|| प्रियांका वाघुले
दिवसाची सकारात्मक सुरुवात होण्यासाठी व्यायाम हा अतिशय महत्त्वाचा असतो आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात जर अशी सकारात्मकतेने केली तर शरीराचा आणि मनाचा फिटनेस आपोआपच सांभाळला जातो, असे राणा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी सांगतो.
मालिकेत रांगडा, तालमीत खेळणाऱ्या राणाची भूमिका करीत असल्याने हार्दिकला त्याच्या शरीरयष्टीवर चांगलीच मेहनत घ्यावी लागली असली तरी प्रत्यक्षातही मालिकेतील राणा आणि वैयक्तिक आयुष्यातील हार्दिक या दोघांसाठी फिटनेस तितकाच महत्त्वाचा असल्याने त्याकडे दुर्लक्ष करता येत नसल्याचे तो सांगतो. मुळात आठवी-नववीच्या सुट्टय़ांदरम्यान मोठय़ा भावासोबत जिमला जात असताना मनात फिटनेसबद्दल काहीच विचार नव्हता, पण हळूहळू आपल्या शरीराला या गोष्टींचीही आवश्यकता असते याची जाणीव होऊ लागली. त्यामुळे सहज सुट्टीत कधी तरी जिम करणे मागे पडले आणि दैनंदिनीतला आवश्यक भाग म्हणून जिमवारी कायमची जोडली गेल्याचे हार्दिक सांगतो.
आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला आपला फिटनेस देत असतो. या गोष्टींचा प्रभाव आपल्या बौद्धिक कामात आपल्याला फारसा चटकन जाणवत नाही, पण आपल्या वर्तनात, मानसिकतेत, परिश्रम यात आपल्याला त्याचा वेळोवेळी उपयोग होत असतो. सध्या राणाच्या निमित्ताने फिटनेसकडे जास्त महत्त्व दिले जात असल्याने त्याचा उपयोग हार्दिकला वैयक्तिक स्तरावर जास्त होतो. व्यायामात फक्त वेट ट्रेनिंगला प्राधान्य न देता त्याच्या जोडीने फंक्शनल ट्रेनिंगही तो करतो.
स्नायू घट्ट करून डिप्स करणे, एका हाताने डिप्स, एका हाताने पूल अप्स असे व्यायाम प्रकार यात असतात. ज्यामुळे स्नायूंवर ताण पडतो. कारण आपण अनेकदा खूप वजन उचलू शकतो, पण तेच आपल्या शरीराचे वजन आपल्याला हाताळता येत नाही. त्यामुळे स्वत:च्या वजनाचा तोल सांभाळत या गोष्टी करणे उपयुक्त ठरत असल्याचे हार्दिक म्हणतो.
व्यायामाबरोबरच शरीराला आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट, अन्नघटक शरीरात जायलाच हवेत. वेळोवेळी शरीराला हवी असणारी जीवनसत्त्वे, प्रथिने शरीराला मिळणे गरजेचे असते. जसे एखाद्या मशीनला काम करण्यासाठी चार्जिगची गरज असते अगदी तसेच आपल्या शरीराचेही आहे. त्यामुळे शरीराला आवश्यक असलेल्या पौष्टिक गोष्टी त्याला मिळणे गरजेचे असल्याचे मत तो व्यक्त करतो. आपल्या आहारातून, खाण्यापिण्यातून आवश्यक अन्नघटक शरीरात जायला हवेत. त्यासाठी बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून राहण्यापेक्षा रोजच्या रोज पोषक आहार घेण्यावर भर असावा, असे तो आग्रहाने सांगतो. अनेकदा कामामुळे किंवा बाहेरगावी असल्याने आहाराचे गणित सांभाळता येत नसले तर त्या वेळी काही प्रमाणात प्रोटिन पावडर आपल्या दिनक्रमात समाविष्ट करण्यास हरकत नसल्याचे हार्दिक म्हणतो. पण त्याचे प्रमाण किती आणि कसे असावे याचे भान ठेवूनच त्याचे सेवन करावे, असेही त्याने सांगितले.