नव्या पिढीचा गायक, संगीतकार, रिअ‍ॅलिटी शोचं व्यासपीठ गाजवणारा, रॉक म्युझिक बॅण्डमध्ये झोकून देऊन गाणारा आणि शास्त्रीय संगीताच्या तानाही तितक्याच नजाकतीनं घेणारा हरहुन्नरी कलाकार जसराज जोशी सांगतोय ‘ऐकावंच असं काही’.. अर्थात आठवडय़ाची प्ले लिस्ट!
मखमली गळ्याचे गायक पद्मश्री हरिहरन यांचा आज ५९ वा वाढदिवस. गायकीच्या एका पद्धतीत खासियत असूनही दुसऱ्याही पद्धातींमधे तेवढाच ठसा उमटवणाऱ्या, सरगम आणि तीनही सप्तकांवर प्रभुत्व गाजवणाऱ्या, कुठल्याही गाण्याला स्पर्श करताच त्या गाण्याचे सोने करून टाकणाऱ्या हरिहरन यांचा फॅन कोण नाही? सादर आहे त्यांच्या वेड लावणाऱ्या गाण्यांची प्लेलिस्ट-
परत एकदा सर्वात जास्त गाणी ‘एआरआर’ बरोबरचीच. दोघेही मूळ तमिळ असल्याने रेहमान-हरिहरन जोडी हिट नसती झाली तरच नवल! (दर वेळी प्लेलिस्टमध्ये एक तरी एआरआरचे गाणे असतेच, असं तुम्ही म्हणाल, त्याआधीच सांगतो.. पुढच्या वेळी रेहमान चे नावही काढणार नाही..शप्पथ!)
रेहमाननीच हाय रामा(रंगीला), सून री सखी (हमसे है मुकाबला), भारत हमको जानसे प्यारा है (रोजा) या गाण्यांतून शास्त्रीय-उपाशास्त्रीय धाटणीचा गायक अशी हरिहरन यांची प्रतिमा निर्माण केली आणि ‘टेलिफोन धून मे हसने वाली’ (िहदुस्थानी), यू ही चलाचल (स्वदेस) सारख्या उडत्या चालीच्या गाण्यांनी ती धुऊन काढली. रेहमान-हरिहरन जोडीने दिलेली सर्वात सुंदर गाणी विरहगीत या प्रकारात मोडतात. रोजा जानेमन (रोजा), तू ही रे.. (बॉम्बे), चंदा रे चंदा रे (सपने) आणि कहर म्हणजे माझ्या सर्वात आवडत्या मोजक्या गाण्यांपकी एक- प्रेयसी(ताल) या गाण्यांत हरिहरन यांचा एक वेगळाच टोन लागला आहे.. डायरेक्ट काळजात घुसतो हा टोन! प्रेयसी हे गाणे म्हणले रेहमानने ७- ८ वेगवेगळ्या गायकांकडून गाऊन घेतले आणि शेवटी हरिहरन यांचा आवाज फायनल झाला. पण त्यामुळे आत्ता आपण ऐकतो त्या गाण्यात प्रेयसी.. हा लांबलेला शब्द सुखविंदर सिंगचा आहे. तर शेटवच्या दोन ओळी – ‘मेरे पास मेरे पास है’ या स्वरुपकुमार राठौड यांच्या आवाजातील आहेत.
