा वापर करत नाही. उरलेल्या टाकाऊ लाकडाचा उपयोग संबंधितांना विचारूनच करतो.
निकिता सुळे
आम्ही त्वचेला हानिकारक नसणाऱ्या (त्वचास्नेही) रंगांनी गेली दोन र्वष होळी खेळतोय. गेल्या वर्षीची पाणीटंचाई लक्षात घेता आपण इथं खेळण्यात पाणी फुकट घालवतोय, ही आपली चूक आहे हे आमच्या लक्षात आलं. त्यामुळं गेम्स खेळून, आपापले पदार्थ शेअर करून आणि पर्यावरणस्नेही रंग वापरून होळी खेळू शकतो, असं आम्ही ठरवलं. यंदा तर पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, असा निश्चय केलाय. फुगे-पिशव्यांना आम्ही बॅनच केलंय.