एकूणच हरिहरन यांनी गायलेल्या चित्रपट-गीतांमधील यादें(यादें), झौका हवा का (हम दिल दे चुके सनम), कितनी बातें(लक्ष्य), ही विरहगीते नेहमीच असर करून जातात. ‘चप्पा चप्पा चरखा चले’ हे ही विशाल भारद्वाज यांचा वेगळा टच असलेले एक विरहगीतच. बाकी विशाल भारद्वाज- हरीहन यांनी मिळूनही काही भन्नाट गाणी दिली आहेत जसे- ‘माचीस’ मधलेच ‘छोड आए हम वो गलिया.’, ‘चाची 420’ मधली ‘डो रे गा रे’ आणि ‘दौडा दौडा भागा भागा सा’ ही दोन धुमाकूळ गाणी,  ‘हुतूतू’ मधले ‘छै छप्प छै ’ हे अनवट गाणे.. लाजवाब! ‘खामोशी’ मधले ‘बाहों के दर्मियान’ हे प्रेमगीत, तसेच ‘दिलवील-प्यारव्यार’ चित्रपटासाठी ‘ओ हन्सिनी’, ‘तुम बीन जाउ कहाँ’ ही मूळ किशोरदांची गाणीही हरीजींनी गायलेली गाणीही सुंदर आहेत.
ही झाली चित्रपट गीते. हरीजींचे खरे प्रेम तर गझलगायकीत दडले आहे. ‘गुरू’मधले ‘ए हैरते आशिकी’ मधून त्याची झलक आपल्याला मिळतेच, पण त्यांनी स्वत संगीतबद्ध केलेल्या आणि गायलेल्या ‘मयकदे बंद करे लाख ज़्‍ामानेवाले’.. ही अवघड चालीची, वेगळ्याच धाटणीची गज़्‍ाल ऐकावीच अशी. ‘काश’, ‘मरीझ-इश्क का..’, ‘दर्द के रिश्तें’ ‘शहर दर शहर’(या दोन गाण्यांमधे र्भुे खान यांनी जी हार्मोनियम वाजवली आहे, त्याला तोड नाही.. केवळ भारी!), ‘आधी रात गुजर गयी..’, ‘एहदे मस्ती है’ या गझला.. त्यातूनही ‘हाझीर’ आणि ‘हाझीर-2’ हे अल्बम फारच उत्तम. या दोन्ही आल्बम्स मधे हरिहरन यांना उस्ताद झाकीर हुसेन यांनी साथ केली आहे.. म्हणजे सोने पे सुहागा !
अजून एक असेच ‘सोने पे सुहागा’ म्हणावे असे कॉम्बिनेशन म्हणजे कलोनियल कझिन्स! ‘कृष्णा नीबे..’ ‘ओ हो काय झालं..’ ‘सा नि धा पा..’ अशा गाण्यांनी लेस्ली लुईस आणि हरिहरन या जोडीने भारतीय संगीतात एका वेगळ्याच संगीतप्रकाराची भर घातली आहे असे म्हणायला अजिबातच हरकत नाही.
हे  ऐकाच..
हरिहरन यांच्या गाण्याचा खरा आनंद लुटायचा असेल तर तो प्रत्यक्ष मफलीत किंवा स्टेज वर गातानाच लुटता येतो. छ्र५ी चे गडी असल्याने त्यांची खरी गायकी स्टेज वरच खुलून येते. असे त्यांचे लाईव्हवाले अनेक व्हिडियोज यूट्यूब वर उपलब्ध आहेत. विशेष करून त्यांच्या गझलांच्या मफिली.. त्यात ते काही चित्रपट गीतेही गातात. पण अशा मफलींत ते चित्रपट-गीतांचा पूर्ण चेहरा मोहराच बदलून टाकतात! गजल अंगाने गायलेली  ‘तुही रे’,‘चंदा रे चंदा रे’, ‘यादे..’ ही गाणी यूटय़ूब वर नक्की अनुभवावी अशीच आहेत. याशिवाय हरीजी आणि शंकर महादेवन स्टेज वर गातानाचे सुद्धा दोन-तीन व्हिडिओ उपलब्ध आहेत. दोघांनी स्टेजवर एकत्र येऊन आहिर भरव, यमन  अशा रागांमधे साधारणपणे गप्पा मारल्या आहेत. जगजीत जींना श्रद्धांजली म्हणून गायलेले ‘सरकती जाए रुखसे नक़ाब- आहिस्ता आहिस्ता..’ सुद्धा आवर्जून ऐकण्यासारखे.
जसराज जोशी -viva.loksatta@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